Wed, Feb 20, 2019 15:06होमपेज › Bahar › बारीेश का बहाना

बारीेश का बहाना

Published On: Jul 08 2018 1:47AM | Last Updated: Jul 07 2018 8:29PMसुप्रिया वकील

आपण उन्हाळ्यात उकाड्याने हैराण असतो, त्यावेळी आपल्याला नभी दाटणार्‍या घन घन मालांची कोण प्रतीक्षा असते! मग मान्सूनचे अंदाज येऊ लागतात. तो कुठेपर्यंत आलाय, कुठे रेंगाळलाय, त्यानं कोणता भाग व्यापलाय वगैरे वगैरे ‘अपडेटस्’ कळू लागतात. अखेर एकदाचा पावसाळा सुरू होतो. (पाऊसही सुरू होतो!) आणि या ‘नेमेचि’ येणार्‍या पावसाळ्याचे ‘नेमेचि’ येणारे ‘साईड इफेक्टस्’ही सुरू होतात. म्हणजे काहींचे नाक पावसासोबत ‘आपणही बरसणं गरजेचं आहे’ अशा निष्ठावान सिन्सिअरिटीने गळू लागतं. 

पाऊस सुरू झाला की, काही ठिकाणी भिंतींना, छताला व भिंतीतल्या कपाटांना गहिवर येऊ लागतो. याच दिवसांत दारं-खिडक्यांनी फुगून बसणं हे जणू अपरिहार्यच असतं. काही ठिकाणी, विशेषतः लग्‍न समारंभात मानपानावरून रुसणी-फुगणी जशी ‘मॅनडेटरी’ असल्यासारखी असतात, तसं पावसाळ्यात दारं-खिडक्यांचं असतं बहुतेक... आणि हा रुसवा जायलाही बरेच दिवस लागतात. पावसाळा संपून गेल्यावरही पुढे बरेच दिवस हे ‘कवित्व’ उरतं. मग ही दारं-खिडक्या आपल्याला भरपूर  हाता-पाया पडायला लावून, प्रचंड ‘ओढाताण’ करायला लावून, अशीच कधीतरी रुळावर येतात. प्रत्येकवेळी ते आपल्या हातात राहतं, असंही नाही. काहीवेळा त्यांना वळणावर आणण्यासाठी तज्ज्ञांची मदतसुद्धा घ्यावी लागते. 

याच काळात, कपाटात मागे टाकलेले रेनकोट उगाच ताठपणा करत, माणसाळायला वेळ लावू लागतात, छत्र्या उघडताना आढेवेढे घेऊ लागतात. आपल्या नेहमीच्या बूट-चपलांची पावसाच्या पाण्यात भिजून वाट लागू नये म्हणून, पावसाळी बूट-चपला घेतल्या की, त्या हटकून ‘लागतात.’ काही जण चप्पल लागण्याला चप्पल ‘चावणं’ असं म्हणतात. तशा या ‘चावर्‍या’ बूट-चपला टाचेजवळ व बोटांपाशी हुळहुळं करता करता, तिथलं कातडंही सोलून काढतात. 

या पावसाचा आणि ठराविक वेळांचा काय योग असतो कोण जाणे; पण आपल्या बाहेर जाण्याच्या वेळा त्याला ठाऊक असतात एवढं खरं! आपण घराबाहेर पडताना तो अगदी घाईत असल्यासारखा झराझरा बरसू लागतो. त्यानंतर पुन्हा ऑफिस सुटायच्या वेळीही तो हटकून हजर असतो. शाळा दुपारची असते तेव्हा हा दुपारी येतो आणि गंमत म्हणजे शाळा सकाळची झाली की, हा सकाळी हजर असतो... कमाल आहे ना!

काहींच्या बाबतीत या कुंद पावसाळी वातावरणाचं आणि त्यांच्या सांध्यांचं ‘हाडवैर’ असतं. ‘इकडं’ ‘काली घटा छायी’ की तिकडं यांच्या ‘चालत्या’ गाड्याला खीळ... इतकं कट्टर! काहींच्या द‍ृष्टीनं, गरमागरम भजी आणि वाफाळत्या, आल्याचा चहाचा आस्वाद घेण्यासाठी ‘बारिश का बहाना’ असतो. गवती चहाची आठवणही या दिवसांतच होते.

पावसाळ्यात आपल्या वाहनाची चाकं चिखलाच्या मायेत मनमुराद लोळतात, तसाच या मायेचा स्पर्श आपल्या कपड्यांनाही होतो... छोट्याशा ठिपक्यापासून ते मनस्वी शिडकाव्यापर्यंत कितीही आकारमानाचा व तीव्रतेचा. त्यातच, जवळून जाणार्‍या वाहनाने वाटेतल्या खड्ड्याची दखल न घेता त्यातूनच वाटचाल केली, तर खड्ड्यातलं चिखलपाणी त्याचा निषेध केल्यासारखं उसळून आपल्याला सचैल स्नान घडवतं, आपला अपराध असल्यासारखं!

पावसाळा आणि वाळत घातलेल्या कपड्यांनी न वाळणं असं जणू घट्ट समीकरण असतं. एरव्ही सकाळी वाळत घातलेले कपडे रात्रीपर्यंत खडखडीत वाळतात; पण पावसाळ्यात मात्र कपड्यांचे ओले लगदे दोर्‍यांवर चार चार दिवस सुस्तपणे विसावलेले असतात आणि त्यानंतरही ते खडखडीत म्हणण्यासारखे वाळत नाहीतच. त्यांचा दमट ओलावा सूक्ष्म का होईना आपलं अस्तित्व दाखवत असतोच. 

पाऊस सुरू झाला की, नळाला चहासद‍ृश पाणी येऊ लागतं. मग कपड्यांना चहा-कॉफीच्या जवळच्या रंगछटा चढू लागतात आणि हा ‘चहा’ बादल्यांच्या तळाशी गाळरूपाने अस्तित्व दाखवू लागतो. एरव्ही डब्यात बंद होऊन कपाटात मागच्या बाजूला गेलेल्या तुरटीची आठवण याच काळात होते. या तुरटीच्या खड्याचे पाण्याच्या पिंपात चार वेढे घेताच जादूची कांडी फिरल्यासारखा पाण्यातला गाळ खाली बसतो. मनातली किल्मिषे दूर होऊन नजर स्वच्छ व्हावी तसा... मग पाणी निर्मळ दिसू लागतं. 

पाऊस सुरू झाला की, कवितांचाही पाऊस सुरू होतो. सगळं चिंब, झिम्मड, झड, सर, अनिवार, कोसळणं, भिजणं वगैरे वगैरे शब्दांचाही मुसळधार पाऊस सुरू होतो आणि त्या जोडीने त्याची तितकीच धुवाँधार थट्टाही सुरू होते. 

रिमझिम पावसात रहदारी तुरळक असते आणि आजूबाजूचा मानवनिर्मित कोलाहल जरा कमी असतो, अशावेळी छतावर पावसाच्या धारांचा ताल ऐकत, मऊसूत रजईच्या उबेत गुरफटून, झोपेच्या राज्यात प्रवेशण्याचे सुखद क्षण पावसाच्या सोबतीनं आणखी गहिरे होतात, हा ‘साईड इफेक्ट’ मात्र भलताच हवाहवासा वाटतो!