होमपेज › Aurangabad › तीस फुट खोल विहिरीत तिने काढली रात्र

तीस फुट खोल विहिरीत तिने काढली रात्र

Published On: Jun 13 2018 12:17PM | Last Updated: Jun 13 2018 12:17PMकन्नड : प्रतिनिधी

सध्या कन्नड तालुक्यात चोर आल्याची अफवा पसरत आहेत. अशाच परिस्थितीत तालुक्यातील देवळाणा येथील नऊ वर्षाची मुलगी संध्याकाळी सहा वाजता बेपत्ता झाली.त्यानंतर गावात एकच धांदल उडाली. मुलीचे नातेवाईक तसेच गावातील माहिला पुरुष यांनी सर्वत्र शोध सुरु केला. मात्र, मुलीचा रात्रभर शोध लागला नसल्याने मुलीचे चोरांनी अपहरण केल्याचा संशय गावकऱ्यांत बळावला. तर दुसऱ्या दिवशी गावातील कोरडया विहिरीत मुलगी सुखरूप सापडल्याने आई वडिलांनी सुटकेचा निश्वास टाकला.

‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय देवळणातील लोकांना आला.  गावात दि.१२ जून रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास आदिती अनिल सुरासे ही नऊ वर्षाची मुलगी घरातून चहा पिऊन खेळण्यासाठी बाहेर अंगणात गेली. रात्री जेवणाची वेळ झाली म्हणून आई वडिलांनी आदितीचा  शोध घेतला. मात्र, मुलगी सापडून न आल्याने आपल्या मुलीचे अपहरण तर झाले नसेल ना या भीतीने सुरासे कुटुंब प्रचंड घाबरले. त्यानंतर गाकऱ्यांच्या मदतीने मुलीचा शोध सुरु झाला. रात्रभर संपूर्ण गावात, शेतात आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला तरी मुलगी सापडेना. शोधाशोध झाल्यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास देवगाव पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार ही देण्यात आली होती.

दरम्यान आज (दि.१३ जून) सकाळी गावातील एका विहिरीत आदिती दिसली. बेपत्ता झालेली मुलगी सापडली आणि गावकऱ्यानी सुटकेचा श्वास घेतला. रात्रभर मुलीचे काय झाले असेल या चिंतेत आसलेल्या आई वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ज्या विहिरीत मुलगी सापडली ती विहिर तीस फुट खोल आहे. यात खेळता खेळता आदिती पाय घसरून पडली. तब्बल तेरा तास अन्न-पाण्यावाचून या नऊ वर्षाच्या मुलीने मोठ्या धाडसाने वेळ काढली. मात्र, तीस फुट खोल विहिरीत पडूनही ही आदितीला कुठेही जखम न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तिला मुका मार बसला असून तसेच रात्रभर विहिरीत राहिल्याने ती भेदरली आहे. तिच्यावर उपचार करण्यासाठी औरंगाबाद येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. 

मुलगी बेपत्ता झाल्याची देवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनीही तिचा शोध घेतला. तसेच सोशल मीडियावर मुलीचा फोटो, नाव, गाव इत्यादी माहितीसह शोध घेण्याचे आहवान करण्यात आले होते. चोरांची अफवा सुरु आसल्याने व मुलगी बेपत्ता झाल्याने चोरानी मुलीचे अपहरण केल्याचा संशय बळावला होता. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उद्याण आले होते.