Mon, Jun 01, 2020 22:36
    ब्रेकिंग    होमपेज › Bahar › गाढवांचा गवगवा 

गाढवांचा गवगवा 

Published On: May 12 2019 2:01AM | Last Updated: May 11 2019 8:31PM
वैजनाथ महाजन

महाराष्ट्राच्या एका भागात गाढवांची संख्या भलतीच घटली असल्याने प्राणी संघटनेने चिंता व्यक्त करून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. यावर प्रशासन काय निर्णय घेणार आणि कोणती कारवाई करणार, हे कळण्यास जरी काही मार्ग नसला तरी हा प्रश्‍न अगदीच हसण्यावारी नेण्यासारखा नाही, हेच आपण समस्त मानव प्राण्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. 

जगातील असंख्य प्राणी हे जसे प्राणी साखळीतील दुवे असतात. तसेच गाढवही प्राणी साखळीतील दुवा आहे. हीच तक्रार प्रामुख्याने प्राणी संघटनेने नोंदवलेली दिसते. खरे तर, चतुष्पाद प्राण्यात गाढवा इतका निरुपद्रवी प्राणी दुसरा नाही. आणि तो शंभर टक्के अहिंसक आहे. म्हणजेच, आपल्या तत्त्वज्ञानाशी तितकाच मिळता जुळताही आहे. रस्त्याच्या कडेने अथवा रस्त्याच्या मधून संघटित रूपात गाढव चालले असले, तरी येण्या-जाण्याच्या वाहनांना ते कसलाही त्रास देत नाहीत. उलटपक्षी, तत्परतेने वाटसुद्धा करून ते देत असतात. तरीपण मानव प्राणी मात्र त्याला ‘काय रे गाढवा’ म्हणून आजतागायत हिणवत आलेला आहे. आणि या विरुद्ध गाढवाने चकार शब्दही काढलेला नाही. यावरून गाढव हे किती परोपकारी आहे, हे आपल्या सहज लक्षात यायला  हवे. आता काही वेळा ते पाय झाडून माणसाला त्रास देते, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे ‘साहेबा पुढे आणि गाढवा मागे कधीच उभे राहू नये,’ असाही वाक्प्रचार मराठीत रूढ झालेला आहे. 

गाढवेही गटागटांनी आणि कळपानेसुद्धा राहत असतात. खाण्या-पिण्याच्या त्यांच्या कसल्याही अटी नाहीत. बिचारी उकिरडे फुंकून त्यावर आपली कशी-बशी गुजराण करीत असतात.  मालक असेलच तर ते त्याच्याकडे कधीच काही मागत नाहीत. मालक त्याच्याकडून दिवसभर काम करून घेतो; पण त्याला काय देतो, हे मात्र तुम्हा-आम्हाला कधीच समजत नाही. आणि आपल्या प्रशासनाला असल्या किरकोळ कामात लक्ष घालायला फुरसतही असत नाही. कदाचित, प्रशासनात त्याचेच बांधव असल्याच्या हा परिणाम असावा. त्यामुळे समोरच्या माणसाला गाढव म्हणून हिणवण्यात वरिष्ठांना नेहमीच आसुरी आनंद मिळत आलेला आहे. शाळेत शिक्षकसुद्धा उठता बसता मुलांचा त्याच्या नावाने उद्धार करीत असतात. तरीपण तो गाढव निमूटपणे सहन करीत असते. असे असले तरी एखादा माणूस एकाही शब्दाचा उच्चार न करता जेव्हा गाढवासारखा राबत असतो, तेव्हा त्याची सार्‍यांनाच कीव येत असते. कारण, पावसाळा सुरू व्हायच्या तोंडाला नदीकाठची माती गाढवावर लादून ती बंगल्याबंगल्यांत विकण्याकरिता असंख्य गाढव मालक रस्तोरस्ती हिंडत असतात. आणि त्या वेळी ते एखादे तरी गाढव घ्या, असे म्हणून गाढवाच्या मातीचा सौदा करीत असतात. इतकेच नव्हे, तर अनेक शहरांत, शहरांच्या बाजूला गाढव गल्ल्या असतात. आपण जर रात्री सहज म्हणून या गल्ल्यांतून फेरफटका मारला तर शेकडो गाढवे अगदी शांतपणे आणि निर्विकार चेहर्‍याने तेथे दाटीवाटीने बसून राहिल्याचे अनोखे आणि तितकेच गाढवस्पर्शी असे चित्र आपणास पाहावयास मिळत असते. आता जर अशी गाढवे झपाट्याने कमी होऊ लागली, तर अशा गाढव गल्ल्यांचे काय होणार आणि आमचे मास्तर समोरच्या मुलांना काय संबोधणार, हा खरा या मागील कळीचा प्रश्‍न आहे. त्यामुळे गाढवांची संख्या कमी होणे, हे निश्‍चितच मानव प्राण्याच्या दृष्टीने भल्याचे नाही. म्हणजे गाढवांची संख्या विपुल असली पाहिजे, त्याशिवाय माणसाला चैन पडता कामा नये. इतका गाढवाचा आणि मानव प्राण्याचा शतकानुशतकांचा आगळावेगळा संबंध आहे. कारण, अन्य कोणत्याही प्राण्यापेक्षा माणसाला गाढवच अधिक जवळचे आहे. तहानलेल्या गाढवाला संत-सज्जनांनी पाणी पाजून जसा आपला मानवता धर्म जगभर पोहोचविला, तसेच गाढवांनी माणसाशी कमालीचा प्रामाणिकपणा आणि निष्ठा दाखवून आपलेपण, गाढवपण सिद्ध केलेले आहे.  

तेव्हा प्राणी साखळीतील हा शांततेचा नेहमी पुरस्कार करून त्याप्रमाणे वर्तन करणारा असाधारण, संयमशील असा सदाचारी प्राणी वर्धिष्णू होण्यातच मानव जमातीची धन्यता आहे. तेव्हा, गाढवांच्या संख्या घटण्याचा प्रश्‍न हा आपण सर्वांचाच मोलाचा प्रश्‍न आहे, हे निश्‍चित होय.