होमपेज › Bahar › खल्लास

खल्लास

Published On: Jun 10 2018 1:50AM | Last Updated: Jun 09 2018 8:22PMसुप्रिया वकील

पाहुण्यांच्या ‘डाएटी’ भोजन सोहळ्यानंतर मानसिक शीण आलेल्या यजमानीणबाई मागचं आवरताना “उद्या ब्रेकफास्टला इडली चालेल ना?’’ असं चतुराईनं विचारून घेतात. 
कारण, ब्रेडचे टोस्ट कटाप... कारण, मैदा नाही. पावभाजीला तोच प्रॉब्लेम. साबुदाण्याची खिचडी... म्हणायचीही सोय नाही. शिरा करूया म्हटलं की, गोड नको... अशाप्रकारे कशा-कशावर फुली मारणे जाऊ शकेल यावर चिंतन करकरून त्यांनी हा पर्याय मोठ्या मुश्किलीनं शोधलेला असतो. 
पण, त्यांच्या या चतुराईच्या फुग्याला टाचणी लावत पाहुण्याबाई म्हणतात, 

“नो नो... फर्मेंटेड सगळं बंद केलंय त्यानं...’’
आता यजमानीणबाई फसफसायच्या बाकी राहतात. उद्याच्या चिंतेनं त्यांची झोप उडते. हे पाहुणे फक्त पाणी व हवा यावर जगत असले पाहिजेत, अशी त्यांना निःसंदिग्ध खात्री पटते; पण गंमत म्हणजे हे ‘सजग’ लोक निरनिराळ्या ठिकाणच्या निरनिराळ्या हॉटेलमधली खासियत या विषयावर अधिकारानं बोलत असतात. अर्थात, हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावरही त्यांची दक्षता त्यांना ‘एक्स्ट्रा अ‍ॅलर्ट’ करतेच.
ते समोर ठेवलेलं ताट/बशी पुन्हा टिश्शूनं स्वच्छ करून घेतात. असे लोक ‘ऑर्डर’ देतात तेव्हा ‘रोटी’ प्रकारात काय-काय आहे, याची चौकशी करतात. 

तिथं सांगतात, “तंदुरी रोटी, नान, कुलचा, पराठा...’’
मग हे विचारतात, “भाकरी नाहीये?’’
ते सांगतात, “मिळेल; पण तासभर वेळ लागेल.’’
मग हे विचारतात, “चालेल; पण बाजरीची भाकरी मिळेल का?’’
ऑर्डर घेणारा परम सौजन्यानं “नाही’’ असं सांगतो. 
मग त्यांचा तासभर प्रतीक्षा करण्याचा (भाकरीसाठी) विचार बारगळतो. ते विचारतात, “व्हीट रोटी मिळेल का?’’
आता ऑर्डर घेणारा गोंधळतो. 

पण, ते त्याच्यासमोर मैद्याची रोटी व गव्हाच्या पिठाची रोटी म्हणजेच ‘व्हीट रोटी’ यावर छोटासा तौलनिक प्रबंध सादर करतात. आता त्याला ‘व्हीट रोटी’ म्हणजे काय हे कळलेलं असतं; पण त्याला मर्यादा असते. तो त्याच परम सौजन्यानं; पण ठामपणे सांगतो की, “इथं आहे तीच (म्हणजे मैद्याची) रोटी मिळू शकेल.’’
मग हे प्लेन तंदुरी रोटी मागवतात. ‘व्हीट रोटी’ न मिळाल्यामुळं हे मनात तडफडत असतात आणि यांनी ‘बटर रोटी’ न मागवल्यामुळं ऑर्डर घेणार्‍याचीही ‘अर्थपूर्ण’ तडफड होते. 
मग ते क्लिअर सूप, ग्रीन सॅलड, रोस्ट पापड असे पदार्थ सजगपणे मागवतात व ‘डाएट’ पाळलं गेल्याच्या आनंदात धन्य होतात. मात्र, जेवणानंतर आइस्क्रिमची तेवढी सूट घ्यायला विसरत नाहीत. 
हे लोक सतत अशा दक्षतेनं व सजगतेनं ‘डाएट’च्या मागे असतात... प्रत्येकवेळी नव्या उमेदीनं, उत्साहानं व आशेनं. 
परवा अशा एका ‘सुपर कॉन्शस’ प्राण्यानं हॉटेलमध्ये ऑर्डर देताना, “ब्राऊन राईस आहे का?’’ असं विचारलेलं ऐकलं. 
त्यावर वेटरनं मेन्यू कार्डावरील ‘फ्रॉम द ग्रीन पॅडी फिल्डस्’ विभागावर बोट ठेवत सांगितलं, “ब्राऊन राईस नाही... पण टोमॅटो राईस, लेमन राईस, मटण बिर्याणी, मटण पुलाव, चिकन शेजवान राईस, चिकन फ्राईड राईस, चिकन दम बिर्याणी...’’
त्यानंतर दोघांनीही एकमेकांकडं पाहिलं. 
दोघांच्याही चेहर्‍यावर भाव होते, 
“काय येडं आहे!’’