Mon, Sep 16, 2019 06:25होमपेज › Aurangabad › बलात्कारप्रकरणी आरोपीस सुनावली पोलिस कोठडी

बलात्कारप्रकरणी आरोपीस सुनावली पोलिस कोठडी

Published On: Mar 14 2018 12:53AM | Last Updated: Mar 14 2018 12:53AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शाळेतून घरी निघालेल्या 15 वर्षीय मुलीला दुचाकीवरून म्हैसमाळला नेऊन तेथील लॉजवर कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध पाजून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला सोमवारी (दि.12) अटक करण्यात आली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, गुरुवारपर्यंत (15 मार्च) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी दिले.

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, 13 डिसेंबर 2017 रोजी फिर्यादीने तिच्या मुलीला दुपारी दीडपर्यंत शाळेतून घरी येण्यास सांगितले होते. ती दुपारपर्यंत घरी आली नाही म्हणून पीडितेच्या पित्याने शाळेत जाऊन चौकशी केली असता, पीडिता शाळेत नसल्याचे लक्षात आले. फिर्यादीने क्रांती चौक पोलिस ठाणे गाठले असता, पीडिता बाबा पेट्रोल पंप परिसरात आल्याची माहिती कुटुंबीयांना कळाली. या प्रकरणी पीडितेने 18 डिसेंबर रोजी दिलेल्या जबाबानुसार, पीडिता 13 डिसेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास घरी निघाली असता, पीडितेच्या परिसरात राहणार्‍या व्यक्‍तीची मुलगी झिनत व आरोपी शेख रहीम शेख कमरुद्दीन (23, रा. नवाबपुरा) हे दुचाकीवर आले व त्यांनी पीडितेला दुचाकीवर बसवून नेले. खुलताबाद परिसरात झिनत उतरून गेली, तर आरोपी पीडितेला म्हैसमाळ येथील एका लॉजवर घेऊन गेला. तिथे आरोपीने तिला गुंगीचे औषध असलेले कोल्ड्रिंक पाजले व तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने पीडितेला बाबा पेट्रोल पंपाजवळ आणून सोडल्याचा जबाब पीडितेने पोलिसांना दिला.

या प्रकरणी पीडितेच्या जबाबावरून आरोपीविरुद्ध कलम 366 (अ), 376, 506, 34, तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोस्को) कलम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज 8 जानेवारीला फेटाळण्यात आला. आरोपीला सोमवारी (12 मार्च) अटक करण्यात आली.आरोपी शेख अब्दुल रहीम खमरोद्दीन याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीची साथीदार झिनत ही फरार असून तिला अटक करणे बाकी आहे. तसेच आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे बाकी असून, आरोपीने पीडितेला कुठे कुठे नेऊन तिच्यावर अत्याचार केला, आणखी कोणी साथीदार आहे का आदी बाबींचा तपास करायचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.