होमपेज › Bahar › धर्मनिरपेक्षता

धर्मनिरपेक्षता

Published On: Jun 10 2018 1:50AM | Last Updated: Jun 09 2018 8:27PMप्रा. सुहास द. बारटक्के

“धर्मनिरपेक्ष’ म्हणजे काय हो सर?’
...सकाळी सकाळीच दारात उभे ठाकलेल्या शेजारच्या मंगुअण्णांनी प्रश्‍न विचारला. मी त्यांना आत बोलावत म्हटलं- 
‘या, बसा मंगुअण्णा, तुम्हाला समजावून सांगतो, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय ते.’ 
‘सांगा, सांगा,’ असं म्हणत मंगुअण्णा सोफ्यावर येऊन बसले. मी म्हटलं-
‘धर्मनिरपेक्षता म्हणजे एक शहाळं आणि दोन स्ट्रॉ!’ 
‘असं कोड्यात बोलू नका सर, नीट समजावून सांगा.’ 
‘म्हणजे असं की, मला सांगा तुम्ही कोणत्या धर्माचे?’
‘कोणत्या म्हणजे? हिंदू धर्माचा... गर्व से बोलता हूँ ना..?’
‘समजा उन्हाळ्यात भरदुपारी तुम्ही रस्त्याकडेला शहाळ्याचं पाणी पीत उभे आहात. तोंडात स्ट्रॉ पकडून हळूहळू पाणी पिणं चाललंय... तेवढ्यात समोरून तुमचा मित्र जॉन फर्नांडिस आला. शहाळं विक्रेत्याकडे ते एकच शेवटचं शहाळं शिल्लक होतं. जॉनला द्यायला दुसरं शहाळं नाही. अशावेळी तुम्ही काय कराल?’
‘काही नाही. दुसरं शहाळं नाही तर काय करणार?’

‘तुम्ही दुसरी स्ट्रॉ तर मागू शकता... दुसरी स्ट्रॉ घेऊन ती तुम्ही पीत असलेल्या शहाळ्यात घालणं आणि एक शहाळं दोघात पिणं यालाच म्हणतात धर्मनिरपेक्षता.’
‘व्वा! म्हणजे जात-धर्म न पाहता आधी माणूसधर्म पाहणं. तहानलेल्याची तहान दूर करताना तो केवळ माणूस आहे, इतकंच पाहणं, म्हणजे आपली धर्मनिरपेक्षता.’ 
‘करेक्ट! पण तुम्हाला आज हा शब्द कसा काय आठवला?’
‘ते आपले पूर्वीचे धर्मनिरपेक्ष राष्ट्रपती नाही का परवा संघाच्या व्यासपीठावर गेले.’ 
‘मग? संघही धर्मनिरपेक्ष आहेच ना?’ 
‘कसा? संघ तर कट्टर हिंदुत्ववादी.’ 

‘पण, त्यांच्यातही अन्य धर्मीय आहेत ना? त्यांंनी धर्मनिरपेक्ष अशा व्यक्तीला व्यासपीठावर नाही का बोलावलं? आणि महत्त्वाचं काय माहीत आहे का? की, आता निवडणुका जवळ आल्यात ना? तेव्हा सगळेजण आता धर्मनिरपेक्ष असणार!’ 
‘म्हणजे एरव्ही अमुकतमुक धर्माची कास धरणार आणि निवडणुका आल्या की सर्वधर्मीय बनणार.’ 
‘करेक्ट! भारत तसा निधर्मी देश आहे ना... इथं जाती-धर्माचं राजकारण करायला कायद्यानं बंदी आहे.’ 
‘पण, मग त्याचंच राजकारण करून निवडून येतात ना ही माणसं?’ 
‘ते खरंय... भारतात हेच तर आहे. दाखवायचं एक आणि करायचं दुसरं.’ तुम्हाला माझी एक कविताच ऐकवतो-
‘पवार, फर्नांडिस आणि शेख
कांबळेंच्या घरी
एकत्र प्यायला बसले होते. 
ग्लास एकच होता...
पण कुणाचे काहीही अडत नव्हते. 
प्रत्येकजण आळीपाळीनं
 ग्लास ओठी लावत होता. 
ना जात बुडत होती, ना धर्म! 
मदिरेनं सगळ्यांनाच एकत्र आणलं होतं
सर्वांची ‘कॅटेगरी’ एकच होती-

मद्यप्रेमी...

धुंद करणारी सत्ता
म्हणजे मदिराच नव्हे काय?
सत्तेची धुंदी अनुभवण्यासाठी
आज हे एकत्र बसलेत- इकडे; 
मांडीला मांडी लावून!
तिकडे गळ्यात गळे घालून
तेही झुलताहेत
मनातली अढी बाजूला ठेवून
भगव्यानं निळ्याला मिठी मारलीय्...
टोचणारी दाढ सहन करीत
पांढर्‍यानं हिरव्याला आलिंगन दिलंय..
बेरीज-वजाबाकीची गणितं सुटताहेत
आघाडी-युती बनत चाललीय
सत्तेसाठी सगळे जात-धर्म विसरलेत...
मग एरव्ही का बरं 
जाती-धर्मात दुभागली जातात
ही ‘माणसं?’
...त्यावर मंगुअण्णांनी विचारलं-
‘मी सांगू?’
‘सांगा ना...’
‘सत्तेसाठी!’
‘करेक्ट!’ मी म्हटलं, तसं मंगुअण्णा गंभीर चेहेरा करीत उठले.