Wed, Jun 26, 2019 01:21होमपेज › Aurangabad › पाणी प्रश्‍नावर तोडगा नाहीच

पाणी प्रश्‍नावर तोडगा नाहीच

Published On: Apr 21 2018 12:59AM | Last Updated: Apr 21 2018 12:59AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी 

दोन आठवड्यांपूर्वी पुंडलिकनगर जलकुंभावरील राजकीय घडामोडीनंतर पाणीपुरवठा विभागाने सिडको भागाचा पाणीपुरवठा एक दिवसाने वाढविला, तर काही भागांचा पाणीपुरवठा दोन दिवसांनी वाढविला. त्यामुळे या भागात चौथ्या, पाचव्या दिवशी पाणी येत आहे.  सुरेवाडीसह सिडको-हडकोच्या ज्या वसाहतींच्या वेळापत्रकात बदल केला आहे, त्यांना पूर्वीप्रमाणे दोन दिवसांआड पाणी देण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडले यांनी तीन दिवसांपूर्वीच दिले होते. मात्र, अजूनही या भागात पूर्वीचीच परिस्थिती कायम असल्याने नागरिकांतून संताप व्यक्‍त केला जात आहे.

सिडको-हडकोत दोन दिवसांऐवजी आता तीन ते चार दिवसांआड पाणी पुरविले जात आहे. त्यातही केवळ 45 मिनिटेच पाणीपुरवठा होत असल्याने सिडकोवासीय त्रस्त झाले आहेत. सुरेवाडी येथील महिलांनी पाण्यासाठी सोमवारी अर्ध्यारात्री नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरी मोर्चा काढला. तसेच दुसर्‍या दिवशी सुरे यांच्या घरासमोर ठिय्या दिला. त्यानंतर एन-7 च्या जलकुंभावर मोर्चाही काढला होता. त्यावेळी महापौर घोडेले यांनी एमआयडीसीकडून सात एमएलडी पाणी मिळवून मुबलक व समान पाणी देण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जाईल, असे आश्वासित करीत पूर्वीप्रमाणे दोन दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन करावे, तसेच ज्या भागात पूर्वीपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे तेथे 45 मिनिटांऐवजी एक तास पाणी द्यावे, असे आदेश पाणी पुरवठा विभागाला केले होते. मात्र, यानंतरही सिडको-हडकोच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन प्रशासनाने केलेले नसल्याने या भागात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.