Sun, Dec 17, 2017 07:59होमपेज › Bahar › नाताघरी नाचे माझा

नाताघरी नाचे माझा

Published On: Dec 03 2017 12:44AM | Last Updated: Dec 02 2017 8:27PM

बुकमार्क करा

प्रा. सुहास द. बारटक्के

‘काय हणमंतराव, सकाळी-सकाळीच गाढवं हाकीत कुठे निघालात?’ ....मॉर्निंग वॉक करताना वाटेत भेटलेल्या-गाढवं हाकीत चाललेल्या हणमंत कंत्राटदाराला विचारलं.
‘कुठे म्हणजे? संघात निघालोय...’
‘खरेदी-विक्री संघात गाढवांची विक्री नाही होत, हणम्या.’
‘विक्री नाही करायचीय.’
‘मग, काय करायचंय?’

‘गाढवांची माणसं कराची आहेत. तेवढेच हुशार मजूर येतीलना कामासाठी.’
‘म्हणजे? काय ते कळलं नाही.’
‘अहो, काल दिवसभर टी.व्ही.वर भाऊ नाही का सांगत होते की, संघात गेल्यावर संघाच्या शिस्तीनं गाढवाचाही माणूस होतो.’
‘अहो, ते असं शब्दश: घ्यायचं नसतं. त्यांना म्हणायचं होतं की, गाढवंही माणसासारखी शहाणी वागायला लागतात.’

‘मग, तेच तर हवंय मला. अहो, दिवसाउजेडी माझी गाढवं नको तिथं ओरडतात. उगीच दुसर्‍यावर दुगाण्या झाडतात. दररोज कुठे ना कुठेतरी घाण करतात. सगळं मला निस्तरावं लागतं बघा. काल टी.व्ही.वर भाऊनी संघाबाबत सांगितलं आणि ठरवूनच टाकलं, उद्या आपली गाढवं संघात दाखल करायची.’ 

‘अहो, तो हा संघ नव्हे बरं का... तो संघ वेगळा. कडक शिस्तीचा. माणसं घडवणारा; पण काय हो, तुमची गाढवं जर इतका त्रास देत असतील, तर ठेवता कशाला जवळ?’
‘म्हणजे?’

‘म्हणजे, दुसरीकडे पाठवलीत, तर निदान तुम्हाला सारखी-सारखी अडचणीत तरी आणणार नाहीत. शिवाय, दुसरीकडे गेल्यावर दुसर्‍यांना अडचणीत आणून तुमच्यावर उपकारच करतील ना?’
माझ्या बोलण्याचा अर्थ नीटसा ध्यानी न आल्यानं हणम्या डोकं खाजवत गाढवं घेऊन निघून गेला. मी परत आलो. तत्काळ श्रीनाथ भाऊंना फोन लावला.
‘भाऊ, आहात कुठे हल्ली? कुठे असता? काय करता? पूर्वी मंत्री होतात तेव्हा रोज-रोज टी.व्ही.वर दिसायचेत. तुमचं कडक आवाजातलं रोखठोक बोलणं खूप आवडायचं आम्हाला.’
‘ते आमचं रोखठोक बोलणंच आडवं आल ना? म्हणजे इतकी वर्षं शिस्तीन वाढलो. मर मरेस्तोवर काम केलं. लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं. निवडून आलो नि मंत्री झालो.’

‘होय भाऊ, खरंतर तुम्हीच सी.एम. नाहीतर डेप्युटी सी.एम. तरी हवे होतात.’
‘खरं बोलताय ना? की तुम्हीसुद्धा त्यांच्यासारखेच मला हरभर्‍याच्या झाडावर चढवत आहात?’
‘खरचं सांगतो, तुमचा आवाका मोठा. जरब मोठी, पक्षाला आधार मोठा.’ 
‘नेमकं तेच नडलं ना? त्यांना भीती वाटली, आम्ही त्यांना सरपास करणार... झालं तिथून सुरू.’
‘म्हणजे?’

‘म्हणजे काय, आम्ही डोईजड होतोय, असं वाटलं असेल त्यांना. निघाले काटा काढायला. म्हणजे ‘डी’ गँगशी संबंध काय आणि फोनाफोनी काय. कुठूनतरी दुसर्‍याच्या मागे शुक्‍लकाष्ठ लावायचं आणि त्याची बोलती बंद करायची.’
‘हां, तेच म्हणतोय मी... तुमची बोलती कोण बंद करणार? ...काल म्हणे, खूप चांगलं बोललात तुम्ही.’
‘कुठलं म्हणताय?’
‘हेच की, संघाच्या शिस्तीत गाढवाचाही माणूस होतो.’
‘मग, बरोबरच आहे. तिथेच माणसं घडतात. आम्हीही घडलो.’

‘पण, मग भांडलात कशाला, सी.एम.शी? फार जोरात बोललात. नको-नको ते चव्हाट्यावर आणलंत?’ 
‘खरंय... माझा स्वभाव गप्प बसणार्‍यातला नाही. आज उगीचच वाटतं, इतकं बोलण्याचा गाढवपणा करायला नको होता?’
‘बरोब्बर! तेच म्हणतोय मी.  तुमच्या कालच्या बोलण्याचा नेमका तोच अर्थ निघतो ना?’
‘कोणता हो?’

‘गाढवपणा केला की, संघाच्या शिस्तीचे धडे गिरवण्यासाठी पुन्हा ‘स्वयंसेवक’ बनावं लागतं. सत्तेची खुर्ची सोडून हातात लाठी घेऊन नम्रपणे प्रणाम करावा लागतो. एरव्ही खरं सांगू का भाऊ, माणूस म्हणून तुम्ही खूप चांगले आहातच. म्हणूनच संघाच्या शिस्तीविषयी एवढं रोख-ठोक बोललात!’
-पलीकडून फोन कट् केल्याचा आवाज आला.

चिडले असावेत, थोडा डोक्यावर बर्फ ठेवला असता आणि तोंडात साखर, मग आज ही वेळ आलीच नसती ना? ‘नाथा घरी नाचे माझा...’ असंच म्हटलं असतं ना आम्ही..?