Sun, Apr 21, 2019 05:56होमपेज › Bahar › प्रसन्नतेचे प्रकाशपर्व

प्रसन्नतेचे प्रकाशपर्व

Published On: Nov 04 2018 1:16AM | Last Updated: Nov 03 2018 8:42PMवैजनाथ महाजन 

‘अंधाराची भीती कशाला गा प्रकाशगीत’ अशी एक छान ओळ एका चित्रपटगीताची आहे. यातून दोन टोकाचे दोन अर्थध्वनी फ ार सुंदररीत्या कवीने आपल्यासमोर ठेवलेले आहेत. म्हणजे अंधाराची भीती ही गृहीत धरलेली आहे आणि त्यावर प्रकाशाचे गीत विजय मिळवू शकते, असा याचा शाश्‍वत अर्थ  आहे. दिवसामागून रात्र येणे आणि रात्रीतून उद्याचा दिवस उजाडणे, हे सृष्टीचे तिच्या अस्तित्वापासूनचे कालचक्र आहे. अंधाराला घाबरून चालत नाही आणि प्रकाश आवडतो म्हणून त्याला कवटाळूनही बसता येत नाही. कारण, तुम्हा-आम्हा सर्वांना ‘आधी प्रपंच करावा नेटका’ असा संतांनी आदेश देऊन ठेवला आहे. प्रपंच म्हणजे जबाबदारी आणि ही जबाबदारी टाळून आपणास निवांतपण प्राप्‍त होऊ शकत नाही. फक्‍त या जबाबदारीतून थोडी उसंत काढून आपण येणारा सण साजरा करत असतो. इतकेच तसे वर्ष आणि वर्षांची वार्षिक कालक्रमणा ही कशी होते हे तुम्हा-आम्हाला नित्याच्या अनुभवावरून समजतच असते. यातील आपणा सर्वांचा सर्व प्रिय असा सण म्हणजे दिवाळी होय. दिवाळी प्रिय होण्याचे कारण दिवाळीत सर्वत्र दिवे लागतात आणि अंधारलेल्या दाही दिशा उजळून निघतात आणि आपणास  हेच तर हवे असते. तसे आपण सारे प्रकाशपूजकच असतो. आदित्य नारायणाची पूजा ही सर्व धर्मांत आणि सर्व संस्कृतीत सांगितलेली आहे. आपण आजतागायत ती पूजा इमानइतबारे करत आलो आहोत आणि अशा पूजेकरिताच दिवाळी असते. यात फ राळाचे आणि गोडधोड खाण्याचे निमित्त असतेच असते; पण खरा आनंद असतो तो पहाटे-पहाटे आपण जे अभ्यंगस्नान करतो त्याचा. कारण, त्यानंतर दिशा उजळणार असतात. आपणास उजळणार्‍या दिशांतून  आपले क्षितिज दिसू लागणार असते. याकरिता परमेश्‍वराला साक्षी ठेवावे म्हणून आपण सकाळी-सकाळी देवदर्शनाला मोठ्या आनंदात जात असतो. दिवाळीचे दिवस म्हणजेच कार्तिकाचे दिवस. कार्तिकाचे हे कोवळे दिवस येताना आपल्याबरोबर कोवळा प्रकाशही घेऊन येत असतात. तो केवळ अल्हाददायक असत नाही, तर त्याचवेळी सर्वांना हवाहवासा वाटणारा असा असतो. मग, अशा कोवळ्या दिवसात सकाळी-सकाळीच भूक लागली नाही तर नवलच म्हणायचे,  मग याकरिताच फराळ असतो. तो अशा प्रसन्‍न सकाळीच व्हायला हवा.  

