Mon, May 25, 2020 22:43होमपेज › Bahar › विजयादशमीचा भावार्थ

विजयादशमीचा भावार्थ

Published On: Oct 06 2019 1:29AM | Last Updated: Oct 05 2019 8:57PM
सु. ल. हिंगणे  अध्यात्म अभ्यासक

आदिशक्तीच्या नवरात्रौत्सवाची सांगता होते ती दसर्‍याच्या दिवशी. संपूर्ण भारतभरात खासकरून दक्षिणेकडे हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवसाला अनेक पौराणिक तसेच नैसर्गिक ऋतुमानाचेही संदर्भ आहेत. हा उत्सव विजयासाठी प्रस्थान करण्याचा आहे. त्यामुळेच दसर्‍याला विजयादशमी असेही म्हटले जाते. या दिवशी सीमोल्लंघन करण्याची प्रथा प्राचीन काळापासून आहे. आज बदलत्या काळात सीमोल्लंघन म्हणजे आपल्या मनातील राग, लोभ, मत्सर, द्वेष, अंधश्रद्धा, सूड या वाईट भावना दूर करून मनाचं, विचारांचं एकप्रकारे सीमोल्लंघन करण्यासाठी या दिवसाचं महत्त्व आहे...

जिथे भगवान कृष्ण आणि धनुर्धर पार्थ अर्थात अर्जुन आहे, तेथे विजय, लक्ष्मी, कल्याण आणि शाश्वत नीती आहे, असे महर्षी व्यास यांनी गीतेच्या अंतिम श्लोकात म्हटले आहे. योगेश्वर कृष्ण म्हणजे ईश्वर कृपा आणि धनुर्धर अर्जुन म्हणजे मानवी प्रयत्न. या दोघांचा जेथे सुयोग होतो, तेथे कुठलीही गोष्ट अशक्य राहत नाही. माणसाचे सकारात्मक प्रयत्न आणि ईश्वर कृपा जेथे एकत्र येतात तेथे विजयाचा शंखनाद नेहमीच ऐकायला येईल, हे निर्विवाद सत्य आहे. दसरा हा उत्सव शक्ती आणि शक्तीचे महत्त्व सांगणारा उत्सव- नवरात्रीच्या नऊ दिवसांत जगदंबेची उपसना करून शक्तिशाली बनलेला माणूस विजयाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करेल, हे अगदी स्वाभाविक आहे. या द़ृष्टीने बघितले तर दसर्‍याचा उत्सव विजयासाठी प्रस्थान करण्याचा उत्सव आहे, हे समजते. 

भारतीय संस्कृती वीरतेची पूजक आहे. शौर्याची उपासक आहे. व्यक्ती आणि समाजातील तमाम घटकांमध्ये वीरता प्रकट होण्यासाठी दसर्‍याचा उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. युद्ध अनिवार्य असेल, तर शत्रूच्या आक्र मणाची वाट न बघता त्याच्यावर आक्र मण करून त्याचा पराभव करणे हीच कुशल राजनीती आहे. शत्रू आपल्या राज्यात घुसून, लूट केल्यानंतर लढाई करण्याची तयारी करणारे आमचे पूर्वज नव्हते, तर शत्रूचा दुष्ट व्यवहार समजूनच त्याच्यावर आक्रमण करत असत. रोग आणि शत्रूला निर्माण झाल्या-झाल्याच नष्ट करायला पाहिजे; अन्यथा ते त्याचे प्राबल्य वाढवते. 

दसरा म्हणजे विजयाचे प्रतीक, म्हणूनच या दिवसाला विजयादशमीदेखील म्हणतात. प्रभू रामचंद्रांच्या काळापासून दसरा हा दिवस विजयाचे प्रतीक बनला आहे. भगवान रामचंद्रांनी रावणाचा नाश याच दिवशी केला होता. म्हणून आजही या दिवशी प्रतीकात्मक रूपाने रावणदहन करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबाला हैराण करण्यासाठी याच दिवसाची निवड केली होती आणि हिंदू धर्माचे रक्षण केले होते. इतिहासात या दिवशी विजयप्रस्थान करण्याची अनेक उदाहरणे सापडतात. 

