Tue, Sep 17, 2019 03:37होमपेज › Aurangabad › #Women’sDay रात्र शाळेत शिकून केली शैक्षणिक संस्थांची उभारणी

#Women’sDay रात्र शाळेत शिकून केली शैक्षणिक संस्थांची उभारणी

Published On: Mar 08 2018 2:06AM | Last Updated: Mar 08 2018 11:55AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

कधीही शाळेत न जाता केवळ शिक्षणाशिवाय या जगात पर्याय नाही, असा उद्देश समोर ठेवून स्वतःची शैक्षणिक संस्था सुरू करून गोरगरिबांना शिकवण्याचे काम गेल्या 28 वर्षांपासून शहरातील वैजयंता मिसाळ या करत आहेत. 

बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट या छोट्या गावात जन्मलेल्या वैजयंता मिसाळ यांचे वयाच्या 15 व्या वर्षी लग्न झाले. आपल्यालाही वाचता लिहता आले पाहिजे ही जिद्द अंगी बाळगून त्यांनी रात्रशाळेत प्रवेश घेतला व तेथूनच 4 थी व सातवी बोर्डाची परीक्षा दिली. त्यानंतर 17 नंबरचा फॉर्म भरून दहावी उत्तीर्ण झाल्या व 1989 साली डी. एड. ला प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आपल्यासारखे शिक्षणासाठी कोणाचे हाल होऊ नये म्हणून त्यांनी प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू करून स्वतःची पहिली शाळा 1191 साली प्रतिभा पाटील प्राथ. शाळा सुरू केली. यावेळी त्यांना आर. एस. पाटील यांनी मदत केली. सुरुवातीला केवळ 5 ते 6 मुलांना घेऊन सुरू केलेल्या या शाळेचे मोठे वटवृक्ष झाले असून आता सुमारे 2 हजारांवर मुले असून ही शाळा बारावीपर्यंत आहे. त्यानंतर कालांतराने भगवान बाबा प्राथ. शाळा, वत्सलाबाई माध्य. शाळा, निर्मलराज माध्य. शाळा त्यांनी संस्थेच्या अंतर्गत सुरू केल्या. त्या सध्या प्रतिभा पाटील प्राथ. शाळेत मुख्याध्यापक तसेच संस्थेच्या सचिव म्हणून कार्यरत आहेत. 

गरिबीवर मात करायची असेल तर शिक्षण आवश्यक असते, असे म्हणणार्‍या वैजयंता ताईंचे सामाजिक कार्यही फार मोलाचे आहे. त्या संस्थेअंतर्गत गेल्या 22 वर्षांपासून खेडोपाडी जाऊन 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान व्यसनमुक्ती तसेच स्वच्छता सप्ताह राबवतात. शिवाय 3 ते 12 जानेवारी दरम्यान समाज परिवर्तन महोत्सवांतर्गत सामाजिक उपक्रमही त्या राबवतात यात त्यांना शाळेचे शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे सहकार्य असते. महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यामागे वैजयंता ताईंचा मोठा वाटा आहे. त्यांनी संत भगवान बाबा महिला बचत गट क्र. 1 ते 13 या अंतर्गत सुमारे 260 महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून अर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. जटवाडा, हर्सूल परिसरातील सुमारे 150 अशिक्षित महिलांना साक्षर करण्याचेही अगणित काम त्यांनी स्वखर्चाने केले आहे. शिवाय विधवा महिला तसेच घटस्फोटित महिला यांच्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम वैजयंता ताई राबवित आहे. त्या म्हणतात, श्री संत भगवान बाबा यांना प्रेरणास्थान मानून मी आजपर्यंत इथपर्यंत पोहचले आहे. महिलांनीही खचून न जाता स्वकर्तृत्वावर आपली वेगळी ओळख निर्माण करावी. 
 


 


WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex