Sun, Feb 24, 2019 02:07होमपेज › Bahar › बाजारझळा

बाजारझळा

Published On: Feb 11 2018 1:02AM | Last Updated: Feb 10 2018 9:02PMसंदीप पाटील, 
गुंतवणूक सल्‍लागार-शेअर बाजार अभ्यासक

सध्या काही कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होत आहेत. त्यातील नफावृद्धीचा सकारात्मक परिणाम बाजारावर होतो. याखेरीज दिग्गज कंपन्यांच्या समभागांच्या मूल्यामध्ये घट झाल्यास नवे गुंतवणूकदार दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवून त्यांची खरेदी करतात. आणखी एक कारण म्हणजे, जागतिक शेअर बाजारातही या दिवशी वाढ झाल्याचा परिणाम दिसून आला; मात्र शुक्रवार पुन्हा ‘ब्लॅक फ्रायडे’ ठरला...

काही वर्षांपूर्वीपर्यंत शेेअर बाजाराकडे वळणार्‍यांची संख्या खूप कमी होती. याचे कारण ‘बाजाराचा काय भरोसा नाही’ असा विचार जनमानसात रुजला होता. त्याचबरोबर शेअर बाजाराच्या कार्यपद्धतीत आणि प्रणालीतही आजच्या इतक्या सुधारणा, नियमन झालेले नव्हते. कालौघात मुंबई शेअर बाजारात अनेक सुधारणा होत गेल्या आणि निर्देशांकही हळूहळू वर सरकू लागला. परिणामी, समभागांमध्ये गुंतवणूक करणार्‍यांची संख्या वाढत गेली. अर्थात, आजही ती फारशी नाही. साधारणपणे एकूण लोकसंख्येच्या 2.5 टक्के लोक शेेअर बाजाराशी जोडलेले आहेत, असा अंदाज आहे. मात्र, यामध्ये होणारी उलाढाल काही लाख कोटींच्या घरात असते. विशेष म्हणजे, इतकी अवाढव्य उलाढाल असणार्‍या या बाजारावर देशातील-विदेशांतील छोट्यातील छोट्या घटनेचाही सूक्ष्म अथवा मोठा परिणाम दिसून येतो.

कधी मान्सूनचा अंदाज, तर कधी तेलदरातील किमतींमधील घसरण अथवा वाढ. अशा काही घटनांसंदर्भातील बातम्या जरी येऊन धडकल्या तरी, शेअर बाजाराचा निर्देशांक हेलकावे घेतो. या सततच्या हेलकाव्यांमुळेच गुंतवणूकदार काहीसे धास्तावलेले असतात; मात्र बाजाराचा निर्देशांक कितीही सैरभैर होत असला तरीही गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास गुंतवणूकदारांनी अन्य पर्यायांच्या तुलनेत भरघोस  कमाई केलेली दिसून येते. विशेषतः 2017 हे वर्ष शेअर बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. या वर्षात निर्देशांकाने नवनवे विक्रम प्रस्थापित केले. 2018 च्या जानेवारी अखेरीपर्यंत हा सिलसिला सुरू राहिला; मात्र केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होण्याचा मुहूर्त आला आणि बाजारात घसरण दिसून  येऊ लागली. अर्थमंत्र्यांनी शेअर बाजारातील दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कराची (लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स) घोषणा केली आणि निर्देशांकाने जोरदार आपटी खाल्ली.

तब्बल 1200 अंशांनी सेन्सेक्स कोसळला. गेल्या आठ दिवसांमध्ये शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 5 लाख कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 2 फेब्रुवारी, 6 फेब्र्रुवारी हे दिवस शेअर बाजारासाठी ब्लॅक फ्रायडे, अमंगळवार ठरले. निर्देशांकात ऐतिहासिक घसरण दिसून आली. सरत्या आठवड्यात ही घसरण थांबून निर्देशांक वधारला असला, तरीही येणार्‍या काळात त्यामध्ये घसरणीची शक्यता आहे. काही जाणकारांच्या मते सेन्सेक्स 31500 पर्यंत, तर निफ्टी 9500 पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. 

