होमपेज › Aurangabad › दरोड्याने लासूर स्टेशन हादरले

दरोड्याने लासूर स्टेशन हादरले

Published On: Nov 15 2017 2:31AM | Last Updated: Nov 15 2017 2:31AM

बुकमार्क करा

लासूर स्टेशन : प्रतिनिधी 

आधीच चोर्‍या, खुनाच्या घटनेने दहशतीत असलेले गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन मंगळवारी आणखी एका व्यापार्‍याच्या हत्येने पुन्हा एकदा हादरले. येथील गजबजलेल्या जुना मोंढा, शिवाजी चौकातील रहिवासी असलेले कृषी व्यापारी केशरचंद उत्तमचंद जाजू (81) यांची सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने सोमवारी मध्यरात्रीनंतर घरात घुसून निर्घृण हत्या केली. तसेच घरातील तब्बल 90 तोळे सोने, 5 किलो चांदी व अडीच लाख रोख असा सुमारे अर्धा कोटीचा ऐवज लुटला. या घटनेने एकच खळबळ उडाली. घटनेनंतर गावकर्‍यांनी मंगळवारी बंद पाळून घटनेचा आणि पोलिसांच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदविला. 

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत केशरचंद जाजू हे मुलगा कैलास आणि सुनेसोबत लासूर स्टेशन येथील शिवाजी चौकात राहतात. त्यांच्या इमारतीतच खाली कृषी साहित्य विक्रीचे दुकान आहे. नित्याप्रमाणे सोमवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर जाजू हे दुकानामागेच असलेल्या आपल्या खोलीत झोपले, तर मुलगा आणि सून दुसर्‍या मजल्यावर झोपले होते. 

मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने त्यांच्या घराला लक्ष्य केले. घराच्या मागील चॅनल गेटचा कडीकोयंडा तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. घरात घुसताच त्यांनी केशरचंद जाजू यांच्या खोलीकडे मोर्चा वळविला. याच ठिकाणी तिजोरी होती. खोलीत घुसताच दरोडेखोरांनी आधी जाजू यांना शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तिजोरी उघडण्यास भाग पाडले असावे. तिजोरी उघडल्यानंतर त्यात असलेले 30 तोळे सोने, पाच किलो चांदी आणि अडीच लाख रुपये रोख लुटल्यानंतर दरोडेखोरांनी जाजू यांचे पाय बांधले आणि मग डोक्यात कशाने तरी जोरदार प्रहार केला असावा. हा प्रहार इतका जोरदार होता की रक्‍ताचे शिंतोडे बाजूच्या भिंतीवर उडाले. नंतर पुन्हा चादरीने तोंड दाबून जाजू यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर दरोडेखोरांनी तेथून काढता पाय घेतला.