Sun, Jun 07, 2020 00:43होमपेज › Bahar › अमेठीत काय होणार?

अमेठीत काय होणार?

Published On: May 12 2019 2:01AM | Last Updated: May 11 2019 8:35PM
प्रा. सुहास द. बारटक्के

वाराणसीला गंगेच्या काठावर उभा होतो... उन्हाळा असला तरी हवेत सुखद गारवा होता. गंगेचे स्वच्छ शुद्ध जल समोर हिंदकळत असल्याने काठावर उभे असणार्‍यांवर पाण्याचे हलके तुषार उडत होते. गंगेच्या घाटा-घाटांवर गंगारतीची तयारी सुरू होती. संध्याकाळ झाली. वर आकाशात रंगांची गर्दी झाली आणि गंगेची आरती सुरू झाली. स्वच्छ सुंदर घाटावर शिस्तबद्धपणे उभे असलेले लोक आणि गंगेच्या पात्रात नावा ‘पार्क’ करून बसलेले लोक सारे जण एकत्रितपणे ओरडू लागले...
‘नमो... नमो... नमामि गंगे... नमो... नमो’

सगळे जण आरतीकडे पाहण्याऐवजी आकाशाकडे पाहू लागले. तेथे एक हेलिकॉप्टर भिरभिरत होते.
‘आले... आले... नमो आले.... मी  म्हटले होते की नाही येणार म्हणून’ माझ्या शेजारचा कुणी तरी मराठी माणूस बोलला. ‘वो तो आनेवालेही थे... आखिर ये मैली गंगा किसने स्वच्छ की? नमोसाहेबांमुळेच स्वच्छ झाली ना? मग ते येणारच!’
आता कुठे मला ‘येणार-आले’चा अर्थ कळला. ते आले म्हणजे निवडून आले असेच म्हणायचे असावे त्यांना. बाकी ते समोर आलेले हेलिकॉप्टर रिकामेच होते. म्हणजे पायलटशिवाय त्यात कुणीही नव्हते. बहुधा सुरक्षेचे असावे. ते निघूनही गेले. मी घड्याळात तारीख पाहिली. आज 25 मे... म्हणजे खरेच निकाल लागले म्हणायचे. ‘हुश्श! अखेर नमो निवडून आले’ असं म्हणत मी शेजारच्या त्या मराठी माणसाला टाळी देत त्याची गळाभेट घेतली. ‘महाराष्ट्राबाहेर आज इकडे कुठे?’
‘आम्ही नागपूरचे स्वयंसेवक... कुठेही जातो गरज पडेल तेथे.’
‘इकडे काही विशेष?’
‘विजय साजरा कसा करायचा, याचा विचार करण्यासाठी आलोय...’
अवतीभवतीचे सारेच ‘स्वयंसेवक’ आहेत, असा संशय आल्याने मी घाटावरून पटापट वर आलो. तेथे विरोधी पार्टीवाले भेटलेच.
‘आम्ही जर सत्तेवर आलो तर गंगेचे पाणी ‘यूव्हीआरो’पेक्षा शुद्ध करू.’
‘अरेच्या म्हणजे तुम्ही अजून स्वप्ने पाहताय तर...’
‘स्वप्ने कसली? उद्या रिझल्ट पाहा...’

मी घाबरून पुन्हा घड्याळाकडे पाहिले. तारीख 22 मे. पुन्हा चुकलो की काय? मघाशी चुकीची तारीख पाहिली वाटतं, असा विचार करत गडबडून जात मी माझ्या गाडीकडे गेलो. ड्रायव्हरला म्हटलं - ‘अमेथी चलो’
अमेथीच्या सीमेवरच गाडी थांबवण्यात आली. एक कार्यकर्ता पुढे आला.
‘नेक्स्ट पीएम की कॉन्टीट्युएन्सी में आपका स्वागत हैं।’
‘कौनसा नेक्स्ट? दो हजार उन्नीस या दो हजार चौबीस?’
‘हम तो उन्नीस की बात कर रहे हैैं।’
‘अच्छा, अच्छा, मुझे लगा अब तो हो चुका है इलेक्शन, इसलिए आप दो हजार चौबीस की बात कर रहे हैं।’
‘राहुलजी तो तब भी जितेंगे...’ तो कार्यकर्ता हसन मुखाने म्हणाला आणि मी चक्रावलो.
तिकडे नमो नमो नमो नमः, तर इकडे राहुलजी की जयजयकार करणारा भेटला. ‘अमेठीत काय होणार?’ हा अख्ख्या भारतवर्षाला पडलेला प्रश्‍न. इथं तर छातीठोकपणे ‘राहुलजी जितेंगे’ असं सांगितलं जातंय.... थोडा  दबकत पुढे गेलो तर पुढे मला हवा तो दुसरा झेंडा दिसलाच.
‘आम्ही जाहिरात करत नाही... जिंकणार म्हणून आधीच बोंबाबोंब करीत नाही; पण जिंकतो मात्र निश्‍चित.’
माझं कमळ देऊन स्वागत करीत तो कार्यकर्ता म्हणाला,
‘मग अमेठीत कोण येणार?’ मी विचारलं.
‘मॅडमच येणार... इराणी, इराणी, इराणी...’ तो कार्यकर्त्यांचा ग्रुप ओरडू लागला तसा पलीकडून पहिल्या स्टॉलवरून त्यांना प्रतिसाद मिळू लागला.
‘गांधी, गांधी... गांधी...’
‘इराणी...’
‘गांधी...’
घोषणायुद्ध सुरू झालं आणि माझ्या खिशातला फोन वाजला. ‘काय हो सर, कुठे आहात?’
‘अमेथी... अ...मेथी... अ... मेथी....? मी ओरडू लागलो.’
कुणी तरी हलवतंय म्हणून डोळे उघडले तर जवळ सौभाग्यवती उभ्या होत्या.
‘अहो एवढं काय ओरडताय? नुसतं कुठची भाजी करू म्हणून विचारलं तर... अ मेथी... अ मेथी कशाला ओरडताय? मेथी आवडत नसेल, तर नाही करणार आणि आता आरामखुर्चीत डुलक्या काढत बसण्यापेक्षा मला जरा लसूण सोलायला मदत करा... चला’.
सौभाग्यवती ओरडल्या आणि मग मी त्यांच्या मागोमाग स्वयंपाकघराकडे वळलो.