Sat, Sep 21, 2019 06:30होमपेज › Bahar › चर्चा ‘फेसबुक’च्या चलनाची

चर्चा ‘फेसबुक’च्या चलनाची

Published On: Jun 09 2019 1:21AM | Last Updated: Jun 08 2019 8:55PM
अ‍ॅड. प्रदीप उमाप

फेसबुकने क्रिप्टोकरन्सी सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे वेधले गेले. ही क्रिप्टोकरन्सी (आभासी चलन) फेसबुकच्या माध्यमातून व्यवसायवृद्धीस चालना देईल; कारण हे खुले आभासी चलन असेल. इतर बंदिस्त आभासी चलनांपेक्षा त्याची तरलता (लिक्‍विडिटी) अधिक असेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. म्हणजेच, विविध प्रचलित चलनांबरोबर त्याचे हस्तांतरण अधिक सोपे असेल. त्यामुळे ग्राहकांना या चलनाचा वापर करण्याची इच्छा अधिक असेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. फेसबुकने व्हॉटस् अ‍ॅप आणि इन्स्टाग्रामवरही कब्जा केला आहे. त्यानंतर आता ‘पेमेंट प्लॅटफॉर्म’ निर्माण करून व्यवसायाची व्याप्‍ती अनेक पटींनी वाढविण्याचा फेसबुकचा विचार आहे, असे या निर्णयातून दिसून येते. 2020 च्या पहिल्या तीन महिन्यांत किमान 12 देश फेसबुकशी या विनिमय मंचाच्या सहाय्याने जोडले जातील, अशी शक्यता आहे. फेसबुकच्या या संभाव्य चलनाला इच्छुकांकडून ‘ग्लोबल कॉईन’ असे नाव मिळाले असून, या चलनाची चाचणी या वर्षात होईल, असा अंदाज ‘बीबीसी’ने वर्तविला आहे. अमेरिकेची यू. एस. ट्रेझरी आणि बँक ऑफ इंग्लंडसह अनेक देशांच्या चलन नियमन यंत्रणांशी फेसबुकने याविषयी बोलणी केली आहेत, असेही या वृत्तांतात म्हटले आहे. फेसबुकच्या या आभासी चलनाचा वापर अनेक मार्गांनी करता येऊ शकेल. उदाहरणार्थ, सोशल मीडियावर जाहिराती पाहणार्‍यांना ‘रिवार्ड’ म्हणून फेसबुककडून काही चलन दिले जाऊ शकते, असे वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे. 

‘प्रोजेक्ट लिब्रा’ या मोहिमेंतर्गत पैशांची देवाण-घेवाण गतिमान आणि सुटसुटीत करण्याचा फेसबुकचा विचार आहे. बँक खाते नसलेले लोक हा फेसबुकने या चलनाच्या बाबतीत आपला प्रमुख ग्राहक मानला आहे. ज्या डिजिटल करन्सीचा वापर व्यवहारांसाठी करण्यात येणार आहे, ती आता ‘ग्लोबल कॉईन’ नावाने ओळखली जाऊ लागली आहे. आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षितरीत्या करता यावेत, असा यामागील हेतू आहे. डॉलर किंवा अन्य चलन देऊन ‘ग्लोबल कॉईन’ हे आभासी चलन फेसबुककडून मिळविता येणार आहे. ऑनलाईन व्यापार करणार्‍यांनी ‘ग्लोबल कॉईन’ हे चलन स्वीकारावे, यासाठी फेसबुकचे प्रयत्न सुरू आहेत आणि 2020 पर्यंत प्रत्यक्ष व्यवहार सुरू होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ‘ग्लोबल कॉईन’चा विनिमय अमेरिकी डॉलर, ब्रिटिश पौंड, युरो, येन आदी विविध देशांच्या पारंपरिक चलनांबरोबर सुरू होण्यासाठी स्वित्झर्लंडमधील आर्थिक संघटनेसोबत, तसेच काही बँका आणि ब्रोकर्ससोबत फेसबुक काम करीत आहे, असे सांगितले जाते. परंतु, ‘ग्लोबल कॉईन’ हे केवळ व्यवहाराचे माध्यम राहावे आणि आभासी संपत्ती संकलित करण्याचे माध्यम बनू नये, यासाठी फेसबुकने दोन गोष्टी करण्याची गरज तज्ज्ञ व्यक्‍त करतात. एक म्हणजे, व्यापार्‍यांची सर्वव्यापी स्वीकारार्हता प्राप्‍त करणे आणि दुसरे म्हणजे, ‘ग्लोबल कॉईन’चा विनिमय दर स्थिर राखण्याचा प्रयत्न करणे.

