Sun, Feb 24, 2019 02:08होमपेज › Bahar › कट्याने काटा

कट्याने काटा

Published On: Feb 11 2018 1:02AM | Last Updated: Feb 10 2018 8:57PMप्रा. सुहास द. बारटक्के

परवा चंद्रग्रहण पाहिलं. सुपरमून, ब्ल्यू मून, रेड मून पाहिला. त्याचंच चित्र मनात साठवीत झोपी गेलो. गाढ झोपेत शांत निद्रा उपभोगीत असताना अचानक डोळ्यांसमोर भगवे रंग गडद होऊ लागले. भगवा झेंडा लहरला आणि पाठोपाठ माझ्या स्वप्नात कै. बाळासाहेब अवतरले. ‘काय रे, कसा आहेस? हल्‍ली तुझी लेखणी जोरात चालतेय म्हणे. पृथ्वीवरची, म्हणजे मुंबईची काय खबरबात? आमचे ढाल-तलवारवाले आणि इंजिनवाले काय म्हणतात.’

‘काही विशेष नाही. परवा इंजिनवाल्यांनी ‘फेरीवाले हटाव’ मोहीम हाती घेतली होती. पादचारी पुलावर त्रास देणार्‍या फेरीवाल्यांना बदडून काढले होते. फेरीवाल्यांनी वेगळ्या जागी धंदा करावा, असे सांगितले होते.’
‘असं होय? तो आहेच तसा ‘खळ्ळ-खट्याक’वाला.’

‘पण, त्याला ढाल-तलवारवाल्यांनी पालिकेच्या माध्यमातून चांगलंच प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी ‘कृष्णकुंज’च्या समोरचा आणि त्या नारायणरावांच्याही बंगल्यासमोरचा  फुटपाथ फेरीवाल्यांना बहाल केलाय.’
‘व्वा! याला म्हणतात काट्याने काटा काढणे.’

‘पण, त्याला नारायणरावांच्या चिरंजीवांनी लगेचच आव्हान दिलं की, जर आमच्या घरासमोर फेरीवाले बसवाल, तर ‘मातोश्री’समोरही आम्ही फेरीवाल्यांना बसवू.’
‘बरोबर... म्हणजे तोही जशास तसे उत्तर देतोय... शेवटी त्यांचे पिताश्री आमच्याच तालमीत तयार झाले आहेत ना?’

‘पण, साहेब काट्याने काटा काढणे म्हणजे नेमकं काय? तुम्ही कुणाकडून शिकलात?’
त्यावर बाळासाहेब स्मितहास्य करीत म्हणाले-
‘ती आमच्या वाडवडिलांची कृपा. प्रबोधनकार आणि दादा-बाबांची शिकवण.’
‘कसं काय ते सविस्तर सांगा ना साहेब?’
‘सांगतो,’ असं म्हणून बाळासाहेब बोलू लागले.

‘...त्याकाळी मुंबई एवढी ‘महान’ झाली नव्हती. तशी लहानच होती. परंतु, त्या काळीही मुंबईत मद्राशांची घुसखोरी सुरूच होती. एक आला की, त्याला चिकटून दुसरा. आमच्या आजोबांच्या चाळीत तर मद्राशांनी हैदोस घातलेला होता. सगळ्यांना बाथरूम-संडास, मोरीचे नळ कॉमन. मोरीला सहा नळ. कुठलाही नळ वापरा. तुमच्या नशिबाने ज्यातून पाणी येईल तो तुमचा. 

ते सगळे मद्रासी दररोज भरपूर तेल लावायचे. तेलाने अंघोळ करायचे. पंचा नेसून निघून जायचे. खाली तेलाचं बुळबुळीत तसंच. त्या तेलावरून आमची आजी घसरली आणि तिचा पाय मुरगळला. त्या तेलावरून घसरून आमच्या दादांचाही पाय मुरगळला. मग दादा गेले त्या मद्राशांकडे. म्हणाले-

‘माय ग्रँडमदर अ‍ॅक्च्युअली स्लेप्ट अँड गॉट स्प्रेन. कांट यू स्टॉप इट?’ त्यावर मद्राशी म्हणाले- ‘हाऊ कॅन बी स्टॉप धिस? धिस इज अवर रिलिजस बाथ.’
दादांनी प्रयत्न केले. ‘धार्मिक स्नान असेल, तर घरातल्या मोरीत करा. बाथरूम बुळबुळीत कशाला करता?’ असंही सांगून पाहिलं; पण मद्राशी म्हणाले, ‘बी विल नॉट स्टॉप इट अ‍ॅट एनी कॉस्ट.’ दादा म्हणाले, ‘बघू साल्यानो, दाखवतोच कशी तुमची रिलिजस बाथ आहे ती.’ दादा घरी गेले. बयो आजीला सांगितलं की, दुपारी कोळीण मासे विकायला येते ना, तिच्याकडून सडलेलं खारं घे. खारी मासळी छान असते तोेंडात टाकायला आणि तोंडात मारायलाही. तर बयो आजी म्हणाली-‘खारं बोंबील-बांगडा चांगला निवडून घेते.’

‘खारं कुजकं निवडून घे. चांगलं नकोय  आपल्याला.’ दादांनी पुन्हा सांगितलं. दुसर्‍या दिवशी कुजकं-नासकं खारं घरी आलं. घरात ठेववत नव्हतं इतका घाणेरडा वास त्याला होता. मग दादांनी आईला सांगितलं की, चांगले निखारे फुलव. कोळसे पेटव. तोपर्यंत दादांच्या डोक्यात काय आहे, हे कुणालाच कळत नव्हतं. दादा पेटते निखारे घेऊन बाहेर आले. पाटावर बसले. कुणालाच कळत नव्हतं. विस्तवाभोवती रांगोळी काढली आणि ‘ओम्-स्वाहा...’ असा मंत्र पुटपुटत एकेक खारं त्या विस्तवात टाकायला सुरुवात केली. सगळीकडे नाक दाबून धरण्याएवढी दुर्गंधी पसरली. त्या घाणीचा धूर शेजारच्या सगळ्या मद्राशांकडे जाईल अशी फुंकणी मारली. वासाने हैराण होऊन ते सगळे शाकाहरी मद्रासी-रिलिजस बाथवाले उंदरांसारखे बाहेर आले. 

‘व्हाट इज धिस मिस्टर ठाकरे... कांट यू स्टॉप धिस?’
‘नो नो वी कांट स्टॉप. धिस इज अवर रिलिजस थिंग,’ दादा उत्तरले.
‘हाऊ मिनी डेज इट विल गो?’
‘टेन डेज, मिनिमम. वी कांट स्टॉप धिस फायर.’ मद्रासी लागले गयावया करायला. दादा म्हणाले- ‘यू स्टॉप युवर रिलिजस बाथ, आय विल स्टॉप माय रिलिजस आहुती.’

‘...असे आमचे दादा ‘टीट फॉर टॅट’ करणारे होते. समजलं? त्यांच्याकडूनच शिकलो आम्ही काट्याने काटा कसा काढावा ते,’ असं म्हणून बाळासाहेब अचानक गायब झाले आणि माझे स्वप्न संपले.

(संदर्भ : बाळासाहेबांची भाषणे-विचारांचे सोने.)