होमपेज › Bahar › प्रहार क्षमता वाढली

प्रहार क्षमता वाढली

Published On: Jun 10 2018 1:50AM | Last Updated: Jun 09 2018 8:35PMप्रा. विजया पंडित

भारताची युद्धनीती आक्रमक नसून, बचावात्मक आहे. तथापि, चीन आणि पाकिस्तानचा धोका ओळखून भारताने आपली संरक्षण प्रणाली मजबूत करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. ‘अग्नी-5’ क्षेपणास्त्राची यशस्वी झालेली सहावी चाचणी हेच दर्शविते. हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर प्रहार करणारे असले, तरी जमिनीवरून अंतरिक्षात जाऊन तेथून पृथ्वीच्या वायुमंडलात पुन्हा प्रवेश करून सुमारे 5 हजार किलोमीटर एवढ्या अंतरावरील लक्ष्य अचूक भेदण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे.

संरक्षणाच्या दृष्टीने चीन आणि पाकिस्तान ही भारतासमोरील प्रमुख आव्हाने आहेत. पाकिस्तान तर भारतापासून वेगळा झाल्या दिवसापासूनच भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. चीनबरोबर भारताचा सीमावाद शतकानुशतके सुरू आहे. चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे हा सीमावाद काही दिवसांपूर्वीच पुनरुज्जीवित झाला आहे. भारत आणि चीनदरम्यान सुमारे 3,488 किलोमीटर एवढी मोठी सीमारेषा आहे. यातील अनेक ठिकाणी दोन्ही देशांदरम्यान वाद सुरू आहेत. चीन आणि पाकिस्तान यांच्यातील आर्थिक आणि लष्करी क्षेत्रातील दोस्ती भारतासाठी आणखी धोकादायक ठरत आहे. चीन स्वतः भारताशी आगळीक न करता पाकिस्तानच्या माध्यमातून भारताचे नुकसान घडवून आणू शकतो. या पार्श्‍वभूमीवर, भारताला आपली संरक्षण प्रणाली सातत्याने अद्ययावत आणि तयार ठेवावी लागते. ती अधिकाधिक मजबूत करीत राहावे लागते. 

‘अग्नी-5’ या इंटर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी नुकतीच घेण्यात आली असून, त्याद्वारे भारताची संरक्षण प्रणाली आणखी मजबूत झाली आहे. पूर्णतः स्वदेशी बनावटीच्या या क्षेपणास्त्राची प्रहारक्षमता 5 हजार ते 8 हजार किलोमीटर एवढी प्रचंड असून, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे शक्तिशाली क्षेपणास्त्र आहे. अण्वस्त्र वाहून नेऊ शकणार्‍या या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने भारत चीनमधील कोणत्याही लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकेल. बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी सज्ज असणार्‍या अमेरिका, रशिया, ब्रिटन, चीन आणि फ्रान्स या देशांच्या पंक्तीत बसण्याचा बहुमान भारताला ‘अग्नी-5’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे मिळाला आहे. ‘अग्नी’ क्षेपणास्त्रांची मालिका प्रामुख्याने चीन आणि पाकिस्तानचा धोका डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली आहे. भारताने ‘अग्नी-1’, ‘अग्नी-2’ आणि ‘अग्नी-3’ या जमिनीवरून जमिनीवर प्रहार करणार्‍या क्षेपणास्त्रांची निर्मिती पाकिस्तानविरुद्धच्या रणनीतीचा एक भाग म्हणून केली होती. 

‘अग्नी-4’ आणि ‘अग्नी-5’ या क्षेपणास्त्रांची निर्मिती मात्र चीनकडून असलेला धोका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे. ‘अग्नी-5’ हे भारताजवळ असलेले आतापर्यंतचे सर्वाधिक तंत्रसमृद्ध बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ठरले आहे. बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची खासियत अशी की, हे क्षेपणास्त्र जमिनीवरून आधी हवेत जाते. अंतरिक्षात जाऊन पॅराबोलिक पाथमध्ये प्रवेश करते आणि तेथून पुन्हा पृथ्वीच्या वायुमंडलात प्रवेश करून जमिनीवरील दिलेल्या लक्ष्याचा अचूक भेद करते. ‘अग्नी-5’ मालिकेतील क्षेपणास्त्राची ही सहावी यशस्वी चाचणी आहे. या मालिकेतील पहिल्या क्षेपणास्त्राची चाचणी 

10 एप्रिल 2012 रोजी करण्यात आली होती, तर दुसरी चाचणी 15 सप्टेंबर 2013 रोजी झाली होती. तिसर्‍या क्षेपणास्त्राची चाचणी 31 जानेवारी 2015 रोजी, चौथी चाचणी 26 डिसेंबर 2016 रोजी, तर पाचवी चाचणी 18 जानेवारी 2018 रोजी करण्यात आली होती. या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या होत्या. आता सहावी चाचणीही यशस्वी झाल्यामुळे भारतीय सुरक्षा दलांचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. 

