Wed, Oct 24, 2018 02:12होमपेज › Bahar › बहार विशेष : कोपार्डीच्या पलीकडे

बहार विशेष : कोपार्डीच्या पलीकडे

Published On: Dec 03 2017 12:44AM | Last Updated: Dec 03 2017 12:44AM

बुकमार्क करा

डॉ. आशा मिरगे, 
माजी सदस्य, राज्य महिला आयोग

कोपर्डी अत्याचाराची घटना दुर्मिळातील दुर्मीळ असल्याने यातील आरोपींना फाशीचीच शिक्षा योग्य होती. मात्र, या पीडितेवर झालेले अनन्वित अत्याचार पाहता तो सूड होता की काय, असा प्रश्‍न पडतो. यातील न्यायिक प्रक्रिया पार पाडताना गतिमानतेने पावले टाकली गेली. मात्र, अशा अन्य घटनांचे काय? त्या घटना कोपर्डीइतक्या अमानुष नसतीलही; पण शेवटी अत्याचार हा अत्याचारच आहे. ज्याअर्थी आमच्या मुलींना, लेकींना अत्याचारांचा सामना करावा लागत आहे, त्याअर्थी वाचवणारे हात कमी पडत आहेत. समाजातील चांगल्या विचारांची माणसे वाईट शक्‍तींचा मुकाबला एकवटून करत नाहीत, ही यातील खरी अडचण आहे.

कोपर्डीतील बलात्कार आणि खूनप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. याबाबत अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्यासह तपास प्रक्रिया आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यापर्यंतच्या टप्प्यांमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक घटकाला धन्यवाद द्यायला हवेत. ही घटना अत्यंत क्रूर, अमानुष आणि निर्घृण होती. त्यामुळेच ‘रेअरेस्ट रेअर’ म्हणजेच दुर्मिळातील दुर्मीळच होती. मुख्य म्हणजे, ज्या पद्धतीने त्या चिमुरडीवर अत्याचार झाले, ते पाहता स्त्री जातीविषयी किंवा तिच्या मुलगी असण्याविषयी किंवा तिच्या कुटुंबाविषयी किंवा तिच्या जातीविषयी किंवा अन्य कोणती तरी विलक्षण चीड, घृणा अथवा भयानक राग या गुन्हेगारांमध्ये होता आणि तो त्यांनी या कृत्यातून व्यक्‍त केला, असे लक्षात येते. ही घटना घडल्यानंतर तेथील स्थानिक यंत्रणेने त्या मुलीचे शवविच्छेदनच होऊ नये, अशाप्रकारची तजवीज केल्याचे सांगितले जात होते. हे प्रकरण दडपून टाकण्याचे प्रयत्नही सुरू होते. यादरम्यान मी स्वतः तिथे गेले होते. त्यावेळी त्या 15 वर्षांच्या मुलीचे शव विदारक या शब्दालाही लाजवेल अशाप्रकारे झाले होते. अत्याचार करणार्‍या नराधमांनी दोन्ही हात आणि पाय सांध्यांपासून मुरगळून, मोडून टाकले होते. तिची मान 180 अंशांमध्ये मुरगळली होती. तिच्या तोंडामध्ये तीन रुमाल लाकडाने कोंबले होते. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावा घेऊन लचके तोडले होते. तिच्या गुप्‍तांगामध्ये माती-रेती कोंबली होती. इतक्या अमानुषपणाने हे निर्घृण कृत्य करूनही तिन्ही नराधमांच्या चेहर्‍यावर तीळमात्रही पश्‍चात्तापाचा लवलेश नव्हता. याचाच अर्थ, हे कृत्य कट रचून नियोजनबद्धपणाने केलेले होते, हे स्पष्ट होते. त्यावरूनच ही विकृती केवळ नर आणि मादी एवढ्यापुरती नाही, असे मला वाटते. 