अनेक ऑनलाईन व्यापार्‍यांशी फेसबुक चर्चा करीत असल्याचे ‘बीबीसी’ने आपल्या पहिल्या वृत्तांतात म्हटले असून, व्यवहाराचे अत्यल्प शुल्क आकारले जाईल, असे व्यापार्‍यांना सांगितले आहे. दुसर्‍या वृत्तांतात ‘बीबीसी’ने म्हटले आहे की, सातत्याने ज्या चलनाच्या विनिमय दरात चढ-उतार होत असतात, अशा चलनात व्यवहार करणे सामान्य लोक फारकाळ पसंद करत नाहीत. या अडथळ्यातून मार्ग काढण्यासाठी फेसबुकने ‘ग्लोबल कॉईन’ ही विविध देशांच्या सरकारकडून वितरित करण्यात येणार्‍या पारंपरिक चलनांच्या तुलनेत ‘स्टेबल कॉईन’ ठरावी, असा प्रयत्न सर्वप्रथम करायला हवा. फेसबुकच्या नियोजित आभासी चलनाचे मूल्य डॉलरच्या मूल्यानुसार ठरेल, असे ‘फायनान्शियल टाईम्स’ने म्हटले आहे. फेसबुककडून किती चलन वितरित केले जाईल, किती चलन साठवून ठेवण्यास परवानगी दिली जाईल आणि किती चलनाच्या विनिमयास परवानगी दिली जाईल, हे अद्याप अस्पष्ट असल्याचे या वृत्तांतात नमूद करण्यात आले आहे. बिटकॉईनसारख्या सध्या प्रचलित असणार्‍या आभासी चलनांना मोठ्या प्रमाणावर स्वीकारार्हता मिळविण्यात यश आलेले नाही. ‘ग्लोबल कॉईन’ हे नाव मात्र बदलण्याची शक्यता असून, याच नावाचे आभासी चलन 2012 मध्ये अस्तित्वात आल्यामुळे हा बदल संभवतो.

व्हिसा, मास्टरकार्ड, फर्स्ट डाटा अशा सध्याच्या पेमेंट प्रोसेसर्ससोबत फेसबुक काम करीत असून, मनी ट्रान्स्फर क्षेत्रातील जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी असणार्‍या वेस्टर्न युनियन कंपनीसोबतही स्वतःचे आभासी चलन सुरू करण्यापूर्वी फेसबुकची चर्चा सुरू आहे. एवढेच नव्हे, तर फेसबुकने अशा कंपन्यांच्या समूहाकडून एक अब्ज डॉलरची गुंतवणूकही अपेक्षित मानली आहे. या समूहात ई-कॉमर्स कंपन्यांची गुंतवणूक असणेही शक्य आहे. सध्या व्यवहारांसाठी साधारणपणे 2 ते 3 टक्के ‘ट्रॅन्झॅक्शन फी’ व्यापार्‍यांना भरावी लागते आणि त्यापासून त्यांना मुक्‍तता हवी आहे. हे शुल्क बँका, पेमेंट प्रोसेसर्स आणि पेमेंट नेटवर्क यांच्याकडून आकारले जाते. त्यामुळेच अशा कंपन्या आपलीच कमाई कमी करणार्‍या एखाद्या प्रकल्पात पैसे कसे काय गुंतवतील, अशीही शंका व्यक्‍त केली जात आहे. खरेतर फेसबुकची संबंधित योजना अशा कंपन्यांची व्यावसायिक प्रतिस्पर्धीच ठरणार आहे. असे असले तरी येत्या तीन ते पाच वर्षांच्या कालावधीत फेसबुकची क्रिप्टोकरन्सी दैनंदिन जीवनाचा भाग बनेल, असे काहींना वाटते. 