मागील दोन आठवड्यांत झालेल्या घसरणीला दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावरील कराची घोषणा हे एक कारण असले, तरी ते एकमेव नाही. अर्थमंत्र्यांचा फिस्कल डिफिसिटबाबतचा अंदाजही बाजारावर नकारात्मक परिणाम करून गेला. त्याचबरोबर अन्यही काही कारणांमुळे बाजार गडगडला. अलीकडील काळात अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरांमध्ये वाढ सुरू केली आहे. याचे कारण तेथे महागाई वाढण्याची शक्यता बळकट होत चालली आहे. सध्या असणारा 1.7 टक्क्याचा महागाई दर 2 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेत अंदाजापेक्षा अधिक चांगली वाढ आणि अमेरिकन नागरिकांच्या उत्पन्‍नामध्ये झालेली लक्षणीय वाढ यांमुळे महागाई वाढ अटळ मानली जात आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये जगातील एकंदरीतच विकसित देशांमध्ये नागरिकांच्या उत्पन्‍नात 2.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महामंदीच्या काळाचा विचार करता, ही वाढ लक्षणीय आहे. सर्वाधिक वाढ बिगरकृषी क्षेत्रातील उत्पन्‍नात झाली आहे. याखेरीज जानेवारी महिन्यात अमेरिकेत बेरोजगारी कमी होऊन ती 4.1 टक्क्यांवर आली आहे.  परिणामी, अमेरिकेत व्याजदरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम बाँड यिल्ड वाढण्यात झाल्यामुळे अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण दिसून आली आहे. नव्या वर्षामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचा दर 3.9 टक्के असूून तो खूप चांगला मानला जात आहे.

उत्पन्‍न वाढल्यास लोकांच्या हाती अधिक पैसे येतात. साहजिकच, हा पैसा वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी खर्च केला जातो. परिणामी, वस्तू-सेवांच्या इंडस्ट्रीचा नफा वाढतो आणि अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग वाढतो; मात्र त्याच वेळी उत्पन्‍न वाढल्यामुळे महागाईही वाढण्याची शक्यता बळावते. हीच भावना बाजारावर नकारात्मक परिणाम करून गेली. दुसरे एक कारण म्हणजे, बाँड यिल्डमध्ये होणारी वृद्धी. जागतिक स्तरावर जवळपास सर्वत्रच बाँड यिल्डमध्ये वाढ दिसून येत आहे.     

 सॉवरीन बाँड्स हे रिस्कफ्री मानले जातात. अशा रिस्कफ्री मनीचे मूल्य वाढू लागल्यास बाजारातून गुंतवणूकदार आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात करतात, असे दिसून आले आहे. अन्य एक कारण म्हणजे, अमेरिकेतील केंद्रीय मध्यवर्ती बँक असणार्‍या फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखपदी जेरॉम पॉवेल यांची वर्णी लागली आहे. यापूर्वी या पदावर जेनेट येलेन होत्या आणि त्या मार्केट फ्रेंडली मानल्या जात होत्या. येलेन यांना महागाई आणि व्याजदर दोन्हीही नियंत्रणात ठेवण्यात यश आले होते. जेरॉम पॉवेल हे वकील आहेत. तसेच त्यांच्या क्षमतेविषयी लोकांमध्ये साशंकता आहे.

याचाही नकारात्मक परिणाम गुंतवणूकदारांवर होत आहे. या सर्वांमुळेच डाऊ जोन्स 1175 अंशांनी कोसळला. 2011 नंतरची ही सर्वात मोठी पडझड होती. डाऊ जोन्समध्ये नायके, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल, बोईंग, 3 एम, अमेरिकन एक्स्प्रेस, कोकाकोला, डिस्ने, जनरल इलेक्ट्रिक, आयबीएम, इंटेल, जॉन्सन अँड जॉन्सन, जेपी मॉर्गन चेज, प्रॉक्टर अँड गॅम्बल यांंसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यांच्या समभागांच्या मूल्यात मोठी घसरण दिसून आली. भारतीय शेअर मार्केटवर अमेरिकन मार्केटचा परिणाम होत असल्याने आपल्याकडेही या भूकंपाचे झटके बसले. 

