Sun, Jun 07, 2020 01:33होमपेज › Bahar › उत्सुकता ‘चांद्रयान-2’ची

उत्सुकता ‘चांद्रयान-2’ची

Published On: May 12 2019 2:01AM | Last Updated: May 12 2019 2:01AM
श्रीनिवास औंधकर, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ

भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-2’ मोहिमेच्या प्रारंभाची तारीख जाहीर झाली आहे. या मोहिमेअंतर्गत भारताची चंद्रावरील दुसरी स्वारी 9 ते 16 जुलैदरम्यान सुरू होईल, असे ‘इस्रो’ने सांगितले आहे. चंद्राची अनेक रहस्ये उकलण्यात अद्याप मानवाला यश आलेले नाही. तेथील जीवसृष्टीस पोषक वातावरण आणि खनिजे यासंबंधी विस्तृत माहिती गोळा करणे हे ‘चांद्रयान-2’चे प्रमुख उद्दिष्ट आहे. जोपर्यंत चंद्राशी संबंधित अनेक रहस्यांचा उलगडा होत नाही, तोपर्यंत चंद्राविषयीच्या संशोधनात अनेक शक्यता कायम राहणार आहेत.

‘चांद्रयान-2’ ही भारताची अत्यंत महत्त्वाकांक्षी अवकाश मोहीम आहे. ही मोहीम हाती घेण्यास काहीसा विलंब झालेला असला, तरी ही योजना भारताच्या अंतरिक्ष क्षेत्रातील क्षमता दाखवून देणारी ठरणार असून, चंद्राविषयी नवीन संशोधन करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 9 ते 16 जुलैदरम्यान ही मोहीम हाती घेतली जाईल, असे भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेने (इस्रो) जाहीर केले आहे. या मोहिमेचे यश भारतासाठी अंतरिक्ष संशोधनात अनेक शक्यतांचे दरवाजे खुले करणारे ठरणार आहे. ‘चांद्रयान-2’ हा भारतासाठी चंद्रावर उतरण्याचा परवानाच ठरणार आहे. भारताच्या चांद्रमोहिमेची चर्चा ज्या ज्यावेळी केली जाते, त्या त्यावेळी एक शंका नेहमी उपस्थित केली जाते. अमेरिकेने 50 वर्षांपूर्वी चंद्रावर मानव उतरविला. तेव्हापासून आतापर्यंत अनेक देशांनी चंद्राविषयी भरपूर संशोधन केले असून, अद्याप या संशोधनास फारसे यश मिळालेले नाही, अशा वेळी भारताच्या हाती काय लागणार, अशी ही शंका असते. या प्रश्‍नाचे नेमके आणि पटण्याजोगे उत्तर ‘इस्रो’कडे आहे.

आतापर्यंत ज्या ज्या देशांनी चंद्राविषयी संशोधन करण्यासाठी मोहिमा आखल्या, त्यापैकी एकाही मोहिमेला चंद्रावर पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले नव्हते; परंतु भारताच्या ‘चांद्रयान-1’मधील एका उपकरणाद्वारे असे स्पष्ट झाले की, कोणे एके काळी चंद्रावर पाणी होते, असे मानता येईल. ही उपकरणे ‘नासा’ या अमेरिकी अंतरिक्ष संशोधन संस्थेची असली आणि हा निष्कर्षसुद्धा ‘नासा’च्याच शास्त्रज्ञांनी काढलेला असला, तरी याचे श्रेय ‘चांद्रयान-1’ मोहिमेलाच दिले जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही जगातील सर्वात कमी खर्चिक चांद्रमोहीम ठरली होती.

सर्व तर्कवितर्क बाजूला ठेवून पाहिले असता असे दिसते की, ‘चांद्रमोहीम-2’ ही मोहीम भारताला आपली अंतरिक्ष संशोधन क्षेत्रातील क्षमता सिद्ध करून दाखविण्याची अमूल्य संधी आहे. अंतरिक्ष संशोधन कार्यक्रमात भारत विकसित देशांच्या पंक्तीत स्थान मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वात कमी गुंतवणूक करून भारताने या क्षेत्रात खूपच चांगला परिणाम साधला आहे. ‘चांद्रयान-1’ आणि ‘मंगळयान’ या भारताच्या अत्यंत यशस्वी अशा दोन मोहिमा असून, त्यानंतर भारताकडून अंतरिक्षात मानवाला पाठविण्याची तयारीसुद्धा सुरू झाली आहे. सप्टेंबरमध्ये ‘चांद्रयान-2’ मोहिमेअंतर्गत ‘लँडर’ नावाचे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविले जाणार आहे. त्याच्या आतून एक ‘रोव्हर’ बाहेर येईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून अनेक प्रकारची माहिती आणि आकडेवारी गोळा करेल.

