होमपेज › Aurangabad › कोणीही जिंका, औरंगाबादमध्ये मिरवणुकीला परवानगी नाहीच

कोणीही जिंका, औरंगाबादमध्ये मिरवणुकीला परवानगी नाहीच

Published On: May 21 2019 1:48AM | Last Updated: May 21 2019 1:24AM
औरंगाबाद : प्रतिनिधी

मतमोजणीच्या दिवशी शहरात एक हजार 654 पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात राहणार आहे. यापैकी मतमोजणीच्या ठिकाणी 303 पोलिस अधिकारी, कर्मचारी, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे एक आणि राज्य राखीव पोलिस दलाचे एक असे दोन प्लाटून तैनात असतील. महत्त्वाचे म्हणजे, अंतिम निकालानंतर कोणीही विजयी झालेले असले तरी मिरवणुकीला परवानगी देण्यात येणार नाही, असे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले.

औरंगाबाद लोकसभेसाठी 23 एप्रिल रोजी मतदान झाले. यंदा मतदानाचा टक्का वाढल्यामुळे नवा खासदार कोण? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. त्यात रविवारी रात्रीपासून एक्झिट पोलचे अंदाज समोर आल्यामुळे तर अनेकांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. महिनाभरापासून औरंगाबादकर मतमोजणीची वाट पाहात आहेत. 23 मे रोजी मतमोजणीनंतर अंतिम निकाल जाहीर होणार आहेत. पण, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हा अतिसंवेदनशील असल्यामुळे मतदानाच्या दिवशी येथे पोलिसांनी प्रचंड खबरदारी बाळगली होती. गतवर्षीच्या दंगलीची पार्श्‍वभूमी असल्यामुळे तर पोलिस प्रत्येक बाजू तपासून पाहात आहेत. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशीही तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवार, पदाधिकार्‍यांनी आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस दलाच्या वतीने करण्यात आले आहे. 

असा आहे शहरातील बंदोबस्त

मतमोजणीच्या दिवशी शहरात दोन पोलिस उपायुक्त, दोन सहायक पोलिस आयुक्त, 19 पोलिस निरीक्षक, 83 सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, एक हजार 82 पोलिस कर्मचारी, 150 महिला कर्मचारी आणि बारा कॅमेरामन असा बंदोबस्त राहणार आहे. ते शहरातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून असतील. शिवाय विविध ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत.