औरंगाबाद ः प्रतिनिधी
शासनाने केलेल्या प्लास्टिक बंदीचा सर्वांत मोठा फटका प्लास्टिक निर्मिती करणार्या कंपन्यांनाच बसला असे नाही तर या निर्णयामुळे मराठवाड्यातील 23 हजार विविध उत्पादने करणार्या गृह व लघुउद्योगांवर याचा परिणाम झाला आहे. या उद्योगांचे सर्व प्रॉडक्ट प्लास्टिक पॅकिंगवर अवलंबून असल्याने या उद्योगांवर मोठे संकट कोसळले आहे.
मराठवाड्यात 565 प्लास्टिक निर्मिती उद्योग आहेत. विभागात प्लास्टिक या उद्योगांमध्ये तयार केले जाते. गुजरातेतून मराठवाड्यात प्लास्टिक येते असे बोलले जात असले तरी तेथून फक्त 10 टक्केच प्लास्टिक शहरात येत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. मरावाड्यातील 565 पैकी 210 उद्योगांची एमपीसीबीकडे नोंद आहे. इतर कंपन्यांची नोंद नसल्याने प्लास्टिक इतर राज्यांतून येत असल्याचा दावा केला जातो.
23 हजार गृह, लघुउद्योगांना फटका
प्लास्टिक बंदीमुळे यावर आधारित असलेले 23 हजार गृह व लघुद्योग धोक्यात आले आहेत. या उद्योगात महिला बचतगट, बेकरी उद्योग, पापड उद्योग, मसाले उद्योग, चकली, चटण्या आदींचा समावेश आहे. या सर्व लघु व गृहउद्योगांमध्ये तयार होत असलेल्या वस्तूंना सुरक्षित ठेवण्यासाठी प्लास्टिकशिवाय दुसरा स्वस्त पर्याय नाही. मराठवाड्यात साडेतीन हजार बेकरी आहेत. बेकरीचे पूर्ण उत्पादनांना सुरक्षिततेसाठी प्लास्टिकशिवाय पर्याय नाही. प्लास्टिक बंद झाल्यामुळे बेकरी चालक धास्तावले आहेत. या उद्योगांवर अवलंबून असणार्या हजारो कामगारांवर बेकारीची कुर्हाड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वस्तू पॅकिंग करण्यासाठी आता दुसरा कशाचा पर्याय वापरावा असा प्रश्न या उद्योगांपुढे निर्माण झाला आहे.
565 पैकी 390 कारखान्यांवर बँकेचे कर्ज
मराठवाड्यात असलेेले प्लास्टिक उत्पादन करणार्या 565 कारखान्यांपैकी 390 कारखान्यांनी उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज काढलेले आहेत. त्यांचे कर्ज अद्यापही फिटले नसून प्लास्टिक बंदीची त्यांच्यावर कुर्हाड कोसळली आहे. हे सर्व उद्योजक धास्तावले असून आता पुढे काय असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. या कारखान्यांवर काम करणारे हजारो कामगारही बेकार होण्याच्या भीतीने धास्तावले असून दररोज घडणार्या घटनांकडे डोळे लावून बसले आहेत.