Thu, Nov 14, 2019 07:07होमपेज › Bahar › पुस्तकांचे पाठबळ 

पुस्तकांचे पाठबळ 

Published On: Jul 07 2019 1:30AM | Last Updated: Jul 06 2019 8:15PM
वैजनाथ महाजन

देशाचे  पंतप्रधान असे म्हणाले, की माणसाने पुस्तकांसाठी थोडा वेळ काढलाच पाहिजे. पुस्तकांसाठी वेळ काढणे याचा सरळ साधा अर्थ वाचनासाठी वेळ काढणे, असा आहे. सामान्यतः, गेल्या काही वर्षांत तरुणाई काही वाचत नाही, अशी एक सार्वत्रिक तक्रार ऐकू येते. अर्थात, अशी आरडाओरड करणारे विपुल वाचन करत असतील, असेही मुळीच मानण्याचे कारण नाही. कारण, आपल्याकडे साधारणतः एक सार्वजनिक सूर निर्माण झाला की, तोच वारंवार आळविण्याची पूर्वापार प्रथा आहे.

हासुद्धा यापैकीच एक वरवरचा अभिप्राय वजा प्रकार आहे, असे म्हटले तर त्यात फ ारसे वावगे वाटण्याचे कारण नाही. जेव्हा फ ारसे वाचन न करता अनेक प्रकारच्या परीक्षा सहज देता येऊ लागतात, तेव्हा विद्यार्थ्यांकडून वाचनाबाबत दुर्लक्ष होणे, तसेच स्वाभाविकच म्हटले पाहिजे. आपण जर आपल्या मुक्‍त विद्यापीठाचे अभ्यासक्रम डोळ्यांखालून घातले, की हे सहज लक्षात येते. मुक्‍त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना फ क्‍त पदवी हवी आहे. हाच हेतू डोळ्यांसमोर ठेवून अशा अभ्यासाची सोपी पद्धत आणि त्याकरिता सुलभ अभ्यासक्रम असा हा  उपक्रम गेले अनेक वर्षे  बिनधास्तपणे सुरू आहे. त्यामुळे एकदा का पदवी हाती पडली, की पुन्हा जी काही थोडीफ ार पुस्तके असतील, तीपण नजरे आड होतात आणि वाचन शून्यतेची प्रक्रिया पुढे चालू राहते. कोणताही दर्जेदार आणि गुणात्मक असा  व्यवहार निर्माण करायचा झाला, तर त्याकरिता त्याचा अत्यंत पद्धतशीर असा अभ्यास असतो. त्याकरिता पुस्तके गोळा करावी लागतात आणि अलीकडे गुगल बुवाला  शरण जावे लागते. त्यामुळे  गुगलवर  विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर सहज उपलब्ध होत असल्याने पुस्तकांत डोकवावे लागतच नाही. म्हणजे, पुन्हा ही सोयही आपणास पुस्तकांपासून शिताफ ीने दूर ठेवते आहे. म्हणजे, ज्याला आपण कामचलाऊ वाचन, असे म्हणतो तेसुद्धा होत नाही. विशेष म्हणजे, त्याची गरज वाटावी असे जर आपण काही सुविहीत असे व्यवस्थापन निर्माण करू शकलो नाही, तर वाचन दुर्लक्षितच होणार. मग मुलांकरिता पुस्तक वाचन स्पर्धा घ्याव्या लागतात आणि त्यांना वाचनासाठी पुस्तकापेक्षा पैशाचे प्रलोभन दाखवावे लागते, हेही यातील एक कटू सत्य आहे. त्यामुळे जसा सक्‍तीने कोणताही अभ्यास समाधानकारकरीत्या पूर्ण होत नाही. त्याच पद्धतीने सक्‍तीने वाचनाचा आनंद आपण कोणाच्याही पदरात टाकू शकत नाही.

यामुळे वाचनाबद्दल समाजात आस्था आणि जागरूकता वाढविण्याचे वाचन दिन, ग्रंथ दिन असे जरी आपण उपक्रम केले, तरी पुस्तकांना भरघोस पाठबळ लाभते आहे आणि पुस्तकांवर उड्या पडत आहेत, असे चित्र भविष्यातसुद्धा निर्माण होण्याची शक्यता नाही. ज्ञानाची  गंगोत्री जर पुस्तकच असेल, तर त्याकडे आणि एकूणच ग्रंथ व्यवहाराकडे अत्यंत सजगतेने व सावधपणाने पाहणे अगत्याचे आहे. एका ग्रंथालयात बसलो असताना ग्रंथालयातील वरिष्ठांनी तिथल्या कर्मचार्‍याला माझ्याकरिता दोन पुस्तके घेऊन ये, असा आदेश सोडला. आता यात पुस्तकांच्या नावाचा उल्लेख नव्हता. तेव्हा मी त्यांना विचारले, तो आपणाला कोणती पुस्तके आणून देणार, त्यावर त्यांनी दिलेले उत्तर खूप मासलेवाईक आहे. ते म्हणाले, की मी कोणतीही दोन पुस्तके आठवड्यातून एकदा घेऊन जात असतो आणि परत आणून देत असतो. घरी ती तशीच ठेवतो आणि त्यांना कोणतेही नुकसान न पोहोचविता परत आणून देतो. ग्रंथालयाचा प्रमुख असल्याने तुमच्यासारखी मंडळी तुम्ही स्वतः काही वाचता का? असा जर प्रश्‍न केला की तर त्या दोन पुस्तकांकडे अंगुली निर्देश करता येतो. याचा अर्थ पुस्तक वाचणे त्यातून काही स्वतःकरिता बोध घेणे याच्यापेक्षा पुस्तके मिरविणारा असा एक व्यक्‍त आणि अव्यक्‍त वर्ग आज आपणासमोर आहे. अनेकांना व्यासपीठावर काव्यात्मक विधाने फे कण्याकरिता पुस्तके हवी असतात. त्यांचीपण पुस्तकांची भूक अगदी मर्यादित असते. ते कुणाला तरी सांगून  पुस्तकातील चांगली चांगली विधाने उतरून घेतात आणि आपली वेळ मारून नेतात.

