Thu, Apr 25, 2019 11:26होमपेज › Bahar › #FriendshipDay : मैत्र जीवांचे

#FriendshipDay : मैत्र जीवांचे

Published On: Aug 05 2018 1:26AM | Last Updated: Aug 05 2018 1:26AMसुप्रिया वकील

‘मॅन इज अ सोशल अ‍ॅनिमल,’ असं म्हटलं जातं. म्हणजेच माणूस हा मिळून-मिसळून राहणारा, कळप करून राहणारा जीव आहे. माणसाला मूलभूत गरजांबरोबरच भावनिक गरजाही असतात. त्याला प्रेम, माया, वात्सल्य या उबदार भावनांबरोबरच स्नेहबंधांचीही गरज असते. 

माणसाच्या भावनिक गरजा पूर्ण करणारी अनेक नाती असतात. काही नाती जन्माबरोबर लाभतात, तर काही सामाजिक संकेत, बंधने व चालिरीतींमुळे मिळतात. काही नाती व्यावसायिक गरजेवर आधारलेली, कामापुरती म्हणावी अशी... अगदी अल्पजीवी...

पण, आयुष्यात एक नातं मात्र असं असतं की, जे रक्‍ताचं नसतं, भाग पडलेलं किंवा सक्‍तीने चिकटलेलं नसतं. हे नातं असतं ‘या हृदयीचे त्या हृदयी’ असा संवाद साधणारं, आपलेपणाचं... त्यातून निर्माण होणार्‍या हक्‍काचं, सलगीचं आणि आस्थेचं... हे नातं म्हणजे मैत्रीचं...नातं!

समाज आचार-विचारांचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोक ‘वेव्हलेंग्थ’ जुळून एकत्र येतात, त्यांच्यात निखळ मैत्रीचे बंध निर्माण होतात तेव्हा तो अनुभव किती विलक्षण असतो! अशी माणसे, अशी नाती जगण्याच्या खडखडाटात आपली उमेद टिकवून ठेवायला मदत करत असतात, आपला आधार बनत असतात. हा आयुष्यातील एक सुरेख रेशीमबंध असतो, जो आयुष्यातील चढ-उतारात आपली उमेद टिकवून ठेवतो.

मैत्रीच्या नात्याला जाती-धर्माची, वयाची, रंगरूपाची, भाषेची, प्रांताची, आर्थिक परिस्थितीची... कसलीच अट असत नाही. बदलीच्या निमित्तानं आप्‍तांना सोडून परमुलुखात गेलेल्यांना मैत्रीचा केवढा आधार लाभतो! ‘संकटकाळी धावून येतो तो खरा मित्र,’ अशी मैत्रीची जणू व्याख्याच केलेली आहे. चांगला मित्र हा शुभचिंतक असतो. द्वेष, मत्सर, हेवा, विषारी स्पर्धा अशा विकारांच्या आगीत ‘मैत्री’चं रोप तग धरू शकत नाही. या रोपाची जपणूक विश्‍वासाच्या आधारेच होत असते. औपचारिक आभारांच्या पलीकडे जाऊन, एकमेकांना खर्‍या अर्थानं जाणून घेणारं असं हे अतिशय मधूर, पारदर्शक, हक्‍काचं आणि सोबतीचं नातं असतं. 

मैत्रीत नुसती खुशामत नसावी. दुसर्‍याला आता चांगली वाटणारी; पण त्याच्या अहिताची एखादी गोष्ट असेल तरी ती वेळीच सांगण्याचा निर्भीडपणा मैत्रीच्या नात्यात हवा आणि विश्‍वासघात तर कधीच असू नये. स्वत:कडे वाईटपणा नको, असा विचार करून वागणे किंवा फक्‍त आपल्या फायद्यापुरते लांगूलचालन करणे याला मैत्री म्हणताच येणार नाही.

दान हे सत्पात्री असावं, असं म्हणतात. तसं मैत्रीसुद्धा सुयोग्य व्यक्‍तीशीच असावी, नाहीतर पदरी निराशा आणि दु:खच येणार. विशेषत:, आभासी विश्‍व आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाल्यापासून तर या गोष्टीचा अधिकच सहजपणे विचार करण्याची गरज आहे. दुर्गुणी किंवा दुर्जन व्यक्‍ती फार काळ मैत्री निभावू शकणार नाही, अशा व्यक्‍तीचे खरे रंग काही काळात प्रकट होतीलच किंवा एखाद्या प्रसंगात अशा व्यक्‍तीची पारख होईलच आणि ‘जो मित्र राहिला नाही तो मित्रच नव्हता,’ असं म्हणण्यावाचून पर्याय उरणार नाही; पण या सगळ्यात किती त्रास होईल!

‘फुल्स कंपनी इज डिलाईटफुल अ‍ॅट द बिगिनिंग, बट इट नेव्हर फेल्स टू टर्न इन टू अ मेलँकली’ या इंग्रजी वचनानुसार मूर्ख संगतीच्या मैत्रीची नेहमी शोकांतिकाच होणार! तसंच, ‘शहाण्याचं व्हावं चाकर; पण मूर्खाचं होऊ नये धनी,’ अशी म्हण आहे. त्या चालीवर ‘शहाणा शत्रू परवडला; पण मूर्ख मित्र नको,’ असं म्हणायला हरकत नाही.

चांगल्या, सज्जन, विश्‍वासपूर्ण आणि जीवाला जीव देणार्‍या मैत्रीची गरज प्रत्येकालाच असते; पण हे सुंदर नातं मिळवण्यासाठी आणि मिळालं तर ते टिकवण्यासाठी आपणही जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. हे सुकुमार नातं कोमेजू न देता, उलट अधिक कसं बहरेल हे पाहिलं पाहिजे.

सध्या मैत्रीचा ‘डे’ उत्साहानं साजरा होतो. या दिवशी, कुठं जागा उरणार नाही इतके विविधरंगी धागे बर्‍याच जणांच्या हातांवर दिसत असतात; पण हा केवळ उपचार तर होत नाही ना? फक्‍त यानिमित्ताने एका ‘मेसेज’पुरती आठवण किंवा तेवढीच औपचारिकता असे तर घडत नाही ना, याचाही विचार व्हायला हवा.

लहानपणी चिमणीच्या दातांनी ‘शेअर’ करणारी मैत्री आयुष्यात निरनिराळ्या टप्प्यांवर आधार बनत जाते, मन मोकळं करण्याचं हक्‍काचं ठिकाण बनत जाते. कवी गुलजार म्हणतात तसं -
थोडी थोडी गुफ्तगू
दोस्तों से करते रहिए
जाले लग जाते है
अक्सर बंद मकानों में...
या मैत्रीदिनाच्या निमित्तानं हे सुंदर नातं फुलवण्याचा आपणही प्रयत्न करूया आणि आनंदाच्या वर्षावात चिंब भिजूया!