Thu, Nov 14, 2019 06:46होमपेज › Bahar › पाऊस पाडा मोदी...

पाऊस पाडा मोदी...

Published On: Jul 07 2019 1:30AM | Last Updated: Jul 06 2019 8:18PM
प्रा. सुहास द. बारटक्के

‘जून महिना कोरडा गेला... पावसाचा एक थेंब नाय... गुरंढोरं पान्यावाचून तहानली. चार्‍यावाचून खंगली... पाऊस पाडा मोदी... पाऊस पाडा... पाऊस पाडा मोदी...’चा शेतात उभं राहून आकाशाकडे हात करून किशा बुडकुले जोरजोरात ओरडत होता. मॉर्निंग वॉकसाठी गेलेला मी त्याच्या शेताजवळून रस्त्यानं चाललो होेतो. ते दृश्य पाहून थबकलो. 
‘काय झाले रे किशा? का ओरडतोस?’ 
‘ काय नाय बा, सर... पाऊस कुटाय? पावसाचा पत्त्या नाय आजून.’ अरे मग मोदी काय करणार? 

‘ते सगळं काही करू शकतात. महाराष्ट्रात सगळीकडे सगळीकडे पाऊस झाला; पण हितं आपल्या गावातच नाय. आजून एक थेंबपण पडला नाय. आमचं काय चुकलं? ‘काय चुकलं?’
‘काय काय जनांनी मोदीला मत नाय दिलं.’
‘मग..?’ ‘म्हनून आमच्याकडेच पाऊस नाय.. इतर ठिकानी बघा.’
‘अरेे असं कसं म्हणतोस? पाऊस काय मोदींच्या हातात आहे होय?
 ‘मग? ते कायपन करू शकतात. दुष्काळी भागात पाणी देऊ शकतात.’ 
‘त्यासाठी आपलं महाराष्ट्र शासन आहे ना?’
 ‘ते पाडतील कृत्रिम पाऊस.’
‘पन त्यासाठीपन मोदींचा आदेश हवा ना?’

‘बरोबर आहे तुझपण. सगळ्याच गोष्टी काही मोदींच्या हातात नसतात बरं का. परवा त्या कोयनेजवळच्या वेताळवाडीत गेलो होतो. परशा जाधवाकडे मुक्‍कामाला होतो. पहाटे 4 वाजता भूकंप झाला. परशाचं घर हालायला लागलं. आता झपकन बाहेेर पडावं ना, तर परशा गुडघे टेकून बसला. हलणार्‍या घराच्या वरच्या वाजणार्‍या वाशांकडे-आढ्याकडे पाहत ओरडायला लागला, ‘माझं घर हलवू नका...मोदी.. काय चुकलं असेल तर माफ करा... पण घर हलवू नका...’ मी उठलो आणि त्याला खेचूनच घराबाहेर काढलं... आता मला सांग, या भूकंपाचा आणि मोदींचा काय संबंध आहे का?’
‘नाय.. तसा नाय.. पन मोदी कायपन करू शकतात.’ ‘अरे पण, देशाचे पीएम म्हणून ते काय करतील ते जनतेच्या हिताचंच असेल ना?  ते कशाला लोकांची घर हलवतील? भूकंप घडवणे, पाऊस पाडणे हे त्यांच्या हातात असतं ना, तर त्यांनी आधी दुष्काळी भागात पाऊस नसता का? आणि भूकंप घडवला असता पाकिस्तानात...’

‘ते तसंपन करू शकतात. आजपर्यंत त्या अण्णांचं ऐकत आलो; पण ना कधी नीट पाऊस पडला ना कधी सरकारी मदत मिळाली; पण यावेळी आम्हा शेेतकर्‍यांच्या खात्यांत सहा हजार रुपये जमा झालेे आणि खात्री पटली, मोदी कायपन करू शकतात. ते पाऊसपन पाडू शकतात. म्हणून मागणं मागतोय एव्हढंच.’ 
‘अरे पण, ते मोदींना ऐकू जाणारेय का?’

‘तुम्हाला ऐकू गेलं ना? तुमी लिवा की पेपरात, मोदींची मानसं सगळीकडे असतात. त्यातलेच एक तुमी.’ ‘मी मोदींचा माणूस म्हणून तुला रे कुणी सांगितलं? मी सगळ्या बाजूनं लिहितो तटस्थपणे.’
‘तुझी नाय तर तुमची घरातली मंडळी असतील मोदींचे भक्‍त. मोदीवर प्रेम करणारी मानसं घरोघरी हायत.’
‘ती असतीलही, पण काय रे मागच्या निवडणुकीत तू मोदींच्या विरोधात अण्णांचा प्रचार करत होतास ना?’
‘तेच सांगतोय ... इतकी वर्षं अण्णांबरोबर राहिलो; पन  फायदा काय नाय झाला.’
‘म्हणजे? सरशी तिकडे पारशी, या न्यायानं फायदा तिकडे किशा बुडकुळे असं म्हणायचं का आम्ही?’ 
‘तुमी कायपन म्हना...पन बदल पायजेेच. नेता पावरफुल पायजेच...मोदींसारखा.’ 
‘ते ठीकाय रे; पण मोदी काहीही करू शकतात, हे खूळ काढून टाक डोक्यातून. कुणी भरवलं तुझ्या डोक्यात हे?’ 
‘हेच की.. अण्णा परवा म्हणत होते... मोदी कायपन करू शकतात... मोदींना मशिन...’ 

‘परत मशिन? एव्हढं होऊनही परत दोष मशिनचा? अण्णाना म्हणावं आता सुधारा...दुसरं काही तरी शोधा. आणि हो अण्णांना सांगा मोदी मुद्दाम भूकंप करू शकत नाहीत आणि पाऊस पाडू शकत नाहीत. हा, दुष्काळ पडलाच तर मदत मात्र करू शकतात.’ असं म्हणून मी तिथून सटकलो.