मात्र, याबाबतीत काही अडथळे आणि धोके आहेत, त्याकडेही काही तज्ज्ञ लक्ष वेधतात. क्रिप्टोकरन्सीची निर्मिती आणि प्रसार करताना अनेक देशांच्या नियामक यंत्रणांना सामोरे जावे लागणार आहे. त्याचप्रमाणे गोपनीयता हा सर्वात मोठा धोका या प्रक्रियेत काहींना जाणवतो. गोपनीयतेच्या बाबतीत फेसबुक सध्याच अनेक खटल्यांना सामोरे जात आहे. गोपनीयता नसल्यामुळे फेसबुकवरील डेटा अनेक कंपन्यांकडे गेल्याचे निदर्शनाला आल्यानंतर फेसबुकवर चौफेर टीकाही झाली. अशावेळी लोक आपले आर्थिक व्यवहार फेसबुकच्या आभासी चलनाद्वारे करतील का, असाही प्रश्‍न विचारला जात आहे. 

दुसरी महत्त्वाची भीती अशी व्यक्‍त केली जात आहे की, स्वतःची देवाण-घेवाण प्रणाली स्वतःच्याच चलनाच्या माध्यमातून पुरविल्यानंतर फेसबुकला लोकांच्या खर्च करण्याच्या सवयींबाबतही माहिती होणार आहे. अशा स्थितीत मुळातच असुरक्षित असलेला फेसबुकवरचा डेटा पुढील काळात अधिक असुरक्षित होईल, अशी चिंता काहीजण व्यक्‍त करीत आहेत. 

अमेरिकेच्या यू. एस. ट्रेझरीनेही अशी शंका व्यक्‍त केली आहे की, ‘ग्लोबल कॉईन’चा वापर पैशांची अफरातफर करण्यासाठी किंवा काळा पैसा पांढरा करण्यासाठी केला जाऊ शकतो. दरम्यान, अमेरिकेतील सिनेट कमिटी ऑन बँकिंग, हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्सने फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना पत्र लिहिले असून, अनेक प्रकारच्या चिंता फेसबुकच्या नवीन आभासी चलनाविषयी व्यक्‍त केल्या आहेत. वापरकर्त्यांना गोपनीयतेची आणि सुरक्षिततेची हमी कशी देणार? वापरकर्त्यांच्या आर्थिक घडामोडींसंदर्भात कोणती माहिती फेसबुकला मिळणार? वापरकर्त्याची कोणतीही माहिती इतरांना देणे किंवा विकणे फेसबुकला शक्य होणार का? व्यक्‍तिगत वित्तीय बाबींसंदर्भात कोणती माहिती फेसबुक गोळा करू पाहत आहे? फेअर क्रेडिट रिपोर्टिंग अ‍ॅक्टचे पालन फेसबुक करणार का? असे अनेक प्रश्‍न या कमिटीने विचारले असून, त्यामुळे फेसबुकचे आभासी चलन बाजारात येण्याची वाट खडतर ठरू शकते. याखेरीज विविध देशांमधील नियामक यंत्रणांच्या अशाच प्रकारच्या असंख्य प्रश्‍नांना सामोरे जावे लागणार असून, फेसबुकचे हे नवे आभासी चलन प्रत्यक्षात येण्यास किती दिवस लागतात, याबद्दल साशंकता आहे, ती यामुळेच. 

आभासी चलन ही संकल्पना प्रत्यक्षात उतरून आता दहा वर्षे होऊन गेली आहेत. विविध देशांच्या नियामक यंत्रणांनी या चलनाला परवानगी मागितली, याचे मुख्य कारण म्हणजे अशाप्रकारच्या आभासी चलनातील व्यवहारांवर कोणत्याही देशाच्या नियामक यंत्रणेचे अजिबात नियंत्रण नसते. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहारांची संख्या वाढण्याचा धोका असतो. सर्वसामान्य लोकांचाही आभासी चलनावर फारसा विश्‍वास बसू शकलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर फेसबुकच्या आभासी चलनाचा पुढचा प्रवास कसा राहतो, हे पाहावे लागेल.