Tue, Dec 10, 2019 14:05होमपेज › Belgaon › ‘एक खिडकी’लाही कानडीची बाधा!

‘एक खिडकी’लाही कानडीची बाधा!

Published On: Apr 14 2018 1:43AM | Last Updated: Apr 14 2018 1:00AMबेळगाव: प्रतिनिधी   

आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर निवडणूक काळात नागरिक, मतदार, इच्छुक उमेदवार यांच्या सोयीसाठी निवडणुकीला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एक खिडकी कार्यालय सुरू करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी नेमणूक केलेल्या कर्मचार्‍यांना मराठी भाषा येत नसल्यामुळे मराठी भाषिकांची कुचंबणा होत आहे. 
शहर विभागाकरिता महानगरपालिका व ग्रामीण विभागासाठी तहसीलदार कार्यालयात एक खिडकी कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयात एक संगणक ऑपरेटर, मदतनीस व निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. एक खिडकी कार्यालयात कोणती कामे करून दिली पाहिजेत याचे मार्गदर्शन यापूर्वी निवडणूक अधिकार्‍यांकडून करण्यात आले आहे. मात्र, येथे नेमलेल्या कर्मचार्‍यांना मराठी भाषा येत नसल्यामुळे शहर व ग्रामीण भागातील मराठी भाषिकांची गैरसोय होत आहे. या कार्यालयातील कर्मचार्‍यांशी संपर्क साधण्यासाठी भाषांतरकाराची मदत घ्यावी लागत आहे. 

एक खिडकी कार्यालयात निवडणूकसंबंधी मार्गदर्शन करण्याची व्यवस्था आहे. मतदार ओळखपत्र, निवडणूक काळात भित्तीपत्रके वाटप करणे, जाहीरनामा, राजकीय सभा आयोजित करणे, प्रचारासाठी वापरण्यात येणार्‍या वाहनांना परवाना मिळविणे, एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल झाली असल्यास त्याच्या पोलिस स्थानकात
 नोंद केलेल्या तक्रारीची प्रत दाखविणे, ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यासाठी परवानगी मिळविणे, निवडणूक काळात इच्छुक उमेदवारांचे बॅनर व डिजीटल फलक उभारणे यासंबंधी कोणती कागदपत्रे जमा करायला हवीत, याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. पण कन्‍नड कर्मचारी असल्याने मराठी जनांची गैरसोय होत आहे. येथे मराठी कर्मचार्‍याची नियुक्‍ती करण्याची मागणी होत आहे.

Tags :A window, Kandi hurdle!, belgaon news