होमपेज › Aurangabad › रेशनची तूरडाळ सडली...

रेशनची तूरडाळ सडली...

Published On: Jul 13 2018 12:47AM | Last Updated: Jul 12 2018 11:31PMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

शेतकर्‍यांकडून खरेदी केलेल्या तुरीवर प्रक्रिया करून तयार केलेली सुमारे साडेपाच हजार क्‍विंटल तूरडाळ मराठवाड्यातील विविध सरकारी गोदामांमध्ये पडून आहे. ही तूरडाळ आता 35 रुपये प्रतिकिलो दराने विक्री करण्याचे आदेश काढल्याने व्यापार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. दुकानातील तूरडाळ खपणार कशी, या चिंतेने आता व्यापार्‍यांनी रेशनची तूरडाळ सडल्याचे सांगत 65-70 रुपये किलोने तूरडाळ विक्री करण्याचा सपाटा लावला आहे. दुसरीकडे अर्धा जुलै महिना संपला तरी स्वस्तातील तूरडाळ रेशनवर पोहचू न देण्याची खबरदारी प्रशासनाने घेतल्याने नागरिकांवर महागडी डाळ घेण्याची वेळ आली आहे. 

गेल्या खरीप हंगामात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. शेतकर्‍यांची तूर शासनाने खरेदी केली व तुरीवर प्रक्रिया करून तूरडाळ रेशनदुकानांमार्फत विक्री करण्याचे आदेश काढले. एक किलोच्या पाकिटात पॅकिंग केलेली तूरडाळ रेशनदुकानावर 55 रुपये किलो दराने विक्री करण्याचे आदेश होते. जानेवारी ते एप्रिलदरम्यान शासनाकडून जिल्ह्यांना ही तूरडाळ उपलब्ध करून देण्यात आली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना 14 हजार क्‍विंटल तूरडाळ देण्यात आली होती. जूनअखेरपर्यंत 8500 हजार क्‍विंटल तूरडाळ रेशनदुकानदारांनी विक्री केली. 

गोदामात शिल्लक असलेली 55 रुपये किलोची तूरडाळ आता 35 रुपये किलो दराने विक्री करण्याचे आदेश शासनाने 20 जून रोजी काढले आहेत. तत्पूर्वी शिल्लक तूरडाळीच्या साठ्याची माहिती प्रत्येक जिल्ह्यांकडून मागवण्यात आली होती. मराठवाड्यात 5,352 क्‍विंटल तूरडाळ शिल्लक असून, आता ही डाळ 35 रुपये किलो दराने नागरिकांना मिळणार आहे. साधारण 7 तारखेपर्यंत चाकरमान्यांच्या हाती पगार पडतो, त्यानंतर महिन्याचा किराणा खरेदी होते. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 35 रुपयांची तूरडाळ रेशनवर उपलब्ध झाली असती तर व्यापार्‍यांकडील तुरीचे भाव पडले असते. मात्र, व्यापार्‍यांच्या फायद्यासाठी प्रशासनाकडून स्वस्तातील तूरडाळ रेशनदुकानापर्यंत पोहोचण्याचे टाळले जात आहे. 

आधी शासनाची तूरडाळ 55 रुपये किलो दराने विक्री होत होती. एक किलोच्या पाकिटात ही डाळ पॅकिंग केलेली आहे. पाकिटावर 55 रुपये प्रतिकिलो असे दर नमूद केलेले आहे. शासनाने तूरडाळ 35 रुपये किलोने विक्री करण्याचे आदेश दिलेले असून, शिल्लक तूरडाळीच्या पाकिटावर 35 रुपये किलो दराचे स्टिकर लावून विक्री करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पुरवठा उपायुक्‍त साधना सावरकर यांनी दिली आहे.