Sat, Jul 11, 2020 13:11होमपेज › Aurangabad › मनपा आयुक्‍त पुन्हा रस्त्यावर

मनपा आयुक्‍त पुन्हा रस्त्यावर

Published On: Apr 09 2018 1:49AM | Last Updated: Apr 09 2018 1:42AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महानगर पालिकेचे प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे आठवडाभरानंतर रविवारी पुन्हा एकदा कचराप्रश्‍नी रस्त्यावर उतरले. त्यांनी सुटीच्या दिवशी शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या कम्पोस्टिंग पीट बांधकामाची पाहणी केली. कंपोस्टिंग पीटची कामे 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करा, असे आदेशही यावेळी त्यांनी पालिकेच्या अधिकार्‍यांना दिले. 

शहरात मागील 52 दिवसांपासून कचराकोंडी आहे. शासनाने कचरा डम्प करण्यास मनाई केल्याने आता पालिका शक्य तेवढ्या प्रमाणात खड्डे खोदून ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करत आहे. त्यातच आता काही ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने कंपोस्ट पीट तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी रविवारी प्रभारी आयुक्‍त राम यांनी केली. राम यांनी सेंट्रल नाका, मजनू हिल, सिद्धार्थ उद्यान आणि पडेगाव आदी ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्यासह संबंधित वॉर्ड अधिकारी, वॉर्ड अभियंता व इतर अधिकार्‍यांची उपस्थिती होती.

सर्व कम्पोस्टिंग पीट्सचे काम 15 एप्रिलच्या आत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले. तसेच अधिकार्‍यांनी कामाच्या दर्जावर लक्ष द्यावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही राम यांनी दिला. प्रभारी आयुक्‍त राम म्हणाले, न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरात कचरा विल्हेवाटीचे सर्व काम समाधानकारकपणे सुरू आहे. कम्पोस्टिंग पीट्सच्या खाली फरशी बसविण्यात येत आहे. 

शहरात कचर्‍याच्या योग्य विल्हेवाटीसाठी कंपोस्टिंग पीटची कामे करणे महत्त्वाचे आहे. ही कामे तातडीची आहेत. त्यामुळे आवश्यतेनुसार अशी कामे 67(3) सी या कलमान्वये करण्यास प्रभारी आयुक्‍तांनी मंजुरी दिली.