Wed, Jun 19, 2019 08:09होमपेज › Aurangabad › कुणाच्या मागणीने, मर्जीने दुष्काळ जाहीर होणार नाही

कुणाच्या मागणीने, मर्जीने दुष्काळ जाहीर होणार नाही

Published On: Oct 11 2018 1:16AM | Last Updated: Oct 11 2018 12:41AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

दुष्काळ घोषित करण्याची अत्यंत वैज्ञानिक पद्धत केंद्राने तयार केलेली आहे. त्यामुळे आता कुणाच्या मागणीने किंवा अधिकार्‍यांच्या मर्जीने दुष्काळ घोषित करण्याची परिस्थिती राहिलेली नाही. औरंगाबाद जिल्ह्यात यंदा केवळ 56 टक्केच पाऊस झाला असून, येत्या 31 ऑक्टोबरला टंचाई जाहीर केली जाईल, असे आश्‍वासन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे दिले.    

मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, जिल्ह्यात 7 लाख 74 हजार हेक्टरपैकी 6 लाख 60 हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झालेली आहे. यापैकी 85 टक्के क्षेत्र हे कापूस व मक्याचे आहे. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात 25 दिवस व त्यानंतर 53 दिवस पावसाचा खंड पडला. पावसाअभावी उत्पादकतेवर निश्‍चितपणे परिणाम होईल. त्याचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकार्‍यांनी काढलेला आहे, परंतु तो वैज्ञानिकदृष्ट्या काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

दुष्काळाच्या संदर्भात नवीन निकषाप्रमाणे प्राथमिक कार्यवाही पूर्ण करून 31 ऑक्टोबरपर्यंत आम्ही टंचाईची स्थिती घोषित करून दुष्काळाच्या उपाययोजना सुरू होतील. त्यानंतर केंद्राचे पथक येईल, केंद्र सरकारच दुष्काळ जाहीर करेल. या प्रक्रियेपूर्वी नुकसानभरपाई, विम्याचे पैसे शेतकर्‍यांना देण्याच्या संदर्भातील सर्व तयारीही राज्य सरकारने केलेली आहे. पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देशही दिलेले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पाण्याचे नियोजन गरजेचे

परतीचा पाऊस आलाच नाही तर त्याला कसे सामोरे जायचे, त्याचे प्रयत्नही सुरू आहेत. मोठ्या धरणांत पाणीसाठा कमी असला, तरी ठीक आहे; पण मध्यम धरणांत पाणीसाठा कमी आहे, काही ठिकाणी शून्य टक्के, तर काही ठिकाणी मृतसाठ्यापर्यंत गेलेला आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन आपल्याला करावे लागणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, आ. प्रशांत बंब, आ. अतुल सावे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्त्याल आदींची उपस्थिती होती.