Sun, Feb 24, 2019 02:56होमपेज › Bahar › दु:खाची दुनिया

दु:खाची दुनिया

Published On: Feb 11 2018 1:02AM | Last Updated: Feb 10 2018 8:54PMवैजनाथ महाजन

आपला हिंदुस्थान हा एक  खंडप्राय देश आहे, हे आता सर्वश्रुत आहे. अर्थात, एवढ्या मोठ्या देशात तितकीच मोठी दुःखे आणि त्या दुःखातून निर्माण होणार्‍या अनंत यातना या असायच्याच; पण त्या किती असाव्यात, तर जगातील एकूण एकशे ऐंशी देशांत आपला देश हा क्रमांक एकशे बाविसावा दुःखी देश आहे. अर्थात, ही काही आपल्या देशाला भूषणावह वाटावी अशी बाब नक्‍कीच नाही. त्यातून आणखी आपल्याकडे साहित्यात शोक पर्यावसायी साहित्याची नेहमीची चढती भाजणी राहिलेली आहे. असे साहित्य सातत्याने गौरविलेही जात असते. अशा साहित्यकृतींना ‘ज्ञानपीठ’ पारितोषिक व ‘साहित्य अकादमी’चे  पुरस्कारही दिले जातात. हे सगळे साहित्याच्या द‍ृष्टीतून ठीकच असते;  पण वास्तवातील दुःखाचे चटके याहून भिन्‍न असतात आणि त्यातून भली-भली माणसेसुद्धा कोलमडून पडलेली आपण पाहत असतो. तसे दुःख हे मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित अशा दोन्ही पातळ्यांवरून सतत समोर येत जाते आणि आपणाला विव्हल करून सोडत असते. आज आपला देश कोणत्या अशा दुःखातून पुढे सरकतो आहे, हे नेमके सांगणे तसे कठीण आहे; पण आपणाला आपल्या भोवताली अशी दुःखाची रास नेहमीच दिसत असते. दुःख उशाला घेऊन माणसे जगत असतात आणि रोज रात्री जागत असतात. त्यामुळे तसे दुःखाचे मोजमापच नाही.

अलीकडे ताण-तणावांमुळे आपल्या रोजच्या  जगण्यावर दुःखाच्या टांगत्या तलवारी  असल्याचे वारंवार सांगितले जाते. जेवढी जबाबदारी मोठी तेवढा तणावही मोठा, तरीपण यातून स्वतःसाठी आणि स्वतःच्या निखळ आनंदासाठी मोजके का होईना; पण क्षण काढून आपण  ताण-तणावांचा निचरा करण्याचा  प्रयत्न करणे गरजेचे आहे. शारीरिक व्याधी आणि त्या व्याधींच्या वेदना हे एक अपरिमित अशा दुःखाचे क्षेत्र आहे. याकरिता प्रत्येकाला डॉक्टर हा देव वाटावा, यातही स्वाभाविकता आहे; पण म्हणून डॉक्टरांनी आम जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  

मराठीतील गेल्या पिढीतील एक श्रेष्ठ कवी तापाने फणफणत होते.  काही केल्या त्यांचा ताप उतरेना. तेव्हा ते डॉक्टरांना म्हणाले, तुम्ही तुमचे बिल सांगा. म्हणजे माझा ताप आपोआप उतरेल. यातील किंचित विनोदाचा भाग जरी आपण सोडून दिला, तरी आजचे या क्षेत्रातील वास्तव काय आहे, ते आपण कसे काय नजरेआड करणार?  आपण आपली जीवनशैली हवी तशी, हव्या त्या पद्धतीने वागवत आणि वाकवत राहिलो व त्यातून नवनवीन दुःखाचे डोंगर उभे होत गेले. खाण्याच्या सवयी बदलल्या वेळापत्रकाला फारसा अर्थच राहिला नाही. भोजनाच्या वेळी झोप आणि झोपेच्या वेळी भोजन, असा नवा भेसूर रीतीरिवाज समोर आला. यातून आपले जीवन पंगुत्वाकडे चालले आहे, हे ठाऊक असूनही आपण यात बदल करायला तयार नाही. 

निसर्गाला वेठीला धरून आपण आपली इच्छापूर्ती करण्याचा असुरी  डाव साधत-साधत पुढे चाललो आहोत. त्याचे संभाव्य परिणाम आज ना उद्या भोगावयाला लागणारच आहेत.  शास्त्रज्ञांनी वेळोवेळी याबाबतचे गंभीर इशारे दिलेले आहेत, तरीपण आपण यातून काहीही शिकण्यास तयार नाही. जंगले सीमापार करून आपल्या वस्त्या आपण वाढवतच आहोत.

एका साध्या दुखण्याकरिता  शेकडो रुपयांची औषधे घेण्यात धन्यताही  मानत आहोत. म्हणजे, ही सारी विकतची दुखणी म्हणायची. याशिवाय घातपातातून घडून येणारी असंख्य नव्हे, तर अगणित दुःखे रोज समोर येत असतात. जग बघण्यापूर्वीच कोवळे जीव जगातून निमूटपणे निघून जात असतात. निसर्गाच्या रागलोभाला खर्‍या अर्थाने सामोरा जात असतो, तो बळीराजा. त्याचे दुःख तर आता समजून घेण्याच्याही पलीकडे गेले आहे. त्याला खरा भावनिक दिलासा समाज कशा पद्धतीने देणार, त्यावर उद्या तो उभा राहणार आहे.

या सार्‍यांकडे  बारकाईने आणि संवेदनेने पाहणेच आपण विसरून गेलो आहोत आणि यातूनच आपल्या अवतीभोवती दुःखाची दुनिया उभी राहिली आहे.  या दुनियेचे नवे आव्हान आपण कसे पेलणार आहोत, हा यातील खरा कळीचा प्रश्‍न आहे. ‘नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी, जीणे गंगोघाचे पाणी,’ असे जरी आपणास कवींनी सांगून ठेवले असले, तरी आपण ते काही समजून घेण्यास तयार नाही आणि यामुळेच जगण्याचे आपले सारे अनुबंधच सुटत चालले आहेत की काय, असे वाटते आहे. संतांनी आपणास खूप उत्कट शिकवण दिलेली आहे. आपण ती जर वर्तमानकाळात अनुसरण्याची मनोमन तयार केली आणि आधुनिक जीवन आणि जीवनाची शिकवण यात एक लोभसवाणा संयोग निर्माण होऊन आपल्या भोवतालचीही दुःखाची दुनिया आपणच शंभर टक्के हद्दपार करू शकू, असे मात्र जरूर वाटते आहे.