Sun, Dec 08, 2019 06:14होमपेज › Bahar › टिवल्या-बावल्या सत्तेचा बकासुर

टिवल्या-बावल्या : सत्तेचा बकासुर

Published On: Aug 04 2019 1:46AM | Last Updated: Aug 03 2019 9:56PM
प्रा. सुहास द. बारटक्के

‘सर बकासुराची गोष्ट आठवतेय का? आमच्या दारातून आत डोकावीत शेजारच्या मंगू अण्णांनी विचारलं,
‘हो, आठवतेय ना... पण तुम्हाला का आत्ता आठवली?’
‘हा बकासुर काय करायचा हो?’
‘काय करायचा म्हणजे? बकाबका अन्‍न खायचा.’
‘अन्‍न खायचा नाही... अन्‍न गिळायचा. सध्या सत्तेचा बकासुर कुणाला म्हणतात ठाऊकाय?’
‘कुणाला?’
‘भाजपला... ते काँग्रेसी नेते बाळासाहेब नाही का परवा म्हणाले, की ‘सत्तेच्या हव्यासापोटी भाजपचा बकासुर झालाय’ म्हणून.’
‘येस, म्हणाले खरं. आठवतंय मला वाचलेलं. हे राजकारणी ना सदैव काही ना काही उपमा देत असतात, एकमेकांना.’
‘भाजप आहेच सत्तेचा बकासुर...परवा नाही का कर्नाटकदेखील गिळलं? भाजपचा बकासुर सगळी राज्य गिळंत सुटलाय... शत-प्रतिशत भगवा फडकावूनच तो थांबणार.’
‘पण अण्णा त्याला बकासुराची उपमा कशाला द्यायची?’
‘का बरं?’
‘कारण, बकासुर हा जनतेला त्रास देत होता... भाजप तसं करतंय का?’
‘भाजप काय कमी त्रास देतोय? मला सांगा पूर्वी ‘जीएसटी’ नावाची चीज होती का? आता सगळ्यावर ‘जीएसटी’.....
प्रवासावर ‘टोल’.....
‘अहं, अण्णा, टोल पहिल्यापासून होताच... जीएसटी हा इतर छुप्या टॅक्सच्या रूपात होता आणि त्यावेळी काय बकासुर एकच होता? सगळेच बकासुर...सदैव खायला वखवखलेले... चार-चार पिढ्यांचा उद्धार करून ठेवला प्रत्येकाने. पोट फुटेस्तोवर खा-खा खाल्ले, म्हणूनच ना, जनतारूपी भीमाने त्या बकासुराचा वध केला!’
‘त्या बकासुराचा वध केला असेल, पण आता यांचा बकासुर सगळी राज्यं खात सुटलाय त्याचं काय?’ 
‘हे बघा अण्णा... हे राजकारण आहे.’
‘मग हेपण पैशाचंच राजकारण ना? त्यानी स्वत:ची खळगी भरण्यासाठी खा-खा खाल्लं. आता हे पक्षासाठी खाताहेत...’
‘हे बघा अण्णा, हे खाताहेत खरेदी करताहेत, पैसे मोजताहेत.... हे सगळे आरोप मोघम झाले. नीट पुराव्यांसहित बोला बघू.’
‘मग काय कर्नाटकातले आमदार उगीचच मुंबई बघायला नेले होते?’
‘यापूर्वी तुम्ही नाही का असे काही केलेत? तुमचं ते पुण्य....क्षम्य आणि भाजपचं ते पाप....अक्षम्य असं कसं म्हणता?’
‘ ते जाऊ दे; पण आता या बकासुराचा वध कसा करायचा ते सांगा.’
‘ते जनता बघेल ना.... तुम्ही फक्‍त कुणाचं काय चुकतंय ते दाखवत राहा.’
‘त्यानं काय होईल?’
‘त्यानं जनतारूपी भीम जागृत होईल. ज्याचं चुकेल त्याचा वध करील. ती ताकद फक्‍त जनतेतच आहे, हे लक्षात ठेवा.’
‘का? इतर पक्ष नाही करू शकत वध?’
‘अण्णा, मघापासून तेच तर सांगतोय तुम्हाला...
बकासुराचा वध बकासुरच कसा करणार? आणि ज्यांचा वध जनतेनं आधीच केलाय ते कसं काय हे सगळं करू शकणार?’
‘छे छे, हे मात्र तुम्ही त्यांचं बोलणं त्यांच्यावरच उलटवलंत...आता कोण कुणाला बकासुर म्हणेल?’
- असं म्हणून रागारागानं अण्णा परत गेले.