Mon, Jun 17, 2019 10:34होमपेज › Bahar › शब्दांचा शाेधात

शब्दांचा शाेधात

Published On: Oct 07 2018 1:13AM | Last Updated: Oct 06 2018 10:47PMवैजनाथ महाजन

प्रत्येक माणूस सतत कसल्या ना कसल्या शोधात असतो, असे आपणास माणसाचे मनोव्यापार पाहिले की लक्षात येते. हे शोध जगाच्या द‍ृष्टीने महत्त्वाचे नसतील कदाचित; पण त्याच्या द‍ृष्टीने आणि त्याच्यापुरते निश्‍चितच महत्त्वाचे असतात, त्यातून त्याच्या जीवनाला प्रसंगी टवटवी मिळत असते आणि त्यातून तो उल्हासितही होत असतो. कदाचित हा शोध इतरांच्या द‍ृष्टीने अगदीच नगण्यही असेल; पण त्याला त्याचे महत्त्व पटलेले असते. एखादी नवी वाट सापडल्यावर माणसाला असाच आनंद होत असावा व त्याचवेळी आपण शोधलेली वाट अन्य कुणालाही ठाऊक नाही, याचाही त्याला आणखीन वेगळा आनंद होत असावा. एखादा मुलगा कुणाच्याही मदतीशिवाय पोहायला शिकतो, त्यावेळी आपले पोहणे सर्वांनी पाहावे, अशी त्याची इच्छा असते. त्यामागेसुद्धा पोहण्याचा त्याला लागलेला शोध हाच कारणीभूत असतो. असेच आपण बर्‍याचवेळा नवनव्या शोधांच्या मागे असतो आणि यातूनच कधीतरी आपणाला शब्दांचा लळा लागत असतो. कवी हे शब्दांशी सतत खेळत असतात, असे त्यांच्या जवळचे आप्‍त सांगत असतात. कवींना नवनवीन शब्दांची गरज भासते, तीसुद्धा त्यांच्या मनात साचून राहिलेला अर्थ व्यक्‍त करण्याकरिताच, म्हणून कविताही जरी शब्दांतून प्रकट होत असली, तरी शब्द म्हणजे कविता असे मात्र कधी होत नसते.

शब्द हे आशयाचे वहन करणारे असतात, म्हणजे जसे पालखीला भोई असतात, तसे शब्द अर्थाच्या पालख्या वाहण्याकरिता भोई होत असतात. म्हणून शब्दाभोवती सतत रुंजी घालणार्‍या कवी-लेखकांना नवीन शब्द सापडला की, विलक्षण आनंद होत असावा, हे निश्‍चित आहे. म्हणूनच एका कवितेत ‘शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी,’ असे म्हटलेले आहे; पण आपण खरोखरी उच्चारलेला शब्द कितपत जपून ठेवत असतो, हाच यामागे खरा कळीचा प्रश्‍न आहे. बर्‍याचवेळा शब्द जपून वापरा, असे आपणास वडीलधारी मंडळी बजावत असतात. कारण, एकदा तोंडातून गेलेला शब्द परत घेता येत नाही आणि त्याबरोबरच त्याचा परिणाम नाकारताही येत नाही. शब्दाने माणसे दुखावतात, हे जितके खरे आहे, तितकेच शब्दानेच माणसे सुखावतात, हेही तितकेच खरे आहे. शब्द कधी बेफाम होतात, तर कधी ते प्रचंड गतिमानही होत असतात. गाण्याची चाल कशी आहे, असे कुणाला विचारले तर चाल उडत्या चालीची आहे, असे सांगितले जाते. याचा अर्थ त्यातील शब्द तसेच चटपटीत आणि सर्वसामान्य माणसाला सहज उमजणारे आहेत, असा याचा अर्थ असतो.

