Fri, May 29, 2020 00:15होमपेज › Aurangabad › पाण्याच्या मागणीसाठी चार दिवस आंदोलन (video)

पाण्याच्या मागणीसाठी चार दिवस आंदोलन (video)

Published On: May 16 2019 6:47PM | Last Updated: May 16 2019 6:47PM
आपेगाव (औरंगाबाद) : प्रतिनिधी

हिरडपुरी बंधार्‍यात पाणी साडावे, या मागणीसाठी तीन दिवसांपासून शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू असून या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संतप्‍त शेतकर्‍यांनी गुरुवारी गोदावरी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धडक दिली. पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, शेतकर्‍यांच्या संयमाचा अंत पाहू नका, अशा घोषणा संतप्‍त शेतकर्‍यांनी यावेळी दिल्या. 

अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून शेतकर्‍यांनी जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी आंदोलन सुरू केले होते. तीन दिवस झाले तरी, शेतकर्‍यांच्या मागणीची साधी दखलही शासन व प्रशासनाने घेतली नाही, त्यामुळे बुधवारी (दि.१५) या शेतकर्‍यांनी जायकवाडी येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात ठिय्या मांडला होता. यानंतरही मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. 

यानंतर गुरुवारी (दि. १६) सायंकाळी ४ वाजेपर्यंत अधिकार्‍यांनी कोणतीही हालचाल न केल्याने, हे शेतकरी पैठणहून थेट जालना रोडवरील गोदावरी पाटबंधारे विभागात धडकले. कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या मांडला. जोपर्यंत आमच्या पाण्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, आणि कार्यालयातील एकाही अधिकारी-कर्मचार्‍याला बाहेर जावू देणार नाही, असा इशारा जयाजीराव सूर्यवंशी यांनी दिला.