Mon, Nov 20, 2017 17:19होमपेज › Bahar › माेठा आणि छोटा

माेठा आणि छोटा

Published On: Nov 12 2017 12:52AM | Last Updated: Nov 11 2017 9:00PM

बुकमार्क करा

प्रा. सुहास द. बारटक्के

शेजारचे मंगुअण्णा आज सकाळी-सकाळीच आमच्या घरी पायधूळ झाडते झाले. बहुधा ते फुकटचा पेपर वाचायला आले असावेत, अशा कल्पनेनं मी दैनिक ‘पुढारी’ त्यांच्यासमोर ठेवला. तेव्हा ते किंचाळलेच-

‘अहो! पेपर कसला वाचताय, कालच्या टी.व्ही.वरच्या बातम्याच पेपरात छापतात ना?’
‘छे, छे, ‘पुढारी’चं तसं नाहीय बर का... स्वतंत्र बातम्या निर्भीडपणे छापतात ते.’
‘ते ठिकाय हो; पण मला तुम्हाला विचारायचंय ते दुसरंच.’
‘मग विचारा की.’
‘म्हणजे?’

‘काल टी.व्ही.वरच्या मुलाखतीत सी.एम. म्हणाले की, काल आम्ही लहान भाऊ होतो ते खरंय; पण आज आम्ही मोठे भाऊ आहोत, हे विसरू नका.’
‘होतो भावाभावांत असा फरक. म्हणजे बघा, बरेचदा एखाद्या दोन मुलगेवाल्या कुटुंबातल्या भावाला त्याच्या आकारमानावरून अंदाज घेत विचारलं, की- ‘काय रे तू मोठा ना? की राजेश मोठा?’ त्यावर तो पटकन् म्हणतो, ‘छे, छे, राजेश मोठा, मी लहान.’ तसंच आहे लहान मुलाचे जास्त लाड होतात ना, तो फुगत जातो, मोठा दिसतो आणि मोठा बिचारा कामं करून-करून खंगत जातो, तो लहान वाटतो.’ 

‘पण, राजकारणात हे लहान भाऊ, मोठा भाऊ कसं ठरवतात? वयावरून?’
‘वयावरून अजिबात नाही. हाच तर फरक आहे. इथे मात्र आकारमानावरून, कोण गबदुल्या आहे, त्यावरून ठरतं ते.’

‘बरोबर आहे. ‘मातोश्री’वाल्यांच्या तुलनेत ‘वर्षा’वाले चांगले गबदूल आहेत. बोलतातही कंठ आवळून. जणू सुसाट ट्रेनच धावते भाषणात. एरव्ही मोठ-मोठी वाक्यं मोठ्या आवाजात बोलणं हे केवळ ‘सांघिक’ सराव असल्याशिवाय जमणेच शक्य नाही.’‘आणि ‘मातोश्री’वाले काय कमी आहेत? यांच्यावर वार करायचा झाला, तर तलवारीची धार येते त्यांच्या शब्दांना.’

‘होय, तरीपण हे मोठा-छोटा प्रकरण नेमकं काय आहे?’ ‘...त्याचं असं आहे, मंगुअण्णा, या दोघांचंही ध्येय एक. दोघेही एकाच विचाराचे. म्हणूनच त्यांनी ज्यावेळी प्रथम युती केली, तेव्हा धनुष्यबाणवाल्यांच्या तुलनेत कमळवाले होते छोटे. म्हणजेच, कमळवाले छोटा भाऊ आणि धनुष्यबाणवाले मोठा भाऊ होते; पण राजकारणात काहीही होऊ शकतं, असं म्हणतात. कमळवाल्यांचं नशीब फळफळलं आणि त्यांना सत्ता मिळाली. त्यांना मिळाला मोठा वाटा, तर यांना छोटा. अर्थात, मोठा वाटा घेणार तोच मोठा ना? थोडक्यात, ज्यांना मिळे सत्तेचा खाऊ तोच बने मोठा भाऊ.’

‘बरोबर आहे; पण, भावाभावांत ही भांडणं हवीतच कशाला?’
‘कशाला म्हणजे? राजकारणाच्या बाजारात कुणाचा भाव किती ते कळायला नको का?’
‘म्हणजे ज्याचा भाव जास्त त्यानं सतत भाव खायचा का? त्यापेक्षा कधीतरी छोट्या भावालाही थोडा भाव देऊन मनातला सद्भाव दाखवून द्या ना?’
‘सद्भाव, प्रेम वगैरे विसरा, ते युती करण्यापुरतं असतं, एकदा का सत्ताग्रहण झालं की, झाली सुरू यांची भाऊबंदकी.’
‘हो ना, सुरुवातीला उपरोधिक बोलायचे. आडून बोलून टोमणे मारायचे. आता तर उघड शाब्दिक लढाईच सुरू झालीय, मोठा भाऊ-छोटा भाऊ वगैरे.’
‘मंगुअण्णा, हे जर असंच चालू राहिलं ना, तर त्यांना नक्‍कीच जाब विचारावा लागेल.’
‘त्यांना कोण जाब विचारणार?’
‘कोण म्हणजे? त्यांचे मायबाप. मायबाप जनता जर खवळली, तर दोन्ही भाऊ जातील बाराच्या भावात! हे लक्षात घ्या. ’ मंगुअण्णा मान डोलवत उठले.