ऋतुमानाचे संदर्भ

या उत्सावामागे काही नैसर्गिक ऋतुमानाचेही संदर्भ आहेत. दसर्‍याच्या वेळी वर्षा ऋतू येऊन गेलेला असतो. वरुणदेवाच्या कृपेने या काळात अन्नधान्याची समृद्धी असते. त्यामुळे समाजमन आनंदाने भरलेले असते. नसानसात उत्साहाचे कारंजे उडत असल्यामुळे विजय प्रस्थान करण्याचे त्याचे मन होणारच. या दिवसात पाऊस गेलेला असतो. चिखलाने माखलेले रस्ते सुकलेले असतात. हवामान अनुकूल असते. आकाश स्वच्छ असते, असे वातावरण विजयाला पूरक असते. शिवाय, नऊ दिवस जगदंबेची उपासना करून प्रयत्न केलेली शक्तीदेखील शत्रूचा संहार करण्याची प्रेरणा देत असते. म्हणून या दिवशी विजयासाठी अर्थात चांगल्या कामाची सुरुवात करण्याची पद्धत आहे. 

देवी जगदंबेने सतत नऊ दिवस युद्ध करून चंड-मुंड, रक्तबीज, महिषासुर आदी राक्षसांचा वध केला होता. तिच्या विजयाचे प्रतीक म्हणूनही दसरा साजरा केला जातो. तसेच पांडवांनी अज्ञातवासातून बाहेर येऊन आपली लपविलेली शस्त्रे शमीच्या झाडावरून याच दिवशी बाहेर काढली होती. म्हणून या दिवशी सीमोल्लंघन करतात आणि येताना आपट्याची पाने सोन्याचे प्रतीक म्हणून एकमेकांना वाटतात. भारतीय संस्कृतीत प्रत्येक चेतन आणि अचेतन गोष्टीला सन्मान दिला जातो आणि त्यांचे पूजनही केले जाते. यामध्ये वृक्ष, वनस्पतीही सामील आहेत. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला कडुलिंबाची पूजा केली जाते. वटसावित्री पौर्णिमेला वडाची पूजा केली जाते. सोमवती अमावस्येला तुळशीची पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यात येणार्‍या कुशग्रहिणी अमावस्येला कुशाची पूजा केली जाते आणि कार्तिक महिन्यातील नवमीला आवळे नवमी म्हणून आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. त्या-त्या वनस्पतीचे आरोग्याच्या द़ृष्टीने महत्त्व जाणून त्याचे पूजन केले जाते. जेणेकरून मानव या उपयुक्त वृक्षांचे संवर्धन करेल. 

दसर्‍याला आपट्याची पाने देण्यामागे विजय आणि उल्हासाची भावना असते. तसेच समृद्धीची कामनाही केली जाते. याच दिवशी काही भागांत अपराजिता (विष्णुकांता) या वनस्पतीचेही पूजन केले जाते. ही वनस्पती विष्णूला प्रिय आहे. या धार्मिक संदर्भाबरोबरच तिचे काही वैद्यकीय गुणधर्म आहेत. ती अतिशय आरोग्यदायी आहे. कफविकारांवर या वनस्पतीचा खूप चांगला उपयोग होतो. विजयादशमीला दुर्गापूजन, अपराजिता पूजन, नवरात्रीचे पारणे इत्यादी विधी केले जातात.

