Fri, Sep 20, 2019 21:48होमपेज › Aurangabad › खुलताबादच्या डॉक्टरला एटीएसने उचलले; दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचा संशय

खुलताबादच्या डॉक्टरला एटीएसने उचलले; दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचा संशय

Published On: Mar 05 2019 1:47AM | Last Updated: Mar 05 2019 1:41AM
खुलताबाद : प्रतिनिधी

मुंब्रा आणि औरंगाबादमधून अटक केलेल्या नऊ संशयित दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून औरंगाबाद एटीएसने सोमवारी (दि. 4) खुलताबाद येथील एका डॉक्टरला उचलले. औरंगाबादला आणून दिवसभर त्याची चौकशी केल्याची माहिती खुलताबाद येथील सूत्रांनी दिली.

अन्न आणि पाण्यात विष कालवून महाराष्ट्रासह देशभरात कुठेही नरसंहार करून सीरियात पळून जाण्याचा कट रचलेल्या दहा संशयित अतिरेक्यांना महाराष्ट्र एटीएसने 23 जानेवारीला ताब्यात घेतले होते. यात एक अल्पवयीन असल्याने नऊ जणांना अटक केली होती. जमान नवाब खुटेउपाड, सलमान सिराजोद्दीन खान, फहाद मोहंमद इस्तेयाक अन्सारी, मजहर अब्दुल रशीद शेख, मोहंमद तकी ऊर्फ अबू खालिद सिराजोद्दीन खान, मोहसीन सिराजोद्दीन खान, मोहंमद मुशाहिद उल इस्लाम, मोहंमद सर्फराज ऊर्फ अबू हमजा अब्दुल हक उस्मानी आणि तल्लत ऊर्फ अबुबकर हनीफ पोतरीक, अशी त्यांची नावे आहेत. यांच्यापैकी मोहसीन हा काश्मिरी अतिरेक्यांच्या संपर्कात होता. काश्मिरातील अतिरेक्यांशी चॅटिंग करून त्यांना पैसे पुरवीत असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झाले होते. त्यांची 27 दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर 18 फेब्रुवारीला न्यायालयीन कोठडीत (हर्सूल) रवानगी करण्यात आली होती.

दरम्यान, एटीएसने जोरदार तपास मोहीम राबवून या संशयितांच्या संपर्कात असलेल्या डॉक्टरला सोमवारी ताब्यात घेतले. पण, सूत्रांनी त्याचे नाव सांगितले नाही. त्याला अजून आरोपी न केल्यामुळे रात्री उशिरा सोडून देण्यात आले. तसेच गरज पडल्यास पुन्हा चौकशीला हजर राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.