Fri, Apr 26, 2019 20:05होमपेज › Bahar › पुन्हा शिक्का?

पुन्हा शिक्का?

Published On: Nov 04 2018 1:16AM | Last Updated: Nov 03 2018 8:46PMप्रा. सुहास द. बारटक्के

‘या दिवाळीत म्हणे बरेच बॉम्ब फुटणारेयत.’ शेजारचे मंगुअण्णा आमच्या घरात डोकावीत म्हणाले.
‘या, या मंगुअण्णा, कसले बॉम्ब म्हणताय?’
‘राजकीय बॉम्ब. पाच राज्यांतल्या निवडणुकांचेे निकाल पाहून, मग काही बडे नेते आपल्या पार्टीला रामराम करून दुसर्‍या पार्टीत जाणार म्हणे?’ 
‘अहो, असं हे नेहमीच चालतं ना? म्हणून तर पक्षांतर करणार्‍यांसाठी आता आचारसंहिता, पक्षीय बांधिलकीचे कायदे आहेत.’ 
‘पण, यावेळी मोठ्ठे फटाके उडणार म्हणे, त्या यशवंत सिन्हांसारखे!’ 
‘त्यांनी पक्ष सोडला अण्णा; पण दुसर्‍या पक्षात नाही गेले!’ 

‘तेच म्हणतोय मी, एकवेळ दुसर्‍या पक्षात गेले तरी चालतील; पण त्याच पक्षाशी बांधिलकी दाखवत एकेक गौप्यस्फोट करायला लागले की कसं होणार? म्हणजे दुसर्‍या पक्षात गेल्यावर लोक म्हणतील की, आता हे विरोधी पक्षात गेले म्हणून असं बोलतायत; पण कुठल्याच पक्षात न जाता गौप्यस्फोट करीत बसले की, लोकांचा विश्‍वास बसतो ना?’

‘असू दे ना अण्णा, एवढं काय म्हणाले ते?’ 
‘ते असं म्हणाले की, आता भाजप पहिल्यासारखा उरला नाही.’ 
‘नाहीच उरला. आता पक्ष खूप मोठा झाला ना? केवढ्यातरी सीटस् मिळाल्या पक्षाला.’

‘तसं नव्हे... आता पक्षात दोनच माणसं बोलतात. हुकूम सोडतात. बाकीच्यांनी फक्‍त ऐकायचं. पहिल्यासारखी चर्चा होत नाही. निर्णय घेण्यापूर्वी कुणाला विचारात घेतलं जात नाही. एक पी.एम. आणि दुसरे पी.एम.च्या वरचे पार्टी अध्यक्ष दोघेच मिळून निर्णय घेतात व इतरांवर लादतात.’ 

‘निर्णयाला फाटे फुटू नयेत म्हणून असं करीत असतील.’ 
‘हो; पण त्याचे परिणाम सर्वांनाच भोगायला लागतात ना? अगदी प्रामाणिक आणि साधी पर्रीकर, सिन्हा यांच्यासारखी माणसं केंद्रातून आता बाहेर आली. प्रभूंचीही अवस्था फारशी चांगली नाही. चांगली माणसं जर पुन्हा दूर गेली, तर लोकांचा विश्‍वास कमी होईल ना? आता या पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर मग काय होतं ते महत्त्वाचं.’ 

‘बरोबर आहे अण्णा तुमचं... पण मला सांगा, पक्ष कुणाच्या जोरावर निवडून आला?’ 
‘अर्थातच मोदींच्या.’ 
‘मग, इतर लोक आले काय अन् गेले काय, त्यांना काय फरक पडतो?’
‘असं गाफील राहू नका म्हणावं... मागच्या वेळी तुमची जादू चालली म्हणून काय कायमची चालेल असं नाही ना? ज्याला तुम्ही शेंबडा पोर म्हणायचेत तोही आता मोठा झालाय ना?’ 
‘हे मात्र खरं अण्णा, परवाच ते तारिक अन्वर पुन्हा त्यांच्याकडे गेले ना... हळूहळू ताकद वाढत चाललीय त्यांची.’ 
‘तेच म्हणतोय ना मी? दिवाळीनंतर आणखी काही फटाके फुटणारच.’

‘फटाके? की फुसके बार? अहो, प्रत्येक पार्टीत फुसके बारच जास्त आहेत. त्यांना फारशी किंमत नसतेच. म्हणजे सरशी तिकडे पारशी असं त्यांचं असतं.’ 
‘पण, स्वतःला जनतेचे सेवक म्हणवून घेणारे असं का वागतात?’
‘कारण, त्यांना कसलीही व कुणाचीही सेवा करायची नसतेच. त्यांना फक्‍त स्वतःची तुंबडी भरायची असते. त्यामुळेच अशी माणसं फटाके नसून फुसके बॉम्बच ठरतात.’ 
‘कदाचित त्यांचे वैचारिक पातळीवर मतभेद होत असतील.’ 
‘कसले आलेत विचार? विचार फक्‍त एकच स्वार्थ, स्वार्थ आणि स्वार्थ... त्यासाठी जनतेचा विश्‍वासघात करायला केव्हाही तयार.’ 
‘पण, मग या सर्वाला जबाबदार कोण?’
‘कोण म्हणजे आपणच. आपणच नाही का त्यांचं बटण दाबून निवडून देत?’ 
‘आता तर कुणाचंही बटण दाबलं तरी मत त्यांनाच पडणार, अशी व्यवस्था करताहेत, असं परवाच सिन्हा म्हणाले- ईव्हीएमवर लक्ष ठेवायला सांगितलंय्.’
‘म्हणूनच आता काही राजकीय नेत्यांनी पुन्हा एकदा कागदावर मतदान घ्या म्हणून मागणी केलीय.’
‘व्वा! म्हणजे पुन्हा जुने दिवस येणार तर... आमचा विचार पक्‍का आणि अमुक-तमुकवर शिक्‍का!’
‘बघूया काय होतं ते...’ असं म्हणत अण्णा उठले.