इंटर बॅलेस्टिक जातीचे ‘अग्नी-5’ हे क्षेपणास्त्र आपल्यासोबत दीड टन वजनाचे अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. एवढ्या अफाट वजनासह अंतरिक्षात जाऊन, तेथून पुन्हा पृथ्वीच्या वायुमंडलात प्रवेश करून 5 हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्यभेद हे क्षेपणास्त्र अचूकरीत्या करू शकते. म्हणजेच, आता निम्मे जग या क्षेपणास्त्राच्या मारक क्षमतेच्या टप्प्यात आहे. अमेरिका वगळता आशिया, आफ्रिका आणि युरोप खंड या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आले आहेत. भारताच्या या सर्वाधिक शक्तिशाली क्षेपणास्त्राच्या टप्प्यात संपूर्ण पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंडोनेशिया, इराक, इराण, सुमारे अर्धा युरोप, चीन, रशिया, मलेशिया आणि फिलिपिन्स हे देश आता सामावू शकतात. 

अर्थात, स्वसंरक्षणासाठी भारताच्या या हालचाली सुरू असताना, पाकिस्तान आणि चीन स्वस्थ बसले आहेत, असे नाही. हे दोन्ही देश आपापले क्षेपणास्त्र सामर्थ्य वाढविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. पाकिस्तानने ‘बाबर’ मालिकेतील अनेक क्षेपणास्त्रांचे परीक्षण केले आहे. मात्र, भारताच्या तुलनेत पाकिस्तान अद्याप खूपच पिछाडीवर आहे. चीनने याच वर्षी जानेवारीत आपल्या सर्वाधिक अत्याधुनिक हायपरसोनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली असून, ‘डीएफ-17’ असे या क्षेपणास्त्राचे नाव आहे. हायपरसोनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे ही हायपरसोनिक ग्लाईड क्षेपणास्त्रे असतात. यात क्रूझ आणि बॅलेस्टिक अशा दोन्ही क्षेपणास्त्रांची वैशिष्ट्ये एकत्रितपणे सामावलेली असतात. चीनच्या ‘डीएफ-17’ क्षेपणास्त्राच्या टप्प्यात संपूर्ण भारतच नव्हे, तर अमेरिकाही येऊ शकते. कारण, या क्षेपणास्त्राची प्रहारक्षमता तब्बल 12 हजार किलोमीटरची आहे. ‘डीएफ-17’ अमेरिकेची क्षेपणास्त्ररोधी प्रणाली भेदून आपले लक्ष्य टिपण्यास समर्थ आहे. 

चीनच्या क्षेपणास्त्र क्षमतेकडे पाहून भारताने रशियाबरोबर करार केला असून, या देशाकडून भारत ‘एस-400’ ही क्षेपणास्त्ररोधी प्रणाली खरेदी करणार आहे. दुसरीकडे, भारताने इस्रायलच्या ‘बराक-8’ या क्षेपणास्त्रासाठीही सौदा निश्‍चित केला आहे. क्षेपणास्त्रांबरोबरच भारताने रणगाडे, लढाऊ विमाने आणि शस्त्रास्त्रे या सर्वच क्षेत्रांत आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे. आपल्या युद्धनीतीत आक्रमकता नाही, हे खरे आहे. आपण नेहमी बचावात्मक पवित्र्यात राहिलो आहोत आणि हल्ला झाल्यास कमीत कमी नुकसान कसे होईल, याची काळजी घेतानाच सडेतोड प्रत्युत्तर देणे ही भारताची नीती आहे. परंतु, गरज पडल्यास ‘अग्नी-5’ या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने चीन आणि पाकिस्तानच्या धोक्यापासून बचाव करण्याची आणि चोख प्रत्युत्तर देऊन मोठा प्रहार करण्याची सज्जता भारताने केली आहे, असाच संदेश या दोन देशांना या यशस्वी चाचणीद्वारे देण्यात आला आहे.