आता अशा मंडळींकडून आपण कोणत्या प्रबोधनाची अपेक्षा करणार? एकेकाळी आपले सर्वच नेते त्यांच्या त्यांच्या वाचनाकरिता नावजले जात असत. त्यांच्या बोलण्यातून त्यांचे वाचन समजून येत असे आणि त्यांच्याबद्दलचा सर्वसामान्य माणसाच्या मनातील आदर आपोआप दुणावत असे. आता असे होत नाही. इथे वाचायला वेळ आहेच कुणाकडे? उलटपक्षी, वाचन हा  रिकामटेकड्यांचा उद्योग आहे, अशीपण शेरेबाजी आपल्या कानी पडत असते. त्यामुळे वाचन केले नाही म्हणून काही बिघडत नाही. आणि आपल्या मिळकतीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. हे लोकांच्या लक्षात आले की, ते वाचनापासून आपोआपच योजने दूर जात असतात. दुर्दैवाने  हे चित्र शिक्षण क्षेत्रातसुद्धा दिसून येते आणि मन व्यथित होते. यामुळे जेव्हा पंतप्रधानांसारखा सर्वोच्चपदी विराजमान झालेला माणूस  पुस्तकाबद्दल बोलतो, तेव्हा त्याला निश्‍चित एक वेगळा सांस्कृतिक अर्थप्राप्‍त होत असतो.

वादे वादे तू जायते तत्त्व बोध हा, असे आपल्याकडे म्हटलेले आहे; पण वाद घालायचा म्हटल्यावरसुद्धा तसे दणदणीत वाचनच असायला हवे. त्याशिवाय, आपण पद्धतीशीरपणे वाद घालू शकत नाही. असे सकारात्मक वाद  समाजासाठी नेहमीच उपयुक्‍त असतात आणि  ते कळत न कळत समाजाला पुढे नेत असतात. चर्चासत्रे, व्याख्याने याकरिताच आयोजित केले जात असतात. ज्यांना वाचायला खरोखरच वेळ मिळत नाही. अशा मंडळींनी जर अभ्यासपूर्ण व्याख्याने ऐकली तर त्यांची आपोआप पुस्तकांची ओळख होऊ शकते. आणि कदाचित यातूनच त्यांच्या मनाला  वाचनाची ओढ वाटू लागण्याची शक्यता असते; पण त्याकरिता  अशा सांस्कृतिक वातावरणाचीपण तितकीच गरज असते. सांगली जिल्ह्यातील एका हुतात्मा स्मारकात एका ग्रामस्थाने रंगरंगोटी करून घेतली. आणि तिथे छोटेसे वाचनालय सुरू केले. आता तिथे स्पर्धा परीक्षेला भिडू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांची गर्दी असल्याचे दिसते आहे. गावातील अनेक टोळभैरव इथे जमून पुस्तके हाताळू लागली आहेत. आणि इतकेच नव्हे, तर नवीन पुस्तके आणण्याकरिता न मागता पैसे देऊ लागली आहेत. याचा अर्थ परिवर्तन होते; पण त्याकरिता तसे वातावरण निर्माण करणे अगत्याचे असते.

त्याशिवाय, समाज बदलू शकत नाही. केवळ विद्यापीठाच्या गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या म्हणजे गुणवत्तेचा लौकिक वाढतो, अशा भ्रमात राहण्याचा काळ केव्हाच मागे पडलेला आहे. आता  गुणवत्ता दाखवा, तरच तुम्हाला आत प्रवेश आहे, असे स्पष्टपणे बजावण्यात येते. कदाचित, हेच लक्षात आल्यामुळे पंतप्रधानांनी तमाम भारतीय जनतेला वाचते होण्याचा संदेश दिला असावा. कारण, त्यातून येणार्‍या विधायक आणि सकारात्मक बदलावर त्यांचा ठाम विश्‍वास असावा. आता आपणावर अशी जबाबदारी येते, की आपण स्वतः  पुस्तकांचे पाठबळ मिळविले पाहिजे आणि पुस्तकांना आपले पाठबळ पुरविले पाहिजे. काही चांगले वाचल्याशिवाय नवे दिसत नाही. आणि नवे दिसल्याशिवाय जगण्याला काही अर्थच प्राप्‍त होत नाही. त्याच त्या परिघातून बाहेर पडण्यासाठी आणि नवे होण्यासाठी पंतप्रधानांनी सुचविलेला हा मार्ग अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणून पुनश्‍च एकवार आपली पुस्तकांची मैत्री कशी निर्माण होईल, याचा किमान साधकबाधक पद्धतीने तरी विचार करू या!