‘चांद्रयान-1’ आणि ‘चांद्रयान-2’ यातील फरक जाणून घ्यायचा झाल्यास असे सांगता येईल की, ‘चांद्रयान-1’ने चंद्रापासून शंभर किलोमीटर दूर राहून चंद्राचे विश्‍लेषण केले होते. आता त्याच तोडीची अन्य 13 उन्नत उपकरणे ‘चांद्रयान-2’मध्ये असतील. ही उपकरणे प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर राहूनच चंद्राचे विश्‍लेषण करतील. अर्थात, ‘चांद्रयान-2’ची क्षमता चंद्रावर उतरण्यापुरतीच मर्यादित आहे. कदाचित, ‘चांद्रयान-3’ मोहिमेद्वारे चंद्रावर पोहोचून पृथ्वीवर माघारी येण्याची क्षमताही भारताकडून विकसित केली जाईल.

‘चांद्रयान-2’चे औचित्य समजून घेण्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट माहीत असणे गरजेचे आहे. ती म्हणजे, आतापर्यंत चंद्राच्या ज्या भागावर कोणत्याही देशाचे कोणतेही यान उतरले नव्हते, त्या भागावर ‘रोव्हर’ उतरणार आहे. हे रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरविले जाणार आहे. त्यामुळेच चंद्राच्या बाबतीत जी मूलभूत माहिती आतापर्यंत कधीच पुढे आलेली नाही, ती या मोहिमेमुळे प्रकाशात येण्याची शक्यता आहे. याच वर्षी चीननेही आपले ‘चेंग-4’ हे यान चंद्रावर उतरविले आहे. चीननेही हे यान चंद्राच्या अशा भागावर उतरविले आहे, जेथे आतापर्यंत कोणत्याही देशाचे यान उतरले नव्हते. वस्तुतः, आतापर्यंतची सर्व याने चंद्राच्या पृथ्वीकडून दिसणार्‍या भागावरच उतरविली गेली होती. हीच बाजू पृथ्वीपासून सर्वात जवळची असून, तिला ‘निअर साइट’ असे म्हणतात. चंद्राचा न दिसणारा जो हिस्सा आहे, त्याला ‘फार साइट’ असे नाव दिले गेले आहे. चीनचे यान या ‘फार साइट’वर उतरविण्यात आले आहे. पृथ्वीच्या दृष्टीने पाहिल्यास ही चंद्राची मागील बाजू आहे. वास्तविक, चंद्राविषयी आपल्याला आता जी माहिती आहे, ती एकूण माहितीच्या एक टक्कासुद्धा नाही. ‘चांद्रयान-2’च्या माध्यमातून भारतीय शास्त्रज्ञ आपल्या क्षमतेचे शानदार दर्शन जगाला घडवतील, त्याचप्रमाणे अनेक अनुत्तरित प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचाही प्रयत्न करतील.

सध्या चंद्राच्या बाबतीत दोन बाजूंनी संशोधन सुरू आहे. एक म्हणजे, चंद्रावर कधी काळी जीवन अस्तित्वात होते का? दुसरा प्रश्‍न म्हणजे, चंद्रावर काही बहुमूल्य नैसर्गिक संपत्ती किंवा मौल्यवान खनिजे आहेत का? अत्यंत उपयुक्त असा हेलियम वायू चंद्रावर आहे का, याचाही शोध शास्त्रज्ञांना घ्यायचा आहे. असल्यास हा वायू पृथ्वीवर आणणे शक्य आहे का, हेही त्यांना तपासायचे आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, हेलियम-3 हा वायू चंद्रावर 10 लाख मेट्रिक टन एवढ्या प्रचंड प्रमाणावर उपलब्ध असून, तो मोठ्या प्रमाणावर ऊर्जानिर्मिती करू शकतो. हा वायू पृथ्वीवर आणण्यात यश मिळाल्यास त्याची किंमत अब्जावधींमध्ये असेल, अशी शक्यता वर्तविण्यात येते. त्याचप्रमाणे चंद्रावर एखाद्या उपयुक्त धातूचा साठा सापडू शकतो का आणि तो पृथ्वीवर आणून उपयोगात आणता येऊ शकतो का, असाही विचार सुरू आहे. चंद्राविषयीच्या संशोधनाचे हे दोन पैलू अत्यंत महत्त्वाचे आहेत. ज्या देशाला या दोन पैलूंविषयी संशोधनात आघाडी घेता येईल, त्याला भविष्यात अधिक प्रगती साधण्याची संधी आहे.

