Mon, Nov 20, 2017 17:20होमपेज › Bahar › दिसते मला सुखचित्र (!) नवे

दिसते मला सुखचित्र (!) नवे

Published On: Nov 12 2017 12:52AM | Last Updated: Nov 11 2017 9:06PM

बुकमार्क करा

सुप्रिया वकील

या सगळ्यात सर्वात भयप्रद असायचं ते ‘मेमरी ड्रॉईंग’ म्हणजे स्मरणचित्र! त्याचं वर्णन केवळ अद्भुत एवढ्या दोनच शब्दांत करता येऊ शकेल. अगदी मोजके अपवाद वगळता वर्गात बाकी सगळे या बाबतीत एकाच स्तरावर असत. कुठल्याही गोष्टीला उंची, खोली, मिती, विशिष्ट ‘प्रपोर्शन’  वगैरे असत, भौतिकशास्त्राचे नियम वगैरे लागू होतात ते प्रत्यक्षात, चित्रात नव्हे, अशी ठाम खात्री असल्यासारखं, चित्रात सगळ्या गोष्टी एकाच पातळीवर... एकाच स्तरावर असत! या चित्रासाठी विषयसुद्धा कसे ‘चुन चुन के’ दिले जात.

या चित्रात काही गोष्टी अगदी समान असत... सगळ्यांच्याच वहीत. म्हणजे असं, बहुतेकशा चित्रांना निळे डोंगर, त्यातून प्रसन्‍नपणे डोकावणारा सूर्य, काही लहान-मोठी झाडं, नदी (त्या नदीत होडी मस्ट..! काहीवेळा ती वल्हवणारा नावाडीसुद्धा असे) अशी पार्श्‍वभूमी हमखास असे. ‘इव्हेंट’ कोणतीही असो, ती डोंगरातून उगवणार्‍या सूर्याच्या साक्षीनंच व्हावी लागत असे. दिवाळी, गणेशोत्सव, झेंडावंदन, क्रीडा... काहीही असो, डोंगरांतून उगवणारा सूर्य ‘पॉज’ घेऊन थांबलेला असे आणि हो, आभाळात उडणारे एक-दोन पक्षीही असत, ते सूर्याला जवळपास टेकलेलेच असत. अशा पार्श्‍वभूमीवर मग चित्राचा मुख्य विषय रेखाटला जात असे. म्हणजे, चित्राचा विषय ‘नागपंचमी’ असा असला की, एखाद्या झाडाला तंतूवजा दोरीनं बांधलेल्या झोपाळ्यावर उंच झोका घेणार्‍या मुली, जिगाला लटकलेली मुलं (ते जिग गावाच्या प्रवेशद्वाराइतकं उंच!), दोन-तीन बघे... असं द‍ृश्य असायचं. काहींच्या चित्रात तर साक्षात नागोबाची पूजासुद्धा असे. मग त्या चित्रात, रस्त्यातच वेटोळं घालून फोटो काढायला बसल्यासारखा नागोबा आणि त्याच्या समोर बसून पूजा करणारी बाई, असं द‍ृश्य असायचं (असं द‍ृश्य फक्‍त चित्रातले असू शकेल नाही!). एखाद्याच्या चित्रात गारुडी असायचा. स्वत:च्या उंचीपेक्षा जास्त उंच फेटा बांधलेला गारुडी पुंगी वाजवतोय आणि नाग व्यायाम करत असल्याच्या ‘पोज’मध्ये त्याच्यासमोर डुलतोय, असं पाहायला मिळायचं.

काहीजणांच्या चित्रात तर नाग शेपटीच्या टोकावर ताठ उभा असे! अशाच प्रकारे सगळी चित्रं साकारली जात असत. विहिरीवर पाणी भरणार्‍या बायका, संचलन करणारी मुलं, रक्षाबंधन, एस.टी. स्टँडवरचं द‍ृश्य, बाग... कुठलंही चित्र घ्या, त्यात सगळ्या माणसांच्या हालचाली रोबोटसारख्या वाटत... ‘रिस्ट्रिक्टेड’ आणि फक्‍त काटकोनातच होणार्‍या! सर्व मनुष्यप्राण्यांची पावलंसुद्धा काटकोनात वळलेली... डावा पाय डाव्या बाजूला आणि उजवा पाय उजव्या बाजूला!

आणि सगळ्या माणसांना कोपर नामक अवयव नसायचा... सगळ्यांचे दोन्ही हात खांद्यापासून निघत ते अंगापासून दूर जात असत आणि सगळी माणसं ताठलेली व अवघडलेली वाटत. चित्रातल्या सगळ्या प्राणिमात्रांना अस्थिव्यंग हमखास असे. कुणाचे पाय हत्तिपाय झाल्यासारखे, तर कुणाचा एक पाय जाड आणि दुसरा सडपातळ. हात-पायांची बोटंही कमी-जास्त लांबीची आणि आकाराची असत.

या चित्रांतल्या दुनियेतली मुडदूस झाल्यासारखी दिसणारी मुलं कधी रायआवळ्या एवढ्या फुटबॉलनं खेळत, हाताच्या चौपट आकाराची राखी बांधत, चित्रातल्या बायका कोपरात हात न मुडपता घागर कंबरेवर घेत. चित्रातले कुत्रे-मांजर-घोडा-गाय-बैल असे प्राणीसुद्धा ‘हालचाल’ करण्याबाबत नाखूश असत. मुलींच्या अंगातले फ्रॉक-स्कर्ट-परकर ताडपत्रीचे शिवलेले असावेत असे कडक, उघडलेल्या छत्रीसारखे दिसत. ‘साईड प्रोफाईल’ काढणं हा या मेमरी ड्रॉईंगमधला चतुर प्रकार असे. (नाहीतर दोन डोळे एकाच आकाराचे आणि एकाच रेषेत पाहायला मिळणं कठीणच!) शक्यतो पाठमोरी माणसं काढण्यानंही बरेच प्रश्‍न सुटायचे! या चित्रांत खुपशा गोष्टी पारदर्शक असत! निसर्गानंसुद्धा जे केलेलं नाही ते करून दाखवण्याची किमया आमच्या या चित्रांनी साधलेली असे. अशाप्रकारे हे ‘मेमरी ड्रॉईंग’ सगळ्या गृहीत संकल्पना, सगळे आयाम, विचार बदलून टाकत असे... एकदम ‘हिला डाला’ स्टाईलने..!