Mon, Jul 06, 2020 03:33होमपेज › Aurangabad › नगर, नाशिकचे पाणी जायकवाडीला!

नगर, नाशिकचे पाणी जायकवाडीला!

Published On: Oct 16 2018 1:40AM | Last Updated: Oct 16 2018 12:28AMऔरंगाबाद ः विशेष प्रतिनिधी

जायकवाडी धरणात 172 दलघमी (6 टीएमसी) पाण्याची तूट असल्याचे सोमवारी (दि.15) येथे झालेल्या बैठकीत स्पष्ट झाले. ही तूट भरून काढण्यासाठी नगर आणि नाशिक जिल्ह्यांतून येत्या तीन दिवसांत जायकवाडी धरणात पाणी सोडले जाईल, असे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी सांगितले. 

जायकवाडी धरणात यंदा 65 टक्क्यांपेक्षा कमी पाणी असल्याने ऊर्ध्व गोदावरी खोर्‍यातील मुळा, प्रवरा, गंगापूर, दारणा, पालखेड या धरण समूहांतून समन्यायी पद्धतीने पाणीवाटपाचे नियोजन करण्यासाठी कोहिरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक  घेण्यात आली. ऊर्ध्व खोर्‍यातील वरील धरणे तसेच जायकवाडीतील पाणीसाठा, खरीप हंगामात झालेला पाण्याचा वापर व शिल्लक साठा यांचा हिशेब यावेळी करण्यात आला. त्याआधारे जायकवाडी धरणात 172 दलघमी पाण्याची तूट असल्याचा निष्कर्ष बैठकीत काढण्यात आला.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कोहिरकर म्हणाले की, जायकवाडीच्या साठ्यात 172 दलघमी पाण्याची तूट असल्याचे स्पष्ट झाले आहे. जायकवाडी, माजलगाव या धरणांतील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी ऊर्ध्व खोर्‍यातील धरणांतून सहा टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. येत्या तीन दिवसांत याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल. 

ऊर्ध्व खोर्‍यातील काही भागांतही पाण्याची परिस्थिती फारशी चांगली नाही. त्याचाही विचार पाणी सोडताना केला जाईल. जायकवाडी धरणात कमी पाणी असले, तरी औरंगाबादेतील औद्योगिक पाणीपुरवठ्यात यंदा कसलीही कपात केली जाणार नाही, तसेच जायकवाडी धरणात पाणी आल्यानंतर रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याचा विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

खरिपातही झाला पाणी वापर

ऊर्ध्व भागातील धरणातून खरीप हंगामातील पिकांसाठी पाणी सोडण्यात आले होते. मुळा धरणातून खरिपासाठी 180 दलघमी, प्रवरातून 96 दलघमी, गंगापूर धरणातून 68 दलघमी, दारणातून 165 दलघमी, तर पालखेड धरणातून 100 दलघमी पाण्याचा वापर करण्यात आला होता. जायकवाडी धरणातून खरिपासाठी 441 दलघमी पाणी वापरण्यात आले होते.

2015 मध्ये सोडले होते पाणी

गेल्या वर्षी जायकवाडी धरण शंभर टक्के भरल्याने ऊर्ध्व भागातील धरणांतून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला नव्हता. यापूर्वी 2015 मध्ये मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडल्याने जायकवाडी धरणात ऊर्ध्व भागातून 10.40 टीएमसी पाणी सोडण्यात आले होते.

नगरमधून पाणी सोडण्यास विरोध

नगर जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने, जायकवाडीला पाणी सोडण्यास स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविलेला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व धरणांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचे आदेश पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिलेले आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत जायकवाडीला पाणी न देण्याचा ठरावदेखील सभेत करण्यात आलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे नगर-नाशिक विरूद्ध मराठवाडा असा वाद पेटण्याची शक्यता आहे.