Wed, Feb 20, 2019 15:45होमपेज › Bahar › रावणाला तोंडं किती?

रावणाला तोंडं किती?

Published On: Jul 08 2018 1:47AM | Last Updated: Jul 07 2018 8:21PMप्रा. सुहास द. बारटक्के

‘सर, रावणाला तोंडं किती?’
‘...या, या, मंगुअण्णा, आज काय काढलंत सकाळ सकाळीच? आज अचानक रावण कुठून आठवला? म्हणजे समाजात रावण वाढलेत, राम कमी झालेत हे खरंय; पण रावणाच्या तोंडाचं गणित का बरं आठवलं?’
‘सर, मला सांगा रावणाला तोंडं दहा की अकरा?’ 
‘दहा... दहा तोंडांचा रावण आपण रामायणात नाही का वाचला?’
‘पण, रावण हा मूळ एक तोंड असलेला आहे ना? त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी 5-5 तोंडे, म्हणजे एकूण अकरा तोंडं झाली ना?’

‘तसं नाही... त्याचं मूळ तोंड एक, मग त्याच्या एका बाजूला चार, तर दुसर्‍या बाजूला पाच म्हणजे चिकटवलेली तोंडं नऊच, सगळी मिळून दहा, असं मला ठाऊक आहे. दशावतारात नाही का पाहत आपण.’ 
‘आता सांगा, भाजप हा दहा तोंडांचा रावण आहे, म्हणजे काय?’
‘असं कोण म्हणतं?’ 
‘तेच ते साहेब, परवा तुमच्याकडे येऊन गेले ना, तेच मोठ्ठे साहेब काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की- निवडणुकीनंतर भाजपविरोधात सर्वांनी एकत्र यायला हवे. सामाजिक सलोखा बिघडवून फक्‍त मतांचं राजकारण करणारा भाजप हा दहा तोंडांचा रावण आहे.’ 
‘असं म्हणाले? खरंतर त्यांचे सगळ्याच पक्षांशी चांगले संबंध आहेत. मग असं का बरं म्हणाले असावेत?’
‘तेच तर मी विचारतोय तुम्हाला... भाजपची दहा तोंडं कुठली?’

‘त्यांना असं म्हणायचं असेल की, भाजप दहा तोंडानं सगळीकडे खात सुटलाय रावणासारखा. त्याची भूक संपतच नाहीय... खाऊन खाऊन त्याचं समाधानच होत नाहीय...’ 
‘खाऊन खाऊन म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी सत्ता मिळवून की, आणखी काय खाऊन?’
‘सत्तेची भूक हो... सत्तेची भूक भागली की, पैशांची आपोआप भागतेच. साधं गणित आहे ते!’
‘मला नाही तसं वाटत... सर, मला वाटतं त्यांना असं म्हणायचं असेल की- हा रावण दहा तोंडानं वेगवेगळं बोलत असतो. एका तोंडानं आश्‍वासन देतो, त्याच्याबरोबर उलट दुसर्‍या तोंडानं आश्‍वासन मोडतो, असं असावं.’ 

‘म्हणजे बघा ना, एका बाजूनं देवेंद्र म्हणतात की, आम्हाला तुमच्या युतीची गरज नाही, आम्ही मोठे आहोतच, तर दुसरीकडे ते दिल्‍लीश्‍वर आले की, थेट ‘मातोश्री’वर समेटाची बोलणी करायला जातात.’ 
‘हो ना, एकीकडे मोठ्ठ्या साहेबांचा सत्कार करतात, त्यासाठी सत्कार समारंभात हिरिरीने हजेरी लावतात, तर दुसरीकडे मोठ्ठ्या साहेबांचा पक्ष भ्रष्टाचारानं बरबटलेला गुंडांचा पक्ष म्हणतात.’ 
‘आणि साहेब आपले त्यांना दहा तोंडांचा रावण म्हणून मोकळे होतात.’ 

‘ही अशी सगळी राजकारणातली गंमत आहे, मंगुअण्णा ते तुम्हा-आम्हाला नाही समजायचं; पण दहा तोंडांचा रावण म्हणजे खरं काय ते सांगू? पहिला मुख्य चेहरा मध्यवर्ती चेहरा हा सुहास्य वदनाचा, हसरा प्रसन्‍न टवटवीत चेहरा. डावीकडच्या चारपैकी पहिला चेहरा नुसतीच भलतीसलती बडबड करणारा, अकारण नसते वाद निर्माण करून मुख्य चेहर्‍यावरची प्रसन्‍नता कमी करणारा, तर त्याच्या शेजारचा दुसरा चेहरा हा नुसतीच गर्जना करणारा, ‘यंव करू, त्यंव करू,’ असं म्हणणारा. डावीकडून तिसरा चेहरा हा शिस्तप्रिय संघाची काळी टोपी डोक्यावर धारण करणारा, एकदम कडक स्वभावाचा, तर चौथा केशरी टिळा लावलेला मधूनच ‘मंदिर वहीं बनाएँगे’ म्हणणारा, आतून पेटून उठलेला. 

उजवीकडचे चेहरे मात्र विचारी आणि हुश्शार बरं का. उजवीकडे मुख्य चेहर्‍याशेजारचा जो टक्‍कल पडलेला चेहरा दिसतो ना, तो डावीकडच्या बडबड्या चेहर्‍यावर नियंत्रण ठेवणारा कडक तोंडाचा हुश्शार चेहरा, तर त्याच्या बाजूला जो दिसतो तो ‘सिंह’ गर्जना करणारा ‘नाथां’चा, तर बाजूचे तीन विचारी व निर्विकार चेहरे. हे धूर्त होयबांचे.’ 
‘थोडक्यात, मधले दोन चेहरे महत्त्वाचे, असंच म्हणायचंय् ना तुम्हाला? आता आलं लक्षात...’ असं म्हणत स्वतःच्या चेहर्‍यावर आठ्यांचं जाळं घेऊन मंगुअण्णा निघाले.