9 ते 16 जुलैदरम्यान ‘चांद्रयान-2’ पृथ्वीवरून रवाना केले जाईल आणि चंद्रावर पोहोचण्यास त्याला सप्टेंबर उजाडेल. ऑर्बिटर, रोव्हर आणि लँडर असे तीन प्रमुख भाग ‘चांद्रयान-2’मध्ये असणार आहेत. वर उल्लेखिल्याप्रमाणे लँडर चंद्रावर उतरेल आणि त्यातून रोव्हर बाहेर येईल. तो चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून माहिती संकलित करेल. त्याच वेळी ऑर्बिटर मात्र चंद्राला प्रदक्षिणा घालत राहील. ऑर्बिटर आणि लँडर या दोहोंना भारताच्या ‘जीएसएलव्ही मार्क-3’ या अग्निबाणाच्या साह्याने चंद्राच्या कक्षेपर्यंत सोडण्यात येणार आहे. लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावरील ‘सॉफ्ट लँडिंग’ महत्त्वाचे ठरणार आहे. यात यश मिळाले, तरच रोव्हर पुढील कामे व्यवस्थित करू शकणार आहे. यापूर्वी ‘चांद्रयान-2’ ही मोहीम 2017 मध्ये आणि त्यानंतर 2018 मध्ये जाहीर करण्यात आली होती; परंतु त्यावेळी तयारी पूर्ण होऊ शकली नव्हती. 2008 मध्ये ‘चांद्रयान-1’चे यशस्वी प्रक्षेपण करणार्‍या ‘इस्रो’ने ‘चांद्रयान-2’साठी तयारीत कोणतीही कमतरता राहू नये म्हणून काळजी घेतली आहे.

त्यामुळेच गेल्या दोन वर्षांत मोहीम शक्य झाली नसली, तरी आता ती पूर्ण तयारीनिशीच केली जाईल, याविषयी कुणाच्याही मनात शंका नाही. आता तर तारखाही जाहीर झालेल्या असल्यामुळे सर्व भारतीयांचे आणि खगोलप्रेमींचे लक्ष या मोहिमेकडे लागले आहे. ‘चांद्रयान-1’ ही मोहीम 29 ऑगस्ट 2009 रोजीच समाप्त करण्यात आली होती. त्यावेळी इंधनाची कमतरता हे कारण पुढे आले होते. वस्तुतः, ही मोहीम दोन वर्षे सुरू राहणे अपेक्षित होते. आता इंधनाच्या बाबतीतही ‘इस्रो’कडून काळजी घेतली जाईल, हे उघड आहे. एकीकडे ‘चांद्रयान-1’ मोहीम वेळेपूर्वी समाप्त केल्याचे उदाहरण असताना दुसरीकडे मंगळयानाचे नेमके विरुद्ध उदाहरण आपल्यासमोर आहे. मंगळयानातील उपकरणांचे जे आयुर्मान ‘इस्रो’ने सांगितले होते, ते उलटून गेल्यानंतरसुद्धा ही उपकरणे कार्यरत राहिली आणि मंगळाविषयीची अचूक माहिती देत राहिली. हे सर्व अनुभव आणि ‘चांद्रयान-2’ मोहीम दोन वर्षे पुढे ढकलण्याचा ‘इस्रो’चा निर्णय यावरून असे बिनदिक्कत म्हणता येते की, ‘चांद्रयान-2’ मोहीम यशस्वी करण्याचा चंग ‘इस्रो’ने बांधला आहे आणि त्यात कोणत्याही बाजूने कमतरता राहणार नाही, असा प्रयत्न आहे. त्यामुळे ही मोहीम फत्ते होईल, अशी खात्री सर्वांना आहे.