Tue, Nov 19, 2019 11:18होमपेज › Aurangabad › पैठण : जाणून घ्या माहूरगडावरील रेणुका मातेच्या उपपीठाविषयी 

पैठण : जाणून घ्या माहूरगडावरील रेणुका मातेच्या उपपीठाविषयी 

Published On: Oct 10 2018 7:55PM | Last Updated: Oct 10 2018 7:55PMविहामांडवा : इम्तीयाज शेख

पैठण तालुक्यातील श्री क्षेत्र हिवरा चोंढाळा येथील रेणुका मातेचे मंदिर श्री क्षेत्र माहूरगडावरील रेणुका मातेचे उपपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. या गावाची एक वेगळीच ओळख आहे. या गावात एकही दुमजली घर नाही. तर विशेष म्हणजे या गावात विवाह समारंभ होत नाहीत. गावातील विवाह समारंभ हे गावाबाहेर केले जातात.           

विहामांडवा पासून तीन  किलोमीटर अंतरावर चौंढाळा (ता. पैठण ) येथील टेकडीवर वसलेले रेणुकामातेचे हेमाडपंती मंदिर आहे. हे मंदिर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात बांधलेले आहे. मंदिराचे प्रशस्त भव्य बांधकाम वास्तुशास्त्रातील अजोड नमुना आहे. भक्कम दगडी चिरेबंदीचा प्रशस्त प्रांगणातील मंदिर व भव्य ५० फुटाची दीपमाळ भाविकांचे लक्ष वेधून घेते. मंदिराच्या भव्य प्रवेशद्वार पाहताच मंदिराच्या भव्यतेची महती लक्षात येते. भाविकांची येथे मोठी गर्दी असते. 

हिवरा चोंढाळा गावात सुमारे ४०० घरे आहेत. गावाभोवती पूर्वी दाट जंगल होते. यात हिवऱ्याच्या  झाडाची संख्या जास्त असल्याने चोंढाळा गावाला हिवरा चोंढाळा असे नाव पडले. येथील मंदिराला कळस नाही. मंदिराला २० खांबांचा भव्य सभामंडप असुन या खांबावर कोरीव काम केलेले आहे. सभामंडप सुमारे एकशे दोन फूट लांबीचा असून मंदिराचा गाभारा चार खांब आहे. तर मंदिराला तीस फूट उंचीची दगडी तटबंदी आहे. विशेष म्हणजे रेणुका देवी कुमारिका आहे, अशी श्रद्धा असल्यामुळे गावात लग्न होत नाहीत तर गावातील लग्ने गावाबाहेर मारुती मंदिर जवळ होतात. याचबरोबर आपण रेणुका मातेच्या पायाशी असावे या भावनेने गावात कोणीही दुमजली घरे बांधलेले नाहीत.

त्याचबरोबर या गावात कोणीही बाज किंवा पलंग वापरत नाहीत. त्याऐवजी लोक घरात झोपण्यासाठी ओटे तयार करून घेतात. मंदिराच्या अवतीभवती दहा किलोमीटर लांब पाच किलोमीटर रुंदीपर्यंत जमिनीवर मोठमोठ्या दगडी शाळा पसरलेल्या आहेत या शिळाना लग्नाचे वऱ्हाड म्हटले जाते. एका अख्यायिका नुसार एका राक्षस राजाने देवीशी लग्न करण्याचा हट्ट धरला आणि तो मोठे वऱ्हाड घेऊन आला लग्नासाठी मोठा मंडप विहामाङवा येथे टाकण्यात आला. देवीला हे लग्न मान्य नव्हते आणि देवीने लग्न करण्यासाठी अट घातली होती. लगतच्या क्षेत्रातुन गोदावरी नदी वाहते त्या नदीचे पाणी सूर्योदयापूर्वी आणायाचे अशी अट होती.  पण पाणी वेळेच्या आत न आणू शकल्यामुळे सर्व  वऱ्हाडाचे शिळा मध्ये रूपांतर झाले अशी आख्यायिका आहे.

एक महिना आधीच उत्सवाची तयारी 

गावात महिनाभर आधी उत्सवाची तयारी केली जाते. मंदिराची रंगरंगोटी विद्युत रोषणाई करण्यात येते. तर पैठण येथून भाविकांसाठी ज्यादा बस गाड्या सोडण्यात येतात. घटस्थापनेपासून  मंदिरात दररोज धार्मिक कार्यक्रम होतात. देवीला अभिषेक, सप्तशती पाठ, नवमीला हवंन व पंचक्रोशीतील भाविक सीमोल्लंघन करून दर्शनासाठी येतात. अष्टमीच्या दिवशी विहामांडवा  येथुन देवीला टिपूर आणला जातो विहामाङवा  येथील जागृत ग्रामदैवत बलखंडी मंदिर व गावातून वाजत गाजत चौढाळा येथे देशमाने परिवार परंपरेनुसार टिपुर आणत असतो कुलदैवत असल्यामुळे दर मंगळवारी व शुक्रवारी येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. 

सातव्या माळेला भरते यात्रा... 

संत एकनाथ महाराज दर पौर्णिमेस दर्शनासाठी येथे येत. आजही नाथवंशज नेहमीच दर्शनासाठी येतात. चौढाळ्याची रेणुकामाता हे वारकरी संप्रदाय तसेच संत एकनाथ महाराजांचे कुलदैवत आहे. आपल्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी नवरात्र महोत्सवात घटस्थापनेपासून दूरवरचे भाविक मोठ्या संख्येने येतात. सातव्या माळीला येथे मोठी यात्रा भरते.

नवरात्र उत्सवा निमित्ताने चौढाळा येथे येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी तसेच येणारी दुकाने यांना नविन जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ग्राम पंचायतीकडून नेमण्यात आलेले स्वयंसेवक २४ तास अहोरात्र सेवेत असणार आहेत.   - सतिष काळे, सरपंच