होमपेज › Aurangabad › पंधरा लाख पळविले

पंधरा लाख पळविले

Published On: Feb 13 2018 2:53AM | Last Updated: Feb 13 2018 2:13AMपैठण : प्रतिनिधी 

शहरातील गोदावरी कॉलनी असलेल्या अन्नपूर्णा मायक्रो फायनान्स प्रा. लि. कंपनीचे कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोख 14  लाख 98 हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना सोमवारी सकाळी 9 वाजता  घडली. या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड, पोलिस निरीक्षक चंदन इमले यांनी घटनेची पहाणी केली आहे, मात्र कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर याप्रकरणी पोलिसांकडे तक्रारही नोंदविण्यात येईल, अशी माहिती कंपनीचे व्यस्थापक इरफान सय्यद यांनी दैनिक पुढारी बोलताना दिली. 

या घटनेसंदर्भात सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार अन्नपूर्णा मायक्रो फायनान्स ही कंपनी ओडीसा राज्यातील आहे. पैठण शहरातील गोदावरी कॉलनीत अंकुश राक्षे यांचा बंगला असून त्यात  या कंपनीचे कार्यालय व कर्मचारी निवासस्थान आहे. या बंगल्यात दोन किरायदार व स्वतः घर मालक राहतात. गेल्या दीड वर्षांपासून ही कंपनी पैठण तालुक्यातील महिला बचत गटांना कर्ज वाटप करते. या कंपनीचे खाते शहरातील आयसीआयसीआय या बँकेत असून  दररोज जमा झालेली रक्कम या बँकेत भरली जाते, मात्र शनिवार व रविवारी दोन दिवस बँकेला सुटी असल्यामुळे  कंपनीतील कार्यालयाच्या कपाटात 14  लाख 98 हजार रुपयांची रोख रक्कम ठेवण्यात आली होती. दरम्यान, सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास इरफान सय्यद व एक कर्मचारी हे दोघे चहा व नास्ता करण्यासाठी कार्यालय बंद करून बाहेर गेले होते. हिच सांधून चोरट्यांनी या कंपनीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या कार्यालयात असलेल्या कपाटातून सदर सर्व रक्कम रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड, पोलिस निरीक्षक चंदन इमले यांनी घटनेची पाहणी केली आहे. कंपनीच्या अधिकार्‍यांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांत फिर्याद दाखल केली नव्हती. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर फिर्याद दाखल केली जाईल, असे कंपनीचे पैठण शाखा व्यस्थापक इरफान सय्यद यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.

या कंपनीतील चोरीच्या घटनेची माहिती मिळताच मी स्वत: पोलिस पथकासह घटनास्थळी भेट दिली. फायनान्स कंपनीच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. या कंपनीच्या कपाटातून रोख 14 लाख 98 हजारांची रक्कम चोरीला गेलेली आहे. कंपनी अधिकार्‍यांनी आपल्या वरिष्ठांना घटनेची माहिती कळवली असून ते अधिकारी आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली जाणार आहे. 

- स्वप्निल राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी, पैठण.