ज्ञानेश्‍वरीत ‘फुले झाली अळूमाळू, वारा पाहे चुरगळू’ अशी एक अपूर्व सौंदर्याने नटलेली ओळ आहे. यातील शब्दांचे हळुवारपण केवळ अप्रतिम आहे. ज्ञानेश्‍वरीत आपणास इतके शब्द भेटत असतात की, यातूनच ज्ञानेश्‍वरीचा स्वतंत्र शब्दकोश सिद्ध केला गेला आहे. एखाद्या कवीला किती शब्द सुचावेत याचे आश्‍चर्य वाटावे इतके शब्द ज्ञानेश्‍वरीत येतात आणि तसेच तुकोबांच्या गाथेतही येतात. या संतांना शब्दांची जी गुहा सापडली तिचे वर्णन केवळ अशक्य आहे. आपण फक्‍त त्यांनी मांडलेल्या शब्दांच्या मागे धावत सुटावे, हेच ठीक. मराठी भाषा ही आता जगातील मान्यवर भाषांपैकी एक म्हणून मान्य झाली आहे आणि भाषाशास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे,  भविष्यात जगातील ज्या भाषा टिकून राहतील, त्यामध्ये मराठी भाषा असेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. मराठी माणसाचा आजही अभिमानाचा विषय असला, तरी आपणास आपला शब्दांचा शोध मात्र थांबवून चालणार नाही. कारण, नवनवीन शब्द हेच भाषेचे वैभव असते आणि हे वैभव वाढवून नव्या पिढीच्या स्वाधीन करणे ही प्रत्येक भाषाप्रेमिकाची जबाबदारी  असते.

आपण वाहतुकीची कोंडी झाली म्हणतो, मुंबईकर वाहतुकीची गोची झाली असे म्हणतो. अर्थ एकच; पण शब्दाच्या छटा मात्र भिन्‍न. म्हणून शब्द वापरताना अत्यंत काळजीपूर्वक वापरला पाहिजे, असे जे सांगितले जाते त्यातूनच माणसाच्या मनाचा शब्दांबद्दलचा ओढा समोरच्या माणसाला समजत असतो. कवी शब्दांना जन्म देतो म्हणून तो एकप्रकारे नवे सर्जन करीत असतो. त्याच्या मनाचा शब्दांचा शोध ठप्प झाला की, त्याची कवितापण रेंगाळल्यासारखी होत असते. हे शब्दब्रह्म सर्वस्वी वेगळे आहे. संभाजी महाराजांनी नको ते उद्योग करणार्‍या गणोजी शिर्केला वेळ मिळेल तेव्हा जरा संस्कृत वाचत चला, असा जो अत्यंत उचित सल्ला दिला होता तो या ठिकाणी आठवतो. कारण, शब्दांच्या नादी लागणारा माणूस त्या विश्‍वात एकदा का हरवून गेला की, त्याला बाकीचे अवघे जग व्यर्थ वाटू लागते. एका कवीने ‘दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले,’ असे अप्रतिम लिहून ठेवले आहे.

तमाच्या तळाशी दिवे लावण्याकरिता कवीचे मन तडफडत असते आणि तीच त्याची खरी धन्यता असते. म्हणून ‘आम्हाला कवितेतच खराब व्हायचे होते.’ यासारख्या ओळीला अपूर्व अर्थ प्राप्‍त होत असतो. अलीकडेच एका पुस्तकाचे नाव ‘शब्द सोन्याचा पिंपळ’ असे असल्याचे पाहिले. ‘शब्द सोन्याचा पिंपळ’ हे तर त्रिवार सत्य आहे आणि याकरिताच आपल्या मनाचा शब्दशोध अखंड सुरू राहिला पाहिजे. नवनवीन शब्द आपल्या मनात रुजले पाहिजेत आणि त्या रुजलेल्या शब्दांतूनच आणखीन नवनवीन शब्द आपणास गवसत गेले पाहिजेत. कदाचित यातूनच आपली शब्दसंपत्ती वाढत जाते आणि आपण खर्‍या अर्थाने सांस्कृतिकद‍ृष्ट्या श्रीमंत बनत जातो, अशा श्रीमंतीपुढे बाकीचे सारे ऐश्‍वर्य आपणास फिजुल वाटले पाहिजे, म्हणून शब्द शोध हा लक्षणीय आनंदही असतो आणि तोच खरा आत्मानंदही असतो.