साधारणपणे बुधवारपासून शेअर बाजारामध्ये सुरू असलेली पडझड थांबली आणि गुरुवारी बाजार नव्याने झेपावला. अर्थातच, याबाबतची अटकळ होतीच. कारण, सध्या काही कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होत आहेत. त्यातील नफावृद्धीचा सकारात्मक परिणाम बाजारावर होतो. याखेरीज दिग्गज कंपन्यांच्या समभागांच्या मूल्यामध्ये घट झाल्यास नवे गुंतवणूकदार दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवून त्यांची खरेदी करतात. आणखी एक कारण म्हणजे, जागतिक शेअर बाजारातही या दिवशी वाढ झाल्याचा परिणाम दिसून आला; मात्र शुक्रवार पुन्हा ब्लॅक फ्रायडे ठरला आहे. वर उल्लेखल्याप्रमाणे येणार्‍या काळात चढउतारांचा हा सिलसिला कायम राहणार असून यामध्ये घसरणीची तीव्रता अधिक राहील. 

गुंतवणूकदारांनी काय करावे?

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊ नये आणि लगेचच आपला पैसा काढून घेण्यासाठी घाईही करू नये. त्याहून अधिक महत्त्वाची बाब म्हणजे, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्‍वास ठेवू नये. कारण, शेअर बाजार हा सेंटीमेंटस्वर चालत असतो. त्यामुळे इथे काही घटक सेंटीमेंटस् तयार करून आपला फायदा करून घेत असतात.

म्हणूनच श्रद्धा आणि सबुरी ठेवून गुंतवणूकदारांनी संयमाने पावले टाकावीत. शेअर बाजारात घसरण झाली की, बहुतांश गुंतवणूकदार एक किंमत निश्‍चित करतात आणि त्या किमतीपर्यंत शेअर घसरला की तो विकण्याचा निर्णय घेतात. बहुतेकदा ही किंमत खरेदीच्या वेळी दिलेल्या रकमेएवढी असते; मात्र असा निर्णय आततायीपणाने घेऊ नये. कारण, बाजाराने आजवर अनेकदा युटर्न घेतला आहे. अशा वेळी आपला निर्णय नुकसानदायक ठरणारा नसला तरी चांगल्या नफ्याची संधी चुकवणारा ठरू शकतो. वास्तविक, हा काळ दीर्घकालीन गुंतवणुकीच्या द‍ृष्टीने चांगला आहे. सेन्सेक्सने 2017 मध्ये 28 टक्के नफा मिळवून दिला आहे. याच काळात बीएसई मिड कॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकामध्ये 48 ते 53 टक्के वाढ झाली आहे. अनेक मिडकॅप आणि स्मॉलकॅपमधील समभागांचे मूल्य 50 टक्क्यांनी वाढले आहे.

अर्थात, स्मॉलकॅपमध्ये गुंतवणूूक करताना कंपनीची माहिती बारकाईने घ्यायला विसरू नका. साधारणपणे गुंतवणूकदारांनी 50 टक्के रक्‍कम ही लार्जकॅपमध्ये गुंतवली पाहिजे, 30-35 टक्के स्मॉल आणि मिडकॅपमध्ये गुंतवली पाहिजे. उर्वरित 5 ते 15 टक्के रक्‍कम रोखीत ठेवावी, असे मानले जाते. सध्याच्या काळात लार्जकॅपमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगली संधी असली तरी इन्फ्रास्ट्रक्चर, फार्मा यांसारख्या शेअर्सना प्राधान्य देणे योग्य ठरेल. 

अर्थसंकल्पातील बदलत्या तरतुदींमुळे आणि शेअर बाजारातील घसरणीमुळे म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूकदारही धास्तावले आहेत; मात्र आज एका बाजूला रिअल इस्टेटच्या क्षेत्रात असलेली मंदी, बँकांमधील आणि अन्य वित्तीय संस्थांमधील ठेवींवरील घटत चाललेले व्याजदर यांची तुलना करता शेअर बाजारातील गुंतवणूकही फायदेशीरच आहे. त्यासाठी केवळ संयम आणि अभ्यासपूर्ण निरीक्षण आवश्यक आहे. त्यामुळे बाजार घसरला म्हणून पॅनिक होऊ नका, एवढेच!