होमपेज › Aurangabad › कौशल्य पणाला लावूनही बेरोजगार

कौशल्य पणाला लावूनही बेरोजगार

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 15 2018 1:49AMऔरंगाबाद : जे. ई. देशकर

केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने शासकीय नोकर भरतीत कपात केल्याने दिवसेंदिवस बेरोजगारीत वाढ होत आहे. रोजगारांसाठी विविध कौशल्ये अंगीकारूनही आजच्या परिस्थिती नोकरी मिळत नसल्याने तरुणांत बेरोजगारीबरोबर निराशाही वाढत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कौशल्य प्रशिक्षण घेतलेले 1 लाख 30 हजार तरुण रोजगारांच्या शोधात आहेत. 

मागणी असलेल्या क्षेत्रामध्ये कौशल्य विकसित करून रोजगार अथवा स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणाच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने सप्टेंबर 2015 मध्ये स्व. प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान सुरू करण्यात आले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात एक लाख 31 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.  सद्यःस्थितीत 8 हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत, परंतु जवळपास दीड लाख विद्यार्थ्यांपैकी प्रत्यक्षात 2296 युवकांना रोजगार मिळाला आहे. तर 1 लाख 30 हजार प्रशिक्षणार्थी आजही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच पात्र उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशीच परिस्थिती प्रत्येक जिल्हास्थानी असल्याचे दिसून आली. त्यामुळे लाखोंच्या संख्येने कौशल्याधारित प्रशिक्षणार्थी बेरोजगारीच्या खाईत पडलेले आहेत.