Wed, Apr 01, 2020 14:41होमपेज › Bahar › चैतन्याचा चैत्रोत्सव

चैतन्याचा चैत्रोत्सव

Last Updated: Mar 21 2020 10:45PM
वैजनाथ महाजन

वसंत ऋतूची चाहूल लागताच सहजपणे मन चैत्राच्या आगमनासाठी नेहमीच उत्सुक होत असते. खरे तर वसंतोत्सव म्हणजेच चैत्राचे वाजत-गाजत आगमन होणे आणि आपले मन आणि देहसुद्धा सर्वस्वी चैत्राचा होऊन जाणे, असाच त्याचा मला आजवर अर्थ वाटत आला आहे. कारण, शिशिर संपत असताना जी उन्हाची तिरीप जाणवू लागते. ती येणार्‍या चैत्राची नांदीच असते आणि आता शाळकरी मुलांच्या शाळा सकाळच्या होणार असतात. यातूनच आपल्या दारी चैत्राचे आगमन व्हायचे असते. कडकडीत उन्हाळा आता कुठे सुरू होणार असतो; पण चैत्राचे ऊन म्हणजे उत्साहाचे आगळेवेगळे वारे घेऊन येणारे असेच असते. मधूनच वळीव आपली चुणूक दाखविणार असतो. खरे तर वळीव हा रूढ शब्द आहे.

आपण त्याला अवकाळी करून त्याच्यावर तसा धडधडीत अन्यायच केला आहे. त्यामुळे चैत्रात वळवाच्या सरी पडायलाच हव्यात आणि उकाड्याचे तात्पुरत्या गारव्यात लिलया रूपांतर व्हायलाच हवे. अशातच गारा पडल्या, तर मुलांचा अवघा आनंद चैत्रमय होऊन जात असतो. त्यांना असलेल्या उन्हाची वा उद्याच्या आणखीन कडक उन्हाची जाणीव होण्याचे काहीच कारण नसते. कारण, मुलांना सकाळच्या शाळांनी हुंदडण्यासाठी वेळ देऊ केलेला असतो आणि शाळकरी मुलींना दारासमोर चैत्रांगण रेखण्याची आयतीच संधी मिळालेली असते. 

एका चांगल्या मराठी लेखकाने या दिवसांचे वर्णन ‘जांभळ्या करंवदांचे दिवस’ असे केलेले आहे. खरे तर चैत्रात जांभूळ आणि करवंद वारेमाप येतात, असे काही म्हणता यायचे नाही. कारण, ही खासियत वैशाखाची असते. चैत्रात फक्त येणार्‍या अशा दिवसांची चुणूक अनुभवायला मिळत असते इतकेच म्हणता येईल; पण यापुढे जाऊन चैत्राचे हे दिवस म्हणजे सर्वार्थाने जत्रा-यात्रांचे दिवस असे मात्र निश्चित म्हणता येईल. कारण, कधीकाळी खेडोपाडी श्रद्धा आणि मनाला रिझविणारी रंजकता म्हणजेच जत्रा-यात्रा होत.

यात पाळणे आणि मौजमजा असेच एकेकाळी याचे स्वरूप होते. अशा जत्रा प्रामुख्याने ग्रामदैवतांच्या व नवसाला पावणार्‍या असंख्य देवदैवतांच्या असत. त्यात  मौजमजा होती आणि त्याचबरोबर देवाच्या सामूहिक दर्शनाचा अनोखा आनंद असायचा. त्यामुळे चार पैसे खर्च झाले तरी  काही वाटायचे नाही. चैत्राचा खरा सत्त्वगुणी साक्षीदार म्हणजे  आपला गुढीपाडवा होय. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा पवित्र पाडवा आपल्या नववर्षाची ओळख आहे. त्यामुळे पाडव्याच्या निमित्ताने  खरे चैत्राचे स्वागत होते. या दिवशी पाडव्याच्या निमित्ताने कधीकाळी मुलांची नावे शाळेत दाखल करण्याची फार चांगली पद्धत होती आणि त्याचवेळी पाडव्यादिवशी  गुढीपाडवा हा सण शाळा-शाळांतून पाटी पूजनाने होत असे. मुलांना पाटीचे जे अप्रूप वाटायचे ते या दिवशी.  शाळेत चिरमुरे वाटून पाटीचे पूजन करून मुले घरी परतत असत आणि गुढीला वंदन करून घरात जात असत. 

हे सारे चैत्रात होत असताना चैत्र आपल्याच गतीने पुढे जात असायचा आणि उन्हाळी भाज्या, फुलांनी बहरून येत असायचा. निसर्गाचा चमत्कार असा आहे की, काही काही फुले फक्त चैत्रातच येतात आणि चैत्रातच त्यांचा बहर ओसंडून येत असतो. गुलमोहर, पांगिरा, बहावा हे सारे चैत्राच्या साक्षीनेच फु लत असतात आणि बघणार्‍यांना तोंडात बोट घालायला लावत असतात. यामुळे गुलमोहराच्या वृक्षाला साहित्यात सहजच बहर आला आणि तो अगदी आजतागायत टिकून राहिला. म्हणजे भेटायचे कुठे तर त्या गुलमोहराखाली, अशा अनेक गुलमोहरांच्या आठवणी मराठी साहित्यात कायमच्या अधोरेखित झालेल्या आहेत. ज्यांना उन्हाची अकारण अथवा सकारण भीती वाटत असते, त्यांच्याकरिता चैत्र अवतीर्णच होत नसतो. तर ज्यांना उन्हे अंगावर घेऊन झोकात चालत राहावे, असे वाटते त्यांच्यासाठीच चैत्र उगवत असतो आणि फुलतपण असतो. त्यामुळे चैत्राचे गाणे निसर्गात  ऐकायचे  आणि  निसर्गाने आपणाला देऊ केलेल्या चैत्रातच खर्‍या अर्थाने हरवून जायचे, हाच खरा चैत्रोत्सव असतो आणि त्याचा आनंद केवळ अपरंपारच असतो. हे निश्चित होय.