Thu, Nov 14, 2019 06:24होमपेज › Bahar › इराणचे संकट आणि तेलजहाजांची सुरक्षा

इराणचे संकट आणि तेलजहाजांची सुरक्षा

Published On: Jul 07 2019 1:30AM | Last Updated: Jul 07 2019 1:30AM
ब्रिगेडियर हेमंत महाजन 

आखाती प्रदेशात अस्थिरतेचे, तणावाचे वातावरण तयार झाले किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, की भारताच्या चिंता वाढतात. याचे कारण देशाच्या अर्थव्यवस्थेचे वंगण असणारे तेल या देशांतून भारतात येते. सध्या इराण-अमेरिका यांच्यातील टोकाला पोहोचलेल्या संघर्षामुळे भारत चिंतेत आहे. खास करून पर्शियन गल्फमधून होणार्‍या तेलवाहू जहाजांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

जहाज भवनमध्ये एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला डायरेक्टर जनरल शिपिंग, इंडियन शिप ओनर्स असोसिएशन आणि भारतीय नौदल यांनी एकत्र येऊन पर्शियन गल्फमध्ये जी परिस्थिती आहे, त्याचे अवलोकन केले. काही दिवसांपूर्वी पर्शियन गल्फमध्ये दोन मोठ्या तेलवाहू जहाजांवर माईन्सने हल्‍ला झाला. त्यामुळे त्यांचे खूप मोठे नुकसान झाले. त्या व्यतिरिक्‍त इराणमध्ये टेहळणी करणारे अमेरिकेचे एक ड्रोन विमान इराणने पाडले. या बिघडत्या युद्धजन्य परिस्थतीमुळे भारतीय तेलवाहू जहाजे जे या भागातून प्रवास करतात, त्यांच्यावर भारतीय नौदलाचा एक अधिकारी आणि 2 नाविक तैनात केले जातील, असा निर्णय घेण्यात आला. हे अधिकारी आपला अनुभव वापरून या जहाजांना या धोकादायक समुद्रमार्गिकेवरून सुखरूपपणे जाण्याकरिता मदत करतील. 
भारताची अर्थव्यवस्था ही बव्हंशी आयात केल्या जाणार्‍या तेलावर निर्भर आहे. भारताचे 80 टक्के तेल हे बाहेरच्या देशांतून आयात केले जाते. हे तेल तेलवाहू जहाजांमार्फत समुद्रमार्गे भारतामध्ये पोहोचते. त्यापैकी 60 ते 65 टक्के तेल हे पर्शियन गल्फ किंवा गल्फ ऑफ होमरूझमधून भारतात येते. भारत प्रामुख्याने इराण, सौदी अरेबिया आणि इतर गल्फ राष्ट्रांकडून आयात करत असला, तरी हे तेल येण्याचा मार्ग एकच आहे. 

सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात वेगवेगळ्या कारणांमुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या संघर्षामध्ये सौदी अरेबिया हा अमेरिकेच्या बाजूचा म्हणजेच त्याला मदत करणारा देश असल्याने इराणने सौदी अरेबियालाही त्रास द्यायला सुरुवात केली आहे. अलीकडेच, सौदी अरेबियाकडे जाणारी दोन तेलवाहू जहाजे बुडवण्यात आल्याचा प्रकार घडला. ही परिस्थिती भारतीय जहाजांकरिताही धोकादायक आहे. देशामध्ये काही कारणांनी बाहेरून येणार्‍या तेलाच्या आयातीवर परिणाम झाला, तर त्याचे गंभीर परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतात. कारण, देशामध्ये केवळ 80 दिवस पुरेल इतकेच तेल साठवलेले असते. आपली सर्वच वाहने डिझेल आणि पेट्रोल यावरच चालत असल्याने तेल आयात खंडित झाली, तर देशात मोठे महासंकट निर्माण होईल. त्यामुळेच आपल्या तेलवाहू जहाजांना सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय जहाजांवर नौदलाचा एक अधिकारी आणि दोन नाविक यांची नियुक्‍ती करणे आवश्यकच होते. त्यांच्याकडे शस्त्रे नसतील; परंतु त्यांचे काम या नुकसानीपासून आपले जहाज कसे वाचवायचे, हा सल्‍ला देण्याचे असेल.