दिवाळीचे दिवस तसे पंचांगाप्रमाणे पाचच असतात; पण दिवाळी आली म्हणत-म्हणत हे दिवस किती झटपट निघून जातात तेही आपणास उमजत नाही. फटाके उडविण्याचे आणि फुलबाज्याची गंमत बालविश्‍वापुरती  मर्यादित असते. मोठ्या मंडळींनी त्यात नको तितकी रूची घेतली, तर आजूबाजूची मंडळी सहज म्हणून नाके मुरडत असतात आणि एखादी षोडशा जाता-जाता आता ‘हे वय काय फ टाके उडविण्याचे आहे,’ असा शेरा मारून ठुमकत-ठुमकत पुढे जात असते. आता तर दिवाळीला फटाके न उडविण्याचेच फर्मान निघालेले असून, ते कालसुसंगत असेच आहे. अशावेळी फ ार काही न करता प्रकाशाची मनोभावे आराधना करणे हेच सर्वात श्रेयस्कर वाटू लागते. कारण, आपली धाव नेहमीच प्रकाशाच्या दिशेने असते; पण हे जरी खरे असले, तरी एखाद्याचे मन हवा अंधार कवडसा असेही म्हणू शकते. म्हणजे अंधाराला गाडून टाका, असे सरसकट कुणाला फर्मान काढता येणार नाही. अंधारात जरी आत्मक्‍लेश होत असले, तरी दिवे लागले की, ते आपोआपच कमी होत असतात. इतकेच नव्हे, तर अंधारात पाहू शकणारीसुद्धा माणसे असतात. खरे तर चोरांची संमेलने अशा अंधारातच होत असतात. ज्यांच्या मनात पाप त्यांच्या मनात अंधार, हाच याचा पूर्वांपार अर्थ आहे. जे अंधारातून उत्तररात्रीत आणि उत्तररात्रीतून कोवळसर अशा पहाटेत प्रवेश करीत असतात त्यांना या दिवसांचा खरा आनंद  कळत असतो. कारण, त्यांना प्रकाशाचा ध्यास लागून राहिलेला असतो. याचा अर्थ प्रकाशाचा दुसरा अर्थ आपल्या ध्येयाचा ध्यास असाच आहे. याकरिता म्हणजेच मनातील ध्येय साकारण्याकरिता रात्रीचा दिवस करणारी मंडळीसुद्धा असतातच असतात. एका नाटकाचे नाव ‘सूर्य पाहिलेला माणूस’ असे आहे. हे नाव खूपच अन्वयार्थक  आहे. कारण, सूर्य पाहणे ही गोष्ट तशी कोणत्याही काळात सोपी नव्हती. आजही सोपी नाही. तरीपण मानवी मनात सूर्यासमीप जाण्याचा ध्यास काही कमी होत नाही. कारण, आपले मन प्रकाशातून प्रकाशाकडे आणि त्यातून लख्ख प्रकाशाकडे जाणारे असते. उन्हाकडे पाठ फिरवून आयुष्यात काहीच साध्य करता येत नसते, असे आपणास आपली वडीलधारी मंडळी सतत सांगत असतात. म्हणूनच कदाचित संध्याकाळी ‘सातच्या आत घरात’ अशा नावाचे सिनेमेसुद्धा येऊ लागतात आणि ते वाक्यप्रचार होऊन जात असतात. एकूण काय अर्थ, तर माणूस हा प्रकाशात वावरण्यात धन्यता मानत आला आहे. उजळमाथ्याने कोणतेही कृत्य करण्याची ज्यांना भीती वाटत नाही अशीच माणसे प्रकाशाची नित्याची वाटसरू असतात आणि त्यांना आकाशीचा आणि दिव्याचा प्रकाश नेहमीच भरभरून काही ना काही देत असतो आणि देत आलेला आहे. दिवाळी या सार्‍याचे सार संचित घेऊन येत असते. म्हणून तर आपण तिची प्रतीक्षा करीत असतो. कारण, हा सण म्हणजे तमाच्या तळाशी दिवे लावण्याचा सण आहे. म्हणजेच दिवे केवळ दारासमोर आणि आपल्या अंगणी लावायचे नाहीत, तर जिथे-जिथे अंधार आहे तिथे-तिथे दिवे लावत पुढे जायचे आहे. त्याशिवाय आपणास प्रसन्‍नतेच्या प्रकाशपर्वाचे दर्शन होत नसते. ते उत्कटत्वाने व्हावे याकरिताच दिव्यांची आरास मांडायची असते आणि त्यात हरवूनपण जायचे असते.