Wed, Oct 24, 2018 01:31होमपेज › Bahar › अदृश्य बेडीची गोष्ट

अदृश्य बेडीची गोष्ट

Published On: Dec 03 2017 12:44AM | Last Updated: Dec 02 2017 8:24PM

बुकमार्क करा

मृणाल काशीकर-खडक्‍कर

एकदा एक माणूस रस्त्याने जात होता. तिथे त्याला अनेक हत्ती दिसले. अचानक त्याचे लक्ष मोठ्या हत्तीच्या पायातील साध्या दोरखंडाकडे गेले. त्याला आश्‍चर्य वाटले की, इतका मोठा हत्ती केवळ इतक्याशा दोरखंडाने बांधून ठेवला आहे. त्याने माहुताला विचारले, ‘मनात आणले तर हा हत्ती हा दोरखंड तोडून जाऊ शकतो. मग तुम्ही केवळ त्या दोरखंडाने कसे काय त्याला बंदिस्त करून ठेवले आहे?’ माहूत हसला. म्हणाला, ‘त्या हत्तीला आम्ही लहानपणापासून पायात बेड्या अडकवून बांधून ठेवत होतो. त्याला आता त्याची सवय झाली आहे. त्यामुळे साधा दोरखंड असला, तरी त्याला वाटते मोठी बेडी आहे आणि तो ती तोडून जायचा विचारदेखील करत नाही.’ त्या माणसाला या उत्तराने खूपच आश्‍चर्य वाटले. तो विचारात पडला. खरंच, इतकी सवय होऊन जाते का आपल्याला एखाद्या बेडीची की, ती काढली तरी आपण तिचे अस्तित्व आहे, असे समजून त्या बंधनात अडकून राहतो?

आहे खरे असेच. या बेड्या म्हणजेच आपल्या आयुष्यातील नैराश्य आणि नकारात्मकता आहे. असे म्हणतात, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. एकदा अपयशी झाल्याने आपण अपयशी आहोत, आपल्याला एखादी गोष्ट जमणार नाही, असे समजून आपण पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करायचे टाळले, तर त्याची बेडीच बनून आपल्या पायात कायमची अडकून पडेल. एखादी गोष्ट तुला जमणार नाही, तुला येत नाही, हे लहानपणापासून मुलांना ऐकवले, तर त्यांच्यामध्ये ही नकारात्मकता बळावेल आणि त्यांना शक्य असले, तरी त्यांच्याकडून योग्य प्रयत्न केले जाणार नाहीत. आपली स्वतःची मर्यादा किंवा बेडी हे आपले स्वतःचे स्वतःबद्दलचे विचार असतात. आपले नकारात्मक विचार हीच मोठी बेडी असते. आपल्या यशातील सर्वात मोठा अडथळा आपले स्वतःबद्दलचे नकारात्मक विचारच असतात. त्यांना झटकून टाकून प्रयत्न केले, तर यश नक्‍की मिळते. ‘मला हे जमणार नाही’ किंवा ‘मला हे जमेल का?’ अशी स्वतःवरील शंका म्हणजेच पायातील बेडी आहे, जी आपल्याला पुढे जाऊ देत नाही. ती एकदा आपण तोडली की, मग आपल्याला काहीही अशक्य नाही.