दक्षिणेकडील दसरा

उत्तर भारतात दसर्‍याचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर पूर्वेला पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेचा मोठा महोत्सव असतो. म्हैसूरचा दसरा हा केवळ भारतातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहे. जगाच्या कानाकोपर्‍यातून या महोत्सवात सहभागी होण्यासाठी लोक येत असतात. दक्षिणेकडे दसरा सण साजरा करण्याची पद्धत विजयनगरच्या सम्राटांनी पंधराव्या शतकात सुरू केली. विजयनगरचे साम्राज्य लयाला गेल्यावर म्हैसूरच्या वडियार राजघराण्याने हा सण साजरा करायला सुरुवात केली. 1610 मध्ये श्रीरंगपट्टण येथे राजा वडियार याने पहिल्यांदा दसरा साजरा केला. नवरात्राचे नऊ दिवस आणि दसर्‍याच्या दिवशी असे दहा दिवस म्हैसूरचा राजवाडा रोषणाईने उजळून गेलेला असतो. म्हैसूरच्या चामुंडी टेकडीवर चामुंडेश्वरी देवीचे मंदिर आहे. या देवीची पूजा करून वडियार राजघराण्याकडून सणाला प्रारंभ होतो. त्यानंतर राजाचा खास दरबार भरतो. असा खास दरबार भरवण्याची ही परंपरा कृष्णराजा वडियार तिसरा याने 1805 मध्ये सुरू केली. या दरबारात राजघराण्यातील सर्व सदस्य, विशेष आमंत्रित, अधिकारी आणि सर्वसामान्य लोक उपस्थित असतात. ही परंपरा आजही चालू आहे. आता हा खास दरबार वडियार घराण्यातील नवी पिढी भरवत असते. अर्थात, पूर्वीच्या काळातील लोकदरबाराचे स्वरूप आता बदलले आहे. आता श्रीकांतदत्त नरसिंहराजा वडियार दसर्‍याच्या वेळी खासगी दरबार भरवतात. दसरा महोत्सवाच्या नवव्या दिवसाला महानवमी म्हणतात. हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो. त्यादिवशी राजघराण्यातील तलवारीची पूजा केली जाते आणि तिची मिरवणूक काढली जाते. 

विजयादशमीदिवशी पारंपरिक दसरा मिरवणूक म्हैसूर शहरात काढली जाते. या मिरवणुकीचे खास आकर्षण म्हणजे चामुंडेश्वरी देवीची मूर्ती सजवलेल्या हत्तीवर ठेवलेल्या सोन्याच्या अंबारीत बसवलेली असते. मिरवणुकीला निघण्यापूर्वी राजा आणि राणी जोडीने चामुंडेश्वरीची पूजा करतात. देवीची मूर्ती सोन्याच्या अंबारीत ठेवल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होते. म्हैसूर राजवाड्यातील बन्नीमंडपापासून मिरवणुकीला प्रारंभ होतो. या बन्नीमंडपात बन्नीचा वृक्ष आहे. त्या वृक्षाचीही पूजा केली जाते. बन्नीचे झाड म्हणजे शमीचे झाड. याच झाडाच्या ढोलीत पांडवांनी आपली शस्त्रे अज्ञातवासात जाण्यापूर्वी लपवून ठेवली होती. पूर्वीच्या काळी कोणत्याही   युद्धावर जाताना राजे लोक या झाडाची पूजा करत. बन्नीमंडपात विजयादशमीच्या रात्री मशाल मिरवणूक काढली जाते. 

म्हैसूरच्या दसर्‍याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दसर्‍याचे प्रदर्शन. म्हैसूर राजवाड्याच्या समोरील भागात हे प्रदर्शन भरवले जाते. दसर्‍याच्या दहा दिवसांच्या कालावधीत सुरू होते आणि डिसेंबरपर्यंत चालू असते. या प्रदर्शनात अनेक तर्‍हेचे स्टॉल उभे केले जातात. कपडे, प्लास्टिकच्या वस्तू, स्वयंपाकघरातील साधने, सौंदर्य प्रसाधाने, खाद्यपदार्थ अशा अनेक वस्तूंचे स्टॉल तेथे लावण्यात येतात. या काळात म्हैसूरला जत्रेचे स्वरूप येते. जत्रेतील सर्व खेळणी यावेळी इथे असतात. राज्य सरकारही ही संधी सोडत नाही आणि राज्याच्या विकासाचा आढावा घेणारी प्रदर्शने यावेळी भरवली जातात. अलीकडच्या काळात म्हैसूरमध्ये युवा दसरा साजरा केला जातो. यात युवक मोठ्या संख्येने सहभागी होतात. केवळ म्हैसूरमधूनच नव्हे, तर संपूर्ण कर्नाटकातून तरुण या सोहळ्यात सहभागी होतात आणि विविध कार्यक्रम साजरे करतात. 

