होमपेज › Bahar › अवजड उद्योग  आणि मासे

अवजड उद्योग  आणि मासे

Published On: Jun 09 2019 1:21AM | Last Updated: Jun 08 2019 8:52PM
प्रा. सुहास द. बारटक्के

‘अहो ऐकलं का?’ सौभाग्यवतींनी किचनमधून बाहेर येत विचारलं. 
‘बोला बाईसाहेब, काय म्हणताय?’
‘ते अवजड उद्योग खातं म्हणजे काय असतं हो?’
‘...ते म्हणजे असं... मोठे म्हणजे अवघड असलेले अवजड उद्योग.’ 

‘पण मग ते खातं कोकणच्या किंवा महाराष्ट्राच्याच वाट्याला का येतं हो?’
‘असं कुणी म्हटलंय?’
‘पूर्वी अनंत गीते नाही का होते? अवजड उद्योगमंत्री... त्यावेळी सुभाष देसाईपण म्हणाले होते की, पुन्हा आमच्या वाट्याला हे अवघड खातं नको..?
‘अगं हे तर प्रतिष्ठेचं खातं आहे. सार्‍या भारताचा मंत्री असतो ना तो? केवळ कोकणचा नव्हे.’
‘ते काही असो; पण गेली 5-10 वर्षे कोकणचं नाव त्या अवजड उद्योगाशी जोडलं जातंय..’
‘ते काही अंशी खरंय म्हणा...’

‘आणि काय ठाऊकाय हे खातं मिळालं की, म्हणे पाच वर्षांचा अहवाल द्यावा लागत नाही. थोडक्यात, बिनकामाचं खातं आहे.’ 
‘असं कसं? देशातले अवजड उद्योग सांभाळायचं अवघड काम करणं म्हणजे माणूस तयारीचाच हवा.’
‘हं, म्हणजे त्या पात्रतेचा विचार करूनच मराठी, कोकणी माणसाला हे खातं देत असावेत. मराठी माणूस असतोच तसा तयारीचा.’
‘हो ना, केवढी मोठी अवघड कामं तो लीलया पार पाडतो. प्रसंगी पायात पाय घालून आडवं करायलाही मागे-पुढे पाहत नाही तो. कोकणात आता नक्‍की येतील बघ अवजड उद्योग.’
‘कशाला हवेत ते अवजड उद्योग; आधी कोकणात काय कमी उद्योग आहेत?’
‘तरीच कोकणी माणसं उद्योगांना विरोध करतात.’ 

‘म्हणजे नाणारविषयी बोलताय का तुम्ही?’
‘नाणार आता पुन्हा येणार की नाही ते बघ. शेकडो ‘शहां’चे पैसे अडकलेत ना नाणारच्या जमिनीत. ते आता वसूल करायचे तर नाणार हवेच.’
‘पण, सेनेने ते तर प्राणपणाने विरोध करून घालवले आहे ना? आता कसे पुन्हा येणार?’
‘ते त्यावेळी तसं करणं आवश्यकच होतं ना? आता कदाचित धोरण बदलू शकतं ना? त्या ‘एन्‍रॉन’ प्रकल्पाचं नाही का तसं झालं?’
‘तुमचं ना काहीतरीच तर्कट असतं. एकदा गेला प्रकल्प की गेला. नाणार प्रकल्प गुजरातेत हवाय... विदर्भात हवाय... कोकणात नको हे त्यांचं दुर्दैव!’
‘म्हणजे आता तो पुन्हा येणारच नाही, असं तुझं म्हणणं. मग सात-बारावर नावं चढवलेल्या बिचार्‍या शहांनी काय करावं?’

‘ते आपली गुंतवणूक तिकडे करतील, नाहीतर काय पडलंय कोकणातल्या त्या डोंगराळ जमिनीत?’ ‘तेही बरोबर आहे म्हणा... जिथं काही पिकत नाही तिथंच असे अवजड उद्योग येणार ना?’ 
‘शिवाय, कोकणला समुद्रकिनारा जवळ आहे ना... सांडपाणी इतर कुठे सोडायला नको थेट समुद्रात सोडले की भांडण नको.’ 
‘पण, त्यामुळे समुद्राचं पाणी तापतं. मासे मरतात असं म्हणतात.’
 ‘अगं अख्खी पृथ्वीच तापत चाललीय त्यात समुद्राच्या पाण्याचं काय... ते तर तापणारच.’
‘पण मग मासे मेले तर उद्या खाणार काय तुम्ही?’
‘एन्‍रॉनच्या वेळीही अशीच ओरड झाली होती; पण अजूनही खाताय ना तुम्ही मासे? कोकणातल्या माशांवर तर जगताय तुम्ही आणि मिरवताय मासेखाऊ म्हणून.’ 
‘खरं सांगू का, माशांचा विषय निघाला ना की, वाटतं जीव तोडून त्या अवजड उद्योगांना विरोध करावा. उद्या खरंच मासे नाही मिळाले तर?’
‘तर काय जेवण बंद करणार आहात?’

‘जेवण नाही बंद केलं तरी जेवणातली ‘बहार’ जाणारच असं नाही का तुला वाटत? झणझणीत बांगड्यांचा रस्सा आणि कोळंबीचं सुकं जर ताटात नसेल, तर ताटाची मजाच निघून जाईल. तांबडा-पांढरा रस्सा रोज रोज पिणार आहात का तुम्ही? पण रोज एका माशाची आमटी मात्र चालते. आज कर्ली, उद्या मांदेली, परवा कांटा, तेरवा पापलेट, त्यानंतर सुरमई, बांगडा, रावस, कोळंबी, म्हणजे रोज वेगवेगळी व्हरायटी.’ 

‘आज रविवार म्हणून आठवताहेत का ही नावं?’ 
‘अरे हो, चला आठवण झालीच आहे तर निघतो मी मार्केटला. त्या ‘लगून’वाल्याकडे काही ताजा फिश मिळतो का ते पाहतो आणि हे लक्षात ठेव, कोकणात अनेक अवजड उद्योग येवोत; पण आमचा मासा मात्र नष्ट होता कामा नये...’