Sun, Aug 18, 2019 06:03होमपेज › Bahar › राजकीय रंजकता

राजकीय रंजकता

Published On: Feb 10 2019 1:09AM | Last Updated: Feb 09 2019 9:49PM
वैजनाथ महाजन

राजकारण हा गुंडाचा खेळ आहे आणि राजकारण हे वारांगनेसारखे असते. ही विधाने सतत आपल्या कानावर पडत असतात. राजकारण अस्तिवात आहे, तोपर्यंत ती अशीच पडत राहणार. असे असले, तरी यातील गंमतीचा भाग असा, की हे मान्य करूनसुद्धा राजकारणात येऊ पाहणार्‍यांची आणि त्याचा अफाट आणि उद्दाम अनुभव घेणार्‍यांची संख्या काही घटत नाही आणि उद्या ती घटेल, असा भाबडा आशावाद बाळगण्यात फारसा अर्थ नाही. अलीकडच्या राजकारणात याच पद्धतीची आणखी एक भर पडलेली आहे आणि ती म्हणजे, पदासाठी राजकारण आणि राजकारणात पद मिळवण्यासाठी प्रचंड धडपड. ज्यांना पद नाही, त्यांना आपल्या राजकीय जीवनात काही अर्थ नाही, असे वाटते आणि पदावर असणार्‍यांना आपला अपेक्षित रुबाब वाढलेला दिसत नाही, असे वाटत असते. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना आपल्या पुढे मागे आपल्या शिष्योत्तमाची सतत लगबग सुरू असावी, असे वाटत असते आणि त्याकरिता त्यांच्या पुढे मागे पांढर्‍या झुली घालून मिरवणार्‍यांची संख्या उदंड झाली, की त्यांना आतून उकळ्या फु टत असतात.

याकरिता वारेमाप पैसा खर्चण्याची सर्वच राजकर्त्यांची एका पायावर तयारी असते आणि त्यातून त्यांना अपेक्षित असलेले परिणाम दिसू लागले, की धन्य धन्य वाटू लागते. याबरोबरच काही मंडळींचे म्हणणे असे आहे, की राजकारण ही एक नशा आहे. तो एक कैफ  आहे आणि कोणत्याही  नशेचा  अनुभव घेण्यासाठी माणसाचे मन नेहमीच आसुसलेले असते. म्हणून दारू ही घातक आहे, अशा कितीही जाहिराती फ डकल्या, तरी  पिणार्‍यांच्या संख्येत मात्र नित्यक्रमाने वाढच होताना दिसते. राजकारणाचे असेच आहे. म्हणून तर, आपल्याकडे नगराध्यक्षाचे पद तीन तीन महिन्यांनी वाटून इच्छुकांना देण्याची कसरत त्यांच्या वरिष्ठांना करावी लागते. अलीकडेच येणार्‍या निवडणुकीत सारे विरोधक एकत्र आले आणि त्यांनी निवडणूक जिंकली, तर पंतप्रधानपदाचीसुद्धा या पद्धतीने रया जाऊ शकेल, असा  राजकीय  अभ्यासकांचा अंदाज आहे. कारण, यापैकी प्रत्येक प्रमुखाला किमान ‘एक दिन का बादशहा’ तरी  होण्याची तीव्रतम इच्छा आहे; पण याकरिता आपली पात्रता काय, त्याची मात्र कुणालाच चर्चा नको आहे. म्हणजे, आजच्या जाहिरातबाजीच्या युगात निदान भिंतीवर झळकणार्‍या फलकावर तरी प्रत्येक जण भारताचा उद्याचा आधारस्तंभ असल्याचे जेव्हा आपण वाचतो, तेव्हा हसावे की रडावे, हेच कळेनासे होते. त्यामुळे ज्यांना त्यांची गल्लीसुद्धा पूर्णपणे ओळखत नाही. अशा माणसांनासुद्धा आपल्याकडे आमदारकीची आणि त्यापुढे जाऊन खासदारकीची स्वप्ने पाहण्याचा मुळीच मज्जाव नाही. म्हणून तर, भारतीय लोकशाही म्हणजे सर्वार्थाने लोकांचे राज्य, असे म्हणण्यास आता काहीच हरकत नाही. कुणीही उठावे आणि कोणत्याही महत्त्वपूर्ण पदाकरिता उभे राहण्याची स्वयंघोषणा करावी, असा सांप्रतचा  राजकीय काळ आहे. त्यामुळे जेवढे इच्छुक, तेवढे सारेच जण निवडून आले आणि विधानसभेत जाणार म्हणून हटून बसले, तर विधानसभा मैदानातच भरवावी लागेल.फ ार वर्षांपूर्वी  ‘म्युनिसिपालिटी’ नावाचे एक नाटक महाराष्ट्र रंगभूमीवर आले होते. तेही त्यातील भन्नाट राजकीय विडंबनामुळे तितकेच गाजलेले होते. आर्श्‍चय असे, की त्यात रंगविलेले त्या काळातील राजकारण आणि आजचे रंगतदार राजकारण यात तसूभरही फ रक नाही.

