Mon, Jun 17, 2019 11:02होमपेज › Bahar › खेकडे

खेकडे

Published On: Oct 07 2018 1:13AM | Last Updated: Oct 06 2018 10:50PMप्रा. सुहास द. बारटक्के

‘पुण्यात फारच घुशी झाल्यात म्हणे?’ शेजारचे मंगुअण्णा दारातून आत येत म्हणाले.
‘घुशी? उंदीर-घुशी म्हणताय?’
‘होय, तेच म्हणतोय... ते धरण...’
‘ते भुशी डॅम... घुशी डॅम नव्हे.’
‘डॅम नव्हे हो... तो धरणाचा कालवा... परवा पुण्यात फुटला तो.’
‘तो खेकड्यांमुळे... घुशींमुळे नव्हे?’
‘खेकड्यांमुळे कसा फुटेल? खेकडे काही पाण्यात बिळं करीत नाहीत. पाण्याबाहेर करतात.’
‘तेच ते अण्णा, खेकडे कालव्याच्या भिंतीत घरं करतात. त्यामुळे त्या कालव्याची भिंत कमकुवत झाली आणि फुटली.’
‘पण, मंत्री तर म्हणतात खेकड्यांसोबत घुशींची बिळेही होती?’ 

‘घुशी कशा पाण्यात आणि पाण्याबाहेर बिळं करतील? घुशींना माणसांचा सहवास लागतो?’
‘आणि खेकड्यांना?’
‘खेकडे तर माणसांतच राहतात असं म्हणतात, एकमेकांचे पाय ओढीत.’
‘म्हणजे दोघांनी संगमनताने कालवा फोडला, असंच आपण म्हणायचं.’
‘आपण नाही, ते म्हणतात. कालव्याची एवढी मजबूत भिंत पाडली म्हणजे उंदीर आणि खेकड्यांची संख्या किती लाखात असेल ना? अख्ख्या पुण्याला खेकड्यांचं सांबार पुरवता येईल.’
‘खेकड्यांचं सांबार खूप टेस्टी असतं म्हणे.’

‘आणि ताकद देणारंही असतं. त्या महागड्या टॉनिकच्या गोळ्या घेण्याऐवजी खेकड्यांचा रस्सा खाऊन बघा म्हणावं. स्फूर्ती, शक्‍ती, पॉवर, सगळं मिळेल.’
‘आता हे कुणाचं संशोधन?’
‘कुठंतरी वाचलंय मी?’
‘कुठंतरी बोलू नका, नाहीतर दर्दी पुणेकर, धावतील खेकडे पकडायला आणि मला वाटतं मंत्र्यांना हेच अपेक्षित असावं?
‘करेेक्ट! असेलही. कारण, मानलं पाहिजे बुवा या मंत्र्यांना, कसं पटकन् संशोधन करून झटकन् उत्तरं देतात. परवा सी.एम. नाही का म्हणाले- राफेल करार योग्यच आहे म्हणून?’
‘ते अयोग्य आहे असं कसं म्हणतील? खुुर्ची जाईल ना त्यांची?’ 
‘तेही खरंय् म्हणा. पी.एम.च्या विरुद्ध सी.एम. कसं काय बोलू शकणार?’

तुम्ही मघाशी बोललात, माणसांतच खेकडे असतात, याचा अर्थ काय हो?’ अण्णांनी निरागसपणे विचारलं, त्यावर मी म्हटलं- खेकड्यांचं वैशिष्ट्य माहीत आहे का तुम्हाला? कोकणी माणसाला खेकड्याची का उपमा देतात ते ठाऊक आहे का?’ 
‘नाही हो...’ अण्णांनी मान हलवली.
‘हे खेकडे जर एका भांड्यात ठेवले आणि वरून झाकण नाही लावलं तरी पळून जाऊ शकत नाहीत. अगदी क्षणार्धात त्यांना भांड्याचा काठ पकडून बाहेर उडी मारता येत असली तरीही?’ 
‘का बरं?’
‘कारण, एक खेकडा बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला की, दुसरा खेकडा त्याचे पाय पकडून त्याला पुन्हा खाली खेचतो?’ 

‘असं होय... तरीच कोकणी माणसांना खेकड्याची वृत्ती बरी नव्हे, असं सतत हिणवलं जातं; पण खरं सांगू का, खेकड्याची वृत्ती ही केवळ कोकणातच नव्हे, तर सर्वत्र असते. सगळ्याच माणसांमध्ये असते. दुसरा मोठा होऊ लागला की, त्याचे पाय खेचायला काही मंडळी तयारच असतात. राजकारणात तर विचारूच नका. कोणी थोडा जरी डोईजड होऊ लागला की त्याचा पत्ता काटलाच.’
‘करेक्ट! अण्णा यू आर ग्रेट! राजकारणात एकमेकांचे पाय ओढण्याची तर स्पर्धाच सुरू असते. सगळं खेकड्यांचंच राजकारण असतं. बरं, बहुतेक पक्षांत एकच मोठा नेता असतो. बाकीची मंडळी केवळ एकमेकांचे पाय ओढण्यातच मश्गूल असतात. पक्षाबाहेरही यांचं वर्तन तसंच असतं. दुसर्‍या कोणाला मदत करून एखादं चांगलं काम करतील तर शपथ! दुसर्‍याला श्रेय मिळू नये म्हणून कामात खोडा घालणारच.’

‘मग मी म्हणतो सर... राजकीय पक्षांनी आपलं निवडणूक चिन्ह का बरं बदलू नये?’
‘हे काय आता नवीन काढलंत?’ 
‘म्हणजे बघा ‘खेकडा’ हेच निवडणूक चिन्ह का घेऊ नये?’
‘असं म्हणताय् होय... पण कुणी घ्यायचं?’

‘कुणी म्हणजे, प्रत्येक पक्षानं घ्यायचं. फक्‍त खेकड्याचा प्रकार बदलायचा. कुणी समुद्री खेकडा, कुणी ओढ्यातला, तर कुणी या या कालव्यातला... कुणी नांगीवाला, तर कुणी बिननांगीवाला... कुणी तिरका चालणारा, तर कुणी सरळ चालणारा... कुणी काळा, तर कुणी लाल-भगवा... कुणी निळा, तर कुणी हिरवट... कुणी पाठीवर टोकं असणारा भालदार खेकडा, तर कुणी पाठीवर काळे-पांढरे पट्टे असणारा...’ 
‘एवढे प्रकार असतात खेकड्यांचे?’
‘तर... अरबी समुद्रात सगळे खेकडे सापडतात?’ असं म्हणत अण्णा उठले.