हा अधिकारी जहाजांकरिता धोकादायक समुद्रमार्गावरून जातानाच्या खबरदारीचे नियोजन करेल. त्याशिवाय, हा अधिकारी आणि नाविक जहाजांच्या आसपास कोणत्याही धोकादायक गोष्टी नाहीत ना, काही संशयास्पद हालचाली होत नाहीयेत ना, यावर लक्ष ठेवेल. या तेलवाहू जहाजामध्ये जे 25-30 कर्मचारी असतात. समुद्राच्या पाण्यावर तरंगणार्‍या स्फोटक पदार्थांवर लक्ष ठेवण्याचे प्रशिक्षण या कर्मचार्‍यांना देण्यात येईल. इतकेच नव्हे, तर ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न झाला, तर त्यावरही लक्ष ठेवता येईल. जहाजांवर हल्‍ला होऊन काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर नेमके काय करायचे, हेसुद्धा सांगितले जाईल. ज्यावेळेला सौदी अरेबियाच्या जहाजाच्या एका भागात स्फोट झाला, तेव्हा जहाजावरील कर्मचार्‍यांनी ते जहाज ताबडतोब सोडून दिले. वस्तुतः, जहाज लगेच सोडण्याची काहीच गरज नव्हती. त्या जहाजाला वाचवता आले असते. त्यामुळे अशा धोकादायक, आपत्कालीन परिस्थितीला कसे सामोरे जायचे, अशा प्रकारची परिस्थिती कशी निर्माण होऊ शकते, यावर लक्ष ठेवले जाईल. त्याचा सरावही केला जाईल. 

या जहाजांवर नौदलाचे कर्मचारी असल्याने जहाजांवरील इतर कर्मचार्‍यांना प्रेरणा मिळेल, काही अपघात झाल्यास लगेच जहाज सोडण्याची परिस्थिती येणार नाही. त्यामुळे उचललेले हे पाऊल नक्‍कीच महत्त्वाचे आहे; परंतु यामुळे भारताच्या जहाजांना असलेला काही टक्के धोका कमी करता येईल. जहाजांना असलेले धोके समुद्रावर तरंगणार्‍या स्फोटक पदार्थांमुळेच असतात असे नाही; तर काही वेळा जहाजाचा जो भाग पाण्याखाली असतो तिथे 10 मीटर खाली फ्लोटिंग माईन्स किंवा तरंगणार्‍या सुरुंगांचा धोका पोहोचवला जाऊ शकतो. म्हणून, पाण्याच्या आत असलेली स्फोटके कशी ओळखायची, त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापरही करावा लागेल. 

भारतामध्ये येणारे तेल केवळ 12 टक्के भारतीय जहाजांमधून येते. उर्वरित 88 टक्के जहाजे जी भारतासाठी इतर बंदरांवरून तेल घेऊन येतात. ती भारतीय नसतात. परदेशी जहाजांचा वापर आपण फक्‍त व्यापारासाठी करतो. त्यांच्या संरक्षणाचा प्रश्‍नही आहे. त्यांनाही आपल्याला अशाच प्रकारचे संरक्षण पुरवावे लागेल. म्हणजे, ही जहाजे नेमकी ज्या वेळेला गल्फ ऑफ होमरूज किंवा पर्शियन गल्फमधून येत असतील, त्या 300-400 किलोमीटरच्या रस्त्यांकरिता सुरक्षा कर्मचारी पुरवले तर त्या जहाजांचेही रक्षण आपल्याला करता येईल. 

याशिवाय, दूरदर्शीपणा दाखवून आपल्याला अधिक उपाययोजना करणेही गरजेचे आहे. काही महिन्यांपूर्वी सौदी अरेबियाने जगातील सर्वात मोठा तेल कारखाना भारतात रत्नागिरी येथे उभारण्याची इच्छा व्यक्‍त केली होती. हा प्रकल्प उभा राहिल्यास त्यांना तेल पुरवठा भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीवर करता येईल; परंतु आपल्याकडील राजकारणामुळे हा कारखाना रत्नागिरीत होणार नाहीये. आता तो रायगड जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे.            

महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर याबाबतचा निर्णय घेऊन कारखाना सुरू करावा. हा प्रकल्प सुरू झाल्यास पर्शियन गल्फ या अत्यंत चिंचोळ्या सामुद्रधुनीतून येणार्‍या जहाजांना असलेला धोका आपल्याला टाळता येईल. 

याशिवाय, इतर देशांकडून वेगळ्या मार्गांनी तेल आयात करणे आणि अशा प्रकारच्या धोक्यांमध्ये आपले नुकसान कमी करू शकतो. म्हणूनच, आपण तेलपुरवठादार इतर देशांचाही वापर केला पाहिजे.आता आपण अमेरिकेकडून कच्चे तेल विकत घेण्याचे प्रमाण वाढवतो आहोत. भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम किनारपट्टींवर अशा प्रकारचे तेल प्रक्रिया कारखाने उघडले गेले पाहिजेत. जेणेकरून धोकादायक पर्शियन गल्फमार्गे होणारा तेलाचा प्रवास कमीत कमी करता येईल. वरील काही दीर्घकालीन तसेच काही अल्पकालीन उपायांवर सरकार विचार करत असेल आणि त्यावर लवकरात लवकर अंमलबजावणी केली जाईल, अशी आशा आहे.