Sat, Sep 21, 2019 06:38



होमपेज › Aurangabad › शरद पवार आर्थिक सुधारणातील भागीदार : मनमोहनसिंग

शरद पवार आर्थिक सुधारणातील भागीदार : मनमोहनसिंग

Published On: Dec 23 2017 6:23PM | Last Updated: Dec 23 2017 6:26PM

बुकमार्क करा





औरंगाबाद : प्रतिनिधी

नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री असताना आपण केलेल्या आर्थिक सुधारणांमध्ये शरद पवार हे भागीदार होते. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आर्थिक सुधारणा, उदारमतवादी धोरण राबविता आले, असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी शनिवारी येथे सांगितले.

शेषराव चव्हाण यांनी लिहिलेल्या ‘पद्मविभूषण शरद पवार, द ग्रेट इनिग्मा’ या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते एमजीएम महाविद्यालयाच्या रुक्मिणी सभागृहात झाले त्यावेळी ते बोलत होते. शरद पवार, एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, सचिव अंकुशराव कदम, सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष धिरुभाई मेहता, डॉ. अफरोज अहमद, शेषराव चव्हाण, प्रतापराव बोराडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

शरद पवार हे देशाला लाभलेले सर्वोत्कृष्ट कृषीमंत्री आहेत, अशा शद्बात मनमोहनसिंग यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. नरसिंहराव पंतप्रधान असताना 1991 या वर्षी देशाची आर्थिक स्थिती गंभीर झाली होती. त्यावेळी मी अर्थमंत्री आणि पवार हे संरक्षण मंत्री होते. अर्थमंत्री या नात्याने आपण घेतलेल्या आर्थिक सुधारणांच्या निर्णयास पवारांनी खंबीरपणे पाठिंबा दिला. एवढेच नव्हे तर संरक्षण खात्याच्या अर्थसंकल्पात तब्बल 15 हजार कोटी रुपयांची कपात करण्यासही त्यांनी मान्यता दिली. त्यांच्यामुळेच आर्थिक सुधारणा तसेच उदारमतवादी धोरण यशस्वीरित्या राबविता आले, असे मनमोहनसिंग यांनी स्पष्ट केले.

मराठवाड्यामुळे घडलो : पवार

विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष व मराठवाड्याचे नेते विनायकराव पाटील यांनी आपणास पक्षाची उमेदवारी दिली. तेव्हापासून सलग 50 वर्षे मी निवडणुका जिंकल्या असून, त्यात मराठवाड्याचा मोठा वाटा असल्याचे गौरवोद‍्गार पवार यांनी काढले. मराठवाड्याशी असणार्‍या ऋणानुबंधाचा लाभ मिळाला, हा आयुष्यातील सर्वात मोठा ठेवा आपण मानत असल्याचेही त्यांनी सांगितले.