Wed, Jun 26, 2019 15:22होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : शहराला हुडहुडी; पारा 10.6 अंशांवर

औरंगाबाद : शहराला हुडहुडी; पारा 10.6 अंशांवर

Published On: Nov 29 2018 12:57AM | Last Updated: Nov 29 2018 12:50AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

आठवडाभरानंतर पुन्हा एकदा शहराचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीचा कडकडाट वाढला आहे. विशेष म्हणजे कमाल तापमानही साधारण 3 अंशांनी घसरले आहे. बुधवारी कमाल तापमान 30.4 तर किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस नोंदवल्या गेल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेने दिली आहे.

दिवाळी संपल्यानंतर शहरातील सायंकाळचे तापमान दिवसेंदिवस कमी होत होते. दिवसा उन्हाचा तडाखा अन् चटके अन् सायंकाळी मात्र गारवा असे वातावरण शहरवासी अनुभवत होते. दहा ते पंधरा नोव्हेंबरदरम्यान वातावरणातील हा बदल पाहायला मिळाला. नोव्हेंबर महिन्यात दुसर्‍या आठवड्यापासून थंडी जाणवू लागली होती. रविवारी (दि. 11) शहराचे किमान तापमान 13.6 अंश होते, 12 रोजी त्यात 0.6 अंशाने घट झाली., तर 13 रोजी किमान तापमान 12.4 अंशांपर्यंत घसरले होते. 14 नोव्हेंबर रोजी 0.2 अंशाने किमान तापमान वाढले होते. त्यानंतर मात्र पुन्हा किमान व कमाल तापमानात वाढ होत ते सामान्यस्तरावर आले होते. 

गेले दोन दिवस किमान तापमान 12 अंशांच्या घरात होते, तर बुधवारी त्यात दोन अंशांनी घट होत, पारा 10.6 अंशांपर्यंत घसरला. थंडीचा जोर वाढल्याने स्वेटर, मफलर घालून खरेदीसाठी बाजारात येणार्‍या व सायंकाळी घराबाहेर पडणार्‍यांची संख्या वाढली आहे. थंडीमुळे चौकाचौकांत, रस्त्यांच्या कडेला असलेल्या चहा टपर्‍यांचा परिसर सायंकाळी गरम चहाचे फुरके घेणार्‍या ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.