Thu, Apr 25, 2019 11:49होमपेज › Bahar › सर्प आणि घाेणस

सर्प आणि घाेणस

Published On: Aug 05 2018 1:26AM | Last Updated: Aug 05 2018 1:26AMप्रा. सुहास द. बारटक्के

समोर आभाळ काळंकुट्ट झालेलं. वाराही जोरात वाहू लागला. अचानक ढगांतून वीज चमकली आणि सुरू झाला तो विजांचा लखलखाट! त्या लखलखणार्‍या प्रकाशातून एक आकृती माझ्यासमोर अवतरली. डोळे फाडफाडून मी पाहत होतो... तेच ते निळ्या रंगाचं देखणं रूप... कमरेला व्याघ्रचर्म, हातात डमरू अन् त्रिशूळ... केसांच्या बुचड्याभोवती रुद्राक्षांची माळ... गळ्यातही रुद्राक्ष बाकी कंठ निळाच मोकळा मोकळा... 

नतमस्तक होत मी त्या निळसर मजबूत पायांवर लोटांगण घालत म्हणालो- 
‘साक्षात कैलासपती आपण?’
‘होय... माझ्या सेवकांनाच पाठवणार होतो; पण म्हटलं मामला गंभीर आहे, स्वतःच जावं.’ 
‘का? काय झालं भोलेनाथ महाराज?’ 
‘सगळं करून सवरून काय झालं विचारतोस?’ 
‘छे छे, देवाधिदेवा, मी काय केलं?’ 
‘त्या राजकारण्यांना सल्‍ले कोण देतं?’
‘सगळेच सल्‍ले मी नाही देत देवा, काही ठराविक राजकारणी माझे मित्र आहेत, ते विचारतात केव्हातरी, काहीतरी बस्स तेवढंच!’
‘भलत्यासलत्या आयडिया तुझ्याच डोक्यातून निघतात म्हणे.’ 
‘कसली आयडिया? आणि देवा, तुमचा गळा असा मोकळा मोकळा का दिसतो?’ 
‘ते तुझंच कर्तृत्व... काय असतं माझ्या गळ्यात?’
‘गळ्यात सर्पाची माळ... डोक्यावर नागाची फणा...’
‘तीच गायब केलीयस ना तू?’ 
‘काय, मी काय केलं?’

‘राजकारण्यांच्या सभेत साप सोडण्याची आयडिया कुणाची?, पांडुरंगाच्या यात्रेत साप सोडण्याची आयडिया कुणाची?, दुसर्‍यानं भरपूर गर्दी जमवली की, ती उधळण्यासाठी, सभा उधळण्यासाठी तिथं व्यासपीठावर साप सोडायची आयडिया कुणाची?, बोल कुणाचं हे डोकं?’ 

‘माझं नाही देवा, देवाशपथ सांगतो.’ 
‘म्हणजे पुन्हा माझंच नाव घेऊन खोटं बोलतोस? त्या राजकारण्यांसारखं? देवाशपथ सांगेन, ईश्‍वराला स्मरून शपथ घेतो की, असं म्हणायचं आणि पुढे सगळं खोटंच?’
‘तसं नाही देवा, खोट्याचं खरं आणि खर्‍याचं खोटं राजकारणात करावंच लागतं, असं म्हणतात.’ 
‘तोच तर नीचपणा आहे ना तुमचा? कुठं फेडाल ही पापं? थांब मी आता रेड्यासह यमालाच पाठवून देतो.’ 
‘नको नको देवा, तुम्ही तर साक्षात अल्पायुषी मानवाला दीर्घायुषी करणारे देव, तुम्हीच असे कोपलात तर समस्त राजकारण्यांनी जावं कुठं?’ 

‘कुठं म्हणजे? नरकात... इतकं गलिच्छ राजकारण केल्यावर दुसरं काय मिळणार? सभा उधळण्याचं नवं तंत्र- सभेत साप सोडणे- हे सापडल्यापासून प्रत्येक पक्षाचा जो तो उठतो तो साप पकडून जवळ बाळगतो, आज या पार्टीचा कोब्रा, उद्या त्या पार्टीची मण्यार! एकमेकांच्या सभा उधळण्यासाठी सापांना एवढी मागणी आलीय की, माझ्या गळ्यातला सापही त्या ड्युटीकरिता गेल्यामुळं माझ्या गळ्यातून गायब व्हावा?’ 

‘अरेच्चा! एवढं हे प्रकरण गळ्याशी आलंय होय? तरीच आपण कोपलेले दिसता. अहो, परवा सांगलीत सर्प पकडण्याची मोहीम जोरात सुरू होती. म्हटलं आता श्रावणातली नागपंचमी जवळ येतीय म्हणून असेल, तर दुसर्‍या पार्टीचे लोक पहिल्यावाल्यांच्या घरात सोडण्यासाठी सुस्त ‘घोणस’ नावाचा साप शोधत हिंडत होते. ते तिकडे सर्प सोडायला गेले की, इकडे त्यांच्या घरात घोणस अलगद नेऊन ठेवायचा, म्हणजे ते घरी आले की, हळूहळू हळूहळू खल्‍लास!’

‘इतका विषारी असतो घोणस?’
‘देवा काय सांगू? सर्प असतो जहाल विषारी आणि चपळ. त्याच्या जवळ कुणी आलं- छेड काढली- तरच चावतो; पण घोणस? घोणस सुस्त, शांत असतो. त्याच्यामुळेच सभेत पळापळ बिलकुल होत नाही; पण त्याच्या अंगावर जेवढ्या लोकांचे पाय पडतील तेवढ्या सगळ्यांनाच तो चावतो. तोही हळुवारपणे; पण माणूस मात्र हळूहळू हळूहळू मरतोच.’ 
‘अरेच्चा! असं असतं होय? तुम्हा राजकारण्यांचं डोकं कुठे चालेल सांगता येत नाही, मीही आता सर्पाऐवजी एखादा घोणस सापडतो का पाहतो.’ 
‘नको नको देवा, आधीच तुमचा कंठ हलाहल पिऊन निळा झालाय त्यात आणखी विष नको.’ 
...तेवढ्यात पुन्हा एकदा वीज चमकली. भगवान डोळ्यांसमोरून गायब होऊ लागले आणि पत्नीचा आवाज कानात घुमला. ‘अहो, उठताय ना? सात वाजले तरी ढाराढूर झोपलाय.’