बंधुभावाची भावना

जगभराचा विचार केला तर केवळ भारतामध्ये अनेक प्रकारच्या संस्कृतींचा संगम पाहायला मिळतो. कदाचित म्हणूनच, देशाच्या कानाकोपर्‍यात कुठे ना कुठे सतत कोणता तरी उत्सव सुरू असतो. अनेक समस्यांच्या विळख्यात सापडूनही भारतीय माणूस आपली चांगले जीवन जगण्याची उमेद कधी गमावत नाही. भारत नावाचा देश याच उमेदीवर तर हजारो वर्षांपासून ताठ उभा आहे. अनेक वर्षांपासून हे सण-उत्सवच आपल्या समाजाचे संवर्धन आणि जपणूक करत आहेत. समाजातील बंधुभावाची भावना या सणांमुळे निर्माण होते. सर्वांना सामावून घेणारी आपली संस्कृती आपले हे ब्रीद अशा सणांमधूनच सिद्ध करून दाखवत असते. विजयादशमी अर्थात दसरा हा सणदेखील ही परंपरा कायम ठेवतो. 

बदलत्या काळात हवे वैचारिक सीमोल्लंघन

विजयादशमीला पौराणिक संदर्भ आहेतच; पण बदलत्या काळात आपणही काही चांगले संदर्भ लावू शकतो. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून विजयादशमी साजरी केली जाते. आपणही आपल्या मनातील, कृतीतील वाईट गोष्टींवर मात करून विजय मिळवला पाहिजे. आपल्या मनातील रक्तबीजरूपी वासना, द्वेष, मत्सर असुरांना नामोहरम केले पाहिजे. मनाचे सीमोल्लंघन केले पाहिजे. ‘विचार बदला, आयुष्य बदलेल’ असं म्हटलं जातं. सीमोल्लंघन म्हणजे आपल्या मनातील राग, लोभ, मत्सर, द्वेष, अंधश्रद्धा, सूड या वाईट भावना दूर करून मनाचं, विचारांचं एकप्रकारे सीमोल्लंघन करण्यासाठी या दिवसाचं महत्त्व आहे. या दिवशी आपल्यातील चांगल्या गुणांना उजाळा द्यायचा असतो. समाजात वावरताना असंख्य वाईट प्रवृत्ती आपल्या भोवताली दिसत असतात. त्यांना पाहून हे जग वाईटच आहे का, अशी पुसट शंकाही मनात येते; पण या नकारात्मक विचारांना दूर सारून सकारात्मक विचारांची पेरणी करणं आवश्यक असतं. त्यामुळे आत्मविश्वास तर द़ृढ होईलच; पण तेच खर्‍या अर्थानं विचारांचं सीमोल्लंघन ठरेल. आपल्याला स्वतःबद्दल वाटणार्‍या मर्यादांच्या सीमा ओलांडून कर्तृत्वाच्या कक्षा रुंदावणे हेही सीमोल्लंघन नाही का होऊ शकत? राम, कृष्ण, पांडव, जगदंबा ही सारी पुण्याईची प्रतीकं नसून, ती आत्मसात करण्यासाठी समोर ठेवलेली प्रमाणं आहेत. या प्रमाण मार्गावरून मार्गक्रमण केल्यास विजय निश्चित आहे. हाच संदेश या पौराणिक कथांमधून मिळत असतो. म्हणूनच या विजयादशमीला जुन्या, बुरसटलेल्या विचारांना मागे सारून त्यांच्या कोशातून बाहेर पडून वैचारिक सीमोल्लंघन करून नवे विचार धारण करूया आणि विजयादशमी खर्‍या अर्थाने साजरी करूया..!