घटना घडल्यानंतर या प्रकरणाला जातीय, राजकीय, धर्मीय रंग देण्यात आला. सोशल मीडियावरून असंख्य संदेश फिरत राहिले. आपल्या भारतामध्ये जातीयवाद आहे, हे उघड सत्य आहे. इथल्या गुन्ह्यालाही जात असते, गुन्हेगारालाही जात असते. मात्र, जेव्हा अशाप्रकारचे अमानुष आणि काळीज पिळवटून टाकणारे कृत्य घडते, तेव्हा या जातीच्या भिंती पाडून सर्वच समाज एकत्र येतो. हे आजवर असंख्य घटनांमध्ये आपण पाहिले आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर संपूर्ण देशभरातून हळहळ, संताप व्यक्‍त झाला आणि निदर्शनेही झाली. कोपर्डी घटनेनंतरचे चित्र मात्र याउलट होते. ज्या मुलीवर बलात्कार झाला, ती जात न्याय मागण्यासाठी एकत्रित झाली, तर ज्या जातीच्या नराधमांनी हा अत्याचार केला, त्या जातीतील अनेकजण या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी अथवा त्यांचे समर्थन करण्यासाठी एकवटलेले दिसून आले. सार्वजनिक ठिकाणी हे वास्तव फारसे दिसले नसले, तरीही समाजमाध्यमांमधून याची प्रचिती प्रकर्षाने आली. ही गोष्ट चिंताजनक आहे. याचे कारण एखाद्या कुटुंबावर, समूहावर, जातीवर राग व्यक्‍त करायचा असेल किंवा त्यांना नामोहरम करायचे असेल, तर त्यासाठी महिलांना टार्गेट केले जाईल की काय, अशी भीती यानिमित्ताने वाटू लागली आहे. कारण, कोपर्डी प्रकरणातील क्रूरता पाहता, हा तिच्या अस्तित्वावरच घाला होता, असे लक्षात येते. 

सुरुवातीला या प्रकरणामध्ये चार आरोपी आहेत, अशाप्रकारची चर्चा सुरू होती. त्याच काळात यातीलच एकाचा फोटो तेथील पालकमंत्र्यांसोबत सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानिमित्ताने एका गोष्टीकडे मला लक्ष वेधावेसे वाटते. अलीकडील काळात राजकीय पक्षांतील अनेक नेते हे निर्ढावल्यासारखे वागताना दिसत आहेत. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ही मंडळी पैसे, दारू आणि प्रसंगी स्त्रीचे आमिष दाखवत आहेत. ही स्वार्थी प्रवृत्ती जवळपास सर्वच राजकीय पक्षांमध्ये फोफावत चालली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या पक्षांमध्ये अशाप्रकारची मनोवृत्ती किंवा राजकीय प्रवृत्ती वाढत नाहीये ना, याकडे लक्ष देणे आवश्यक बनले आहे. कारण, याचा परिणाम अंतिमतः पक्षावरच होणार आहे. 

आणखी एक मुद्दा म्हणजे, कोपर्डीतील घटना असेल, शक्‍ती मिल प्रकरण असेल किंवा अशाप्रकारच्या अन्य अमानुष घटना असतील; त्यातील आरोपींना मानवी समाजामध्ये वकील मिळतो, हा मला माझ्या स्त्रीत्वाचा अपमान वाटतो. ही भावना केवळ माझ्या एकटीची नसून, सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या, स्त्रियांसाठी संघर्ष करणार्‍या, झटणार्‍या बहुतांश कार्यकर्त्यांच्या मनात आहे. अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना हा गुन्हा या आरोपींनी केला, हे सिद्ध करावे लागले. मात्र, बचाव पक्षाच्या वकिलांना या नराधमांनी सर्व वस्तुस्थिती कथन केलेली असेल. मग त्यावेळी त्यांच्यातील माणूस, आत्मा कळवळला नाही का? त्यांच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत का? असा प्रश्‍न पडतो. आज या विकृत प्रवृत्तींच्या बचावासाठी आपण लढलो आणि त्यांना विजय मिळवून दिला, तर त्या फोफावत जातील, त्यातून समाजाचे नुकसान होईलच. परंतु, उद्या चालून माझ्या कुटुंबालाही या प्रवृत्तींचा त्रास होऊ शकतो, असे या वकिलांना वाटले नसेल? 

जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पुढे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज हे टप्पे बाकी आहेत. यातील कोणाही एका टप्प्यावर या नराधमांची शिक्षा तसूभरही कमी होता कामा नये, यासाठी आपण सर्वांनीच दक्ष राहायला हवे. सत्र न्यायालयाचा निकाल आल्यानंतर कित्येकांनी फाशीपेक्षाही कठोर शिक्षा द्यायला हवी, त्या पीडितेचा जसा छळ केला, तसा क्रूर छळ करून या आरोपींना मृत्युदंड द्यायला हवा, अशाप्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या. अशाप्रकारे शिक्षा देणे अमानुष आहे, अमानवी आहे, मानवाधिकारांमध्ये, कायद्याच्या चौकटीत बसणारे नाही, हे मान्य आहे. मात्र, घटनेची क्रूरता लक्षात घेतली आणि आपल्या पोटच्या लेकीचे अनन्वित छळ करून, अत्याचार करून मृतावस्थेत पडलेले शरीर पाहून त्या आईच्या भावना काय झाल्या असतील, याचा विचार केला, तर अशा प्रतिक्रिया गैर म्हणता येणार नाहीत. 

कोपर्डीच्या प्रकरणामध्ये सामाजिक दबाव होता, लोकसमूहाचा दबाव होता, माध्यमांचे या प्रकरणाकडे लक्ष होते आणि काही प्रमाणात राजकीय दबावही होता. त्यामुळे यातील न्यायिक प्रक्रिया पार पाडताना गतिमानतेने पावले टाकली गेली. मात्र, अशा अन्य घटनांचे काय? त्या घटना कोपर्डीइतक्या अमानुष नसतीलही; पण शेवटी अत्याचार हा अत्याचारच आहे. त्यापलीकडे जाऊन ज्या घटनांची नोंदच होत नाही अथवा झाली नाही त्याचे काय? मुळातच अशा घटना घडणे, हा समाज म्हणून आपलाच दोष आहे, असे मला वाटते. आपल्या मुलीला, गुडियाला, चिमुकलीला सतत ‘भय इथले संपत नाही’ असे वाटत असेल, तर तो सुजाण समाज म्हणून आपला सर्वांचा पराभव आहे. हे भय कधी संपणार? पुराणांमध्ये सांगतात तशाप्रकारे कोणी अवतार येऊन आमच्या लेकींना वाचवणार आहे का? नाही. ज्या अर्थी आमच्या मुलींना, लेकींना अत्याचारांचा सामना करावा लागत आहे, त्याअर्थी वाचवणारे हात कमी पडत आहेत. मग ते हात पोलिसांचे असतील, प्रशासनाचे असतील, वकिलांचे असतील, पालकांचे असतील, चांगल्या माणसांचे असतील; पण ते कमी पडताहेत, हे वास्तव आहे. मुळातच समाजातील चांगल्या विचारांची माणसे वाईट शक्‍तींचा मुकाबला एकवटून करत नाहीत, ही यातील खरी अडचण आहे. बर्‍याचदा न्याय मिळण्यासाठी वेळ लागतो किंवा आरोपी निर्दोष सुटून जातात, याचे कारणही यामध्येच दडलेले आहे. 

समारोप करताना एक विचार मांडावासा वाटतो. कदाचित तो अनेकांना पटणार नाही; पण अशाप्रकारचे निर्घृण कृत्य करणार्‍या गुन्हेगारांच्या, नराधमांच्या कुटुंबाला वाळीत का टाकले जाऊ नये?  आज गुन्ह्यासंदर्भातील शिक्षेची तरतूद गुन्हेगारापुरती मर्यादित आहे. त्यामुळे बरेचदा गुन्हा केला तरी फक्‍त तुरुंगामध्ये जाऊ, अशी मानसिकता दिसून येते. मात्र, समाजाने त्या कुटुंबांना वाळीत टाकले, तर अशाप्रकारचे कृत्य करण्यापूर्वी या व्यक्‍ती हजार वेळा विचार करतील. आपण तुरुंगात जाऊ, फासावर जाऊ. परंतु, आपल्या पश्‍चात आपल्या कुटुंबाला समाज सुखाने जगू देणार नाही, अशी भीती निर्माण होईल. थोडक्यात, अशाप्रकारचे कृत्य करणार्‍यांना वकील मिळण्यापासून, नोकरी मिळण्यापासून वंचित ठेवून समाजाने त्यांना एकटे पाडायचे ठरवल्यास ती शिक्षा कायदेशीर शिक्षेपेक्षाही भीतीदायक ठरू शकेल.