त्यामुळेच राजकारण हे या देशात कुणालाच वर्ज्य नाही, असा याचा स्पष्ट अर्थ आहे. त्यामुळे जर कुणी विधानसभेचा आखाडा झाला, संसदेचे  रणमैदान झाले, असे म्हटले तर ते योग्यच वाटेल, हे  निश्‍चित. महाराष्ट्राचे हे थोर नेते अनेक वेळा मुख्यमंत्री झाले आणि त्यांची सामाजिक व राजकीय प्रतिष्ठा त्यांच्या हयातीनंतरही आज तितकीच अबाधित आहे. त्यांच्या विरोधात एका अत्यंत फ डतूस माणसाने अर्ज भरला तेव्हा लोकांनी त्याला विचारले की, अरे एवढ्या मोठ्या माणसाविरुद्ध तू का उभा राहिला आहेस? आणि याला त्याने जे मासलेवाइक उत्तर दिले आहे. ते लक्षात घेतले, म्हणजे आपल्या लोकांची  राजकीय तृष्णा किती प्रबळ आहे, हे सहज लक्षात येते. तो म्हणला, मी कुठे त्यांच्याविरुद्ध उभा राहिलो आहे? त्यांनीच माझ्या विरुद्ध अर्ज भरला आहे. असे म्हणतात की, महाराष्ट्राचे राजकारण हे पहिले वेड आहे. त्यामुळे कोणत्याही मराठी माणसाच्या खिशात चार पैसे खुळखुळू लागले, की त्याला  सर्वप्रथम निवडणुका सूचतात आणि टप्प्याटप्प्याने  त्याची निवडणूक तृष्णा वाढत जाते. मग माणसे कौतुक करू लागतात. सरपंचाचा मंत्री झाला. इत्यादी इत्यादी. आता यात तसे नवीन काहीच नाही.

महाविद्यालयात कधी काळी सर्वात ज्येष्ठ प्राध्यापक प्राचार्य व्हायचा. त्यातलाच हा दुसरा प्रकार आहे. त्यामुळे राजकारणात नेमके काय मिळवायचे आणि काय गमवावे लागेल, याचा कधीच अंत लागत नाहीत. राजकारणात घरदार धुवून गेले, असे कधी तरी संध्याछाया भिववीत असताना शांतपणे देवळाच्या कट्ट्यावर बसून इतरे जनांना हा त्या आठवणी सांगणे हापण कथित निवृत्त राजकारण्याचा आवडता उद्योग असतो. आपले राजकारण वयाच्या कोणत्याही टप्प्यापासून सुरू करता येते आणि ते अगदी अखेरच्या श्‍वासापर्यंत टिच्चून करता येते. त्याला सेवानिवृत्तीची अट नाही. उभे राहण्याकरिता प्रत्यक्ष उभे राहता आलेच पाहिजे, अशीपण अट नाही.

दोन पायांवर जरी उभे राहता आले नाही, तरी अर्ज भरण्याची मुभा आहे. त्यामुळे आपले राजकारण हे तसे सर्वसमावेशक आणि सर्वानंदी अशा पद्धतीने पुढे जात राहते. एकदा का  राजकारणात वाजतगाजत प्रवेश झाला, की मग पाय रोवता येतात. कोणतीही भाडी भरावी लागत नाहीत. सामान्य माणसाला ज्या काळज्या भेडसावत असतात, अशा कोणत्याही काळज्या राजकारण्याच्या आसपाससुद्धा  फि रकू शकत नाहीत. आणि पुन्हा समाजाला उपदेशाचे डोस पाजण्याचा आयताच परवाना मिळून जात असतो. म्हणून, राजकारणाइतके रम्य काही नाही आणि राजकारणात रमण्याइतकी  दुसरी धन्यता नाही, असे जर आम्हा पामरांना  वाटले, तर ते अगदीच टाकाऊ आहे, असे कोणत्याही राजकारण्याने म्हणण्याचे कारण नाही. पुन्हा यात  बोलण्यावरून हातघाईला येणे, उद्धार करणे, पाण्यात पाहणे, कुरघोड्या करणे, असले अनेक लक्षवेधी खेळ सतत सुरू ठेवण्याचीपण पूर्ण मुभा असते. त्यामुळे प्रत्येक काळात तरुणांच्या झुंडीच्या झुंडी राजकारणात मोठ्या आनंदाने सामील होत असतात. आणि ‘की  जय’च्या घोषणा करत करत पक्के राजकारणी होण्यात धन्यता मानत असतात. असे असले, तरी  राजकारणी कोणत्याही कराशिवाय आपली रोज बर्‍यापैकी करमणूक करत असतात.

याचे त्यांना श्रेय द्यावेच लागेल. कारण, रोज आपल्या प्रांपचिक विवंचनांनी हैराण झालेला सामान्य माणूस जेव्हा राजकारण्यांची झोकदार छबी पाहत असतो. तेव्हा तो आतून आनंदून जात असतो. कारण, कधी असा राजकारणी त्याचा गल्लीवाला असतो, तर कधी गाववाला असतो. त्यामुळे तो आपलाच आहे आणि आपल्यासाठी  झटतो आहे, अशा वृथा आनंदात त्याला एक आपसूक समाधान मिळत असते. आणि त्यातून त्याची राजकीय भूकपण भागत असते. याकरिता त्याच्या तोंडावर कधी  आश्‍वासने फेकली जात असतात; तर कधी जाहीरनामे त्याच्या हाती ठेवले जात असतात. काय असेल ते असो, अशा राजकारणात पावन व्हावे, असे प्रत्येकाला वाटू लागले, तर हा  आपण आपल्या राजकारणाचा खराखुरा  विजय मानण्यास हरकत नाही. राजकारण हे असे सर्वव्यापी आणि सर्वांना सदैव खुणावणारे असते, हे मात्र त